US Election 2020: डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मी पिछाडीवर नाही, प्रचार चांगला सुरु आहे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

माध्यमांकडे योग्य माहिती आहे की नाही याची मला खात्री नाही. परंतु, फ्लोरिडामध्ये आम्ही चांगली कामगिरी करत आहोत.

वॉशिंग्टन- अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी 3 नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. येथील प्रचारही शेवटच्या टप्प्यात आहे. मतदानाची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. अमेरिकेत अशाप्रकारच्या मतदानाला 'अर्ली व्होटिंग' म्हटले जाते. दरम्यान, यंदाची निवडणूक ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची निवडणूक असल्याचे मत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. माझा निवडणूक प्रचार चांगला सुरु आहे. विशेषतः ज्या राज्यात काट्याची टक्कर होणार आहे, तिथेही अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 

राष्ट्राध्यक्षपदाचे दुसरे उमेदवार डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन हे ट्रम्प यांच्यापेक्षा पुढे असल्याची आकडेवारी प्रसारमाध्यमांमधून दाखवण्यात येत आहे. परंतु, ट्रम्प यांनी माध्यमांची ही आकडेवारी फेटाळली आहे. आपला प्रचार अत्यंत नियोजनबद्ध सुरु असून आणखी प्रचारसभा आयोजित करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'माझा विश्वास आहे की, आम्ही चांगले काम करत आहोत. आमच्यात सामील होणार्‍या लोकांची संख्या आश्चर्यकारक आहे', असे ट्रम्प यांनी ओहोयो येथील कोलंबस येथे पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा- वयाच्या 65 व्या वर्षी हरिश साळवे करणार दुसरं लग्न

ज्या राज्यांमध्ये बायडेन यांच्याबरोबर काट्याची टक्कर होणार आहे. त्या राज्यांची नावे घेताना ट्रम्प म्हणाले की, माध्यमांकडे योग्य माहिती आहे की नाही याची मला खात्री नाही. परंतु, फ्लोरिडामध्ये आम्ही चांगली कामगिरी करत आहोत. नॉर्थ कॅरोलिनामध्येही आम्ही सरस आहोत. आयोवामध्येही तीच परिस्थिती आहे. त्याचबरोबर दुसरे टि्वट करुन त्यांनी अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात महत्त्वाची निवडणूक असल्याचे म्हटले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Us Presidential Election 2020 Donald Trump Says Election Campaign Is Going Good