भारत-चीन सीमावादात ट्रम्प यांची एन्ट्री; म्हणाले, '...यासाठी अमेरिका तयार आहे!'

वृत्तसंस्था
Wednesday, 27 May 2020

जगभरातील बहुतेककरून सर्व देश कोरोनामुळे चीनला जबाबदार धरत आहेत. खास करून अमेरिकेने कोरोनाच्या महामारीला चीन कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

वॉशिंग्टन : लडाखच्या सीमेवर चीनकडून सुरु असलेल्या कुरापतींमुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. त्यानंतर बुधवारी (ता.२७) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीन यांच्यात मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लडाख येथील भारत आणि चीनच्या सीमेवर मागील काही दिवसांपासून तणावपूर्ण वातावरण आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लडाखच्या गल्वान परिसरातील रस्त्याच्या बांधकामाला चीनने आक्षेप घेत, भारत सीमारेषेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप चीनने केला होता. तर भारताने हे आरोप फेटाळून लावत हा रस्ता भारताच्या आधीन असलेल्या भूभागावरच बांधला असल्याचे म्हटले होते. यानंतर सीमारेषेवरील वादग्रस्त भूभागावरून भारत आणि चीन यांच्यातील सैन्याच्या जवानांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार देखील पुढे आला होता.

हेही वाचा : कोरोनाच्या संकटात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना 'या' टिप्स घ्या लक्षात​

त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी ट्विट करत भारत आणि चीन यांच्यातील वादात अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी या ट्विट संदेशात भारत आणि चीनच्या सध्या सीमेवरील सुरू असलेल्या वादात अमेरिका मध्यस्थी करण्यास इच्छुक आणि सक्षम असल्याचे म्हणत दोन्ही देशांना याबाबत कळवल्याचे म्हटले आहे. 

वैज्ञानिकांना मोठे यश; covid-19 ला निष्क्रिय करणाऱ्या दोन जीवाणूंचा शोध

यापूर्वी देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीरबाबत मध्यस्थी करण्यास अमेरिका तयार असल्याचे म्हटले होते. त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या वक्तव्यावर भारत सरकारने नाराजी व्यक्त करत, सिमला करारानुसार काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा असल्याचे ठामपणे सांगत मध्यस्थी नाकारली होती.

- 'चीनी ड्रॅगन आणि भारतीय हत्ती...'; भारत-चीनमधील तणावपूर्ण परिस्थितीबद्दल चीनी राजदूत काय म्हणाले पाहा

दरम्यान, कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे जगभरात चीनची कोंडी झाली आहे. अशातच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या लष्करास युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. जगभरातील बहुतेककरून सर्व देश कोरोनामुळे चीनला जबाबदार धरत आहेत. खास करून अमेरिकेने कोरोनाच्या महामारीला चीन कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. तर लडाख प्रकरणावरून चीनचे भारतासोबत विवाद सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: USA is willing to mediate the border dispute between India and China says Donald Trump