तालिबाविरोधात आवाज बुलंद; शेकडो नागरिक रस्त्यांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

taliban

तालिबाविरोधात आवाज बुलंद; शेकडो नागरिक रस्त्यांवर

काबूल : अफगाणिस्तानमधील सत्ता सहज ताब्यात घेतलेल्या तालिबानला जनतेकडून विरोध वाढतो असून आज अनेक शहरांमध्ये नागरिकांनी निदर्शने केली. जनतेला त्रास न देण्याचे जाहीर करणाऱ्या तालिबानी दहशतवाद्यांनी गर्दीला पांगविण्यासाठी केलेल्या गोळीबारात काही जणांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अफगाणिस्तानला १९१९ मध्ये आजच्याच दिवशी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यदिनी तालिबान्यांना उघड विरोध करत आज अनेक शहारांमध्ये नागरिक देशाचा झेंडा हातात घेत मोठ्या संख्येने रस्त्यांवर उतरले होते. ‘आमचा झेंडा, हीच आमची ओळख’ अशा घोषणा ते देत होते. अनेकांनी तालिबान्यांचा झेंडा फाडून टाकला.

हेही वाचा: तालिबानी राजवटीत जनतेचे मरण

याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. काही ठिकाणी तालिबान्यांनी जमावावर गोळीबार केला. या गोळीबारात काही जणांचा मृत्यू झाला. कुनार प्रांताची राजधानी असलेल्या असादाबाद येथे हजारो लोक अफगाणिस्तानचा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरले होते. त्यांना पांगविण्यासाठी तालिबान्यांनी गोळीबार केला. यामुळे निर्माण झालेल्या गोंधळात काही जणांचा मृत्यू झाला.

मात्र, गोंधळामुळे चेंगराचेंगरी होऊन मृत्यू झाला की, गोळी लागल्याने ते मृत्युमुखी पडले, हे समजू शकलेले नाही. काल (ता. १८) जलालाबाद येथेही नागरिकांनी तालिबानला विरोध करत मोर्चा काढला होता. त्यांच्यावर झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला. तालिबान्यांविरोधात आवाज उठवत स्वत:ला देशाचे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून जाहीर केलेले अमरुल्ला सालेह यांनी नागरिकांच्या मोर्चांना पाठिंबा जाहीर केला आहे. ‘या लोकांनी राष्ट्रीय झेंडा फडकावत देशाचा सन्मान कायम राखला आहे,’ असे त्यांनी ट्विटरवर सांगितले.

हेही वाचा: एका नागरिकाला घेऊन विमान रोमानियाला परतले

मदतीची हाक :

अफगाणिस्तानमधील तालिबान्यांच्या विरोधातील गटाचे नेते अमद मसूद यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये लेख लिहित पश्‍चिमेकडील देशांकडे मदतीची मागणी केली आहे. तालिबानच्या अद्याप ताब्यात न गेलेल्या पंचशीर खोऱ्यात मसूद आणि इतर नेत्यांचे वास्तव्य आहे. ‘मी पंजशीर खोऱ्यातून हा लेख लिहित आहे.

आम्ही पुन्हा एकदा तालिबानोविरोधात लढा देण्यास सज्ज झालो आहोत. आमच्या या लढ्यात पश्‍चिमेकडील देशांनी मदत करावी,’ अशी मागणी मसूद यांनी केली आहे.

विमानतळ परिसरात गोंधळ :

काबूल शहर सध्या शांत असले तरी विमानतळ परिसरात गोंधळाचे वातावरण आहेत. हजारो लोक देश सोडून जाण्याच्या तयारीने विमानतळाकडे धाव घेत आहेत. त्यांच्यात चेंगराचेंगरी होऊन किंवा तालिबान्यांच्या गोळीबारात तीन दिवसांत बारा जणांचा मृत्यू झाला आहे. आम्हाला कोणालाही मारायचे नाही, ज्यांच्याकडे विदेशात जाण्यासाठीची कागदपत्रे नाहीत, त्यांनी घरी जावे, असे आवाहन तालिबानने केले आहे.

हेही वाचा: भारताचे यूएनमधील भाषण

"अनेक लोकांना विमानतळापर्यंत पोहोचण्यात अडथळा येत असल्याने नियोजित तारखेनंतरही आमचे सैन्य काबूलमध्ये थांबू शकते. अद्यापही अमेरिकेचे १५ हजार नागरिक अफगाणिस्तानात अडकून पडले आहेत.'' - ज्यो बायडेन, अध्यक्ष, अमेरिका

Web Title: Voices Against The Taliban Hundreds Of Civilians On The Streets

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Afghanistantaliban