सीमावादात चीनविरोधात अमेरिकेची भारताला साथ

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 मे 2020

चीनबरोबर सुरु असलेल्या सीमावादात अमेरिकेने भारताला साथ दिली आहे. पूर्व लडाखमध्ये विनाकारण तणाव निर्माण करणाऱ्या चीनला अमेरिकेने सुनावलं आहे.

नवी दिल्ली : चीनबरोबर सुरु असलेल्या सीमावादात अमेरिकेने भारताला साथ दिली आहे. पूर्व लडाखमध्ये विनाकारण तणाव निर्माण करणाऱ्या चीनला अमेरिकेने सुनावलं आहे. दक्षिण चीनचा समुद्र असो किंवा भारतीय सीमा चीनची आक्रमकता फक्त शब्दांपुरती मर्यादीत नाही. चीनचे चिथावणीखोर आणि दुसऱ्यांना त्रासदायक ठरणारे वर्तन आपण पाहत आहोत. त्यातून चीनला आपल्या वाढत्या शक्तीचा नेमका कसा उपयोग करायचा आहे? हा प्रश्न निर्माण होतो, असे मत पत्रकारांशी बोलताना दक्षिण व मध्य आशियासाठीच्या अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी अ‍ॅलिस वेल्स यांनी व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

यापूर्वी भारत-चीनमध्ये सीमावाद झाले. त्यावेळी अमेरिकेने थेट भूमिका घेतली नव्हती. पण यावेळी अमेरिकेने चीनला थेट फटकारले आहे. यामागे कोरोना व्हायरस सुद्धा एक कारण आहे. कारण कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत चीन विरोधात मोठया प्रमाणावर संताप आहे. ट्रम्प प्रशासनाने तर या व्हायरसच्या फैलावासाठी चीनला जबाबदार धरले आहे.

नेमके प्रकरण काय?
भारताच्या पूर्व लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारत आपल्या हद्दीमध्ये रस्ता बांधणीचे काम करतोय. पण ते चीनला मान्य नाही. त्यावरुन हा वाद सुरु झाला आहे. पॅनगॉंग टीएसओ तलावाच्या उत्तरेला भारताकडून रस्ता बांधणीचे काम सुरु आहे. त्यावर चीनने आक्षेप घेतला आहे. चीन दावा सांगतो तिथून बऱ्याच लांब अंतरावर हे काम सुरु आहे. लष्करी ताकतीच्या बळावर शेजारी देशांचा आवाज दडपून टाकायचा ही चीनची रणनिती असल्याचे बोलले जात आहे.
--------
१९९९पासून आतापर्यंतच्या चक्रीवादळावर एक नजर
--------
भारताचा भूभाग आपल्या नकाशात दाखवण्याचं धाडस
--------
सोमवारपासून देशांतर्गत विमानसेवा सुरु होणार
---------
दक्षिण चीनमध्येही हीच परिस्थिती आहे. पण कुठल्याही परिस्थितीत चीनची दादागिरी खपवून घ्यायची नाही हीच भारताची भूमिका आहे. पाच मे रोजी पॅनगॉंग टीएसओ सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली होती. दोन्ही बाजूचे सैनिक यामध्ये जखमी झाले. तेव्हापासून लडाखमध्ये तणाव वाढत चालला आहे. चीनने त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागामध्ये रस्ता बांधला मग, आम्ही आमच्या भागामध्ये रस्ता बांधू शकतो अशी भारताची भूमिका आहे. हिंसाचार आणि वाढत्या तणावामुळे सध्या रस्त्याचे बांधकाम बंद करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US slams Chinas disturbing behaviour at India border