
फेसबुक सध्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवर राजकीय आणि 'हेट स्पीच' बाबत काटेकोर लक्ष ठेवत असल्याचं दिसत आहे, असं असतानाही भाजपच्या पोस्टकडे कानाडोळा करत असल्याचा रिपोर्ट समोर आला आहे.
भारतात फेसबुकची भाजपशी अघोषित 'युती'; अमेरिकेतील वर्तमानपत्राचा धक्कादायक रिपोर्ट
वॉशिंग्टन - फेसबुक (facebook) सध्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवर राजकीय आणि 'हेट स्पीच' बाबत काटेकोर लक्ष ठेवत असल्याचं दिसत आहे, असं असतानाही भाजपच्या (BJP) पोस्टकडे कानाडोळा करत असल्याचा रिपोर्ट वॉल स्ट्रिट जर्नलने दिला आहे. त्यात म्हटलं आहे की, रोहिंग्या मुस्लिमांना ठार मारावं अशी पोस्ट करणाऱ्या भाजपच्या टी राजा सिंग (T Raja Singh) यांचे अकाउंट अजूनही फेसबुकवर आहे. जगभरातील फेसबुकच्या माजी आणि सध्याच्या कर्मचाऱ्यांनी अशा पोस्ट आणि खातं डिलिट करायला हवं असं म्हटलं आहे.
अमेरिकेतील रेडिओ होस्ट ऍलेक्स जोन्स, नेशन ऑफ इस्लामचे नेते लुईस फर्राखन आणि इतर कट्टरपंथी संघटनांच्या फेसबुक अकाउंटवर कारवाई केल्याच्या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे. टी राजा सिंग हे भाजपचे नेते असून अद्यापही ते फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सक्रीय दिसतात. त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. फेसबुकच्या भारतातील पब्लिक पॉलिसी एक्झिक्युटीव अन्खी दास (Ankhi das) यांनी टी राजा सिंग आणि किमान तीन इतर हिंदुत्ववाद्यांच्या पोस्टविरोधात हेट स्पीच रूल लागू करण्यास विरोध केला असंही फेसबुकच्या जुन्या आणि नव्या कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.
अन्खी दास यांच्या कामाचा एक भाग चक्क फेसबुकच्या वतीने भारत सरकारचा उदो उदो करणं असल्याचाही दावा काही कर्मचाऱ्यांनी केला. त्यांनी असंही म्हटलं की, जर मोदींच्या पक्षातील कोणी नियमांचे उल्लंघन केलं आणि त्यांच्याविरोधात कारवाई केली तर कंपनीला देशात मोठं नुकसान सहन करावं लागेल. फेसबुकला सर्वाधिक युजर भारतातून मिळतात असंही दास यांनी बजावल्याचं कर्मचारी सांगतात.
हे वाचा - भारताच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानच्या वेबसाईटवर 'जय श्रीराम'!
फेसबुकसमोर मुख्य समास्या आहे ती म्हणजे पॉलिसी org ही प्लॅटफॉर्मचे नियम आणि सरकारला खूश करणे या दोन्हीसाठी जबाबदार असते असं फेसबुकचे माजी मुख्य सुरक्षा अधिकारी अॅलेक्स स्टॅमोस यांनी मे महिन्यात एका ट्विटमध्ये म्हटलं होतं. वॉल स्ट्रीट जर्नलने अमेरिकेसंदर्भात लिहिलेल्या एका आर्टिकलचा त्यांनी उल्लेख केला होता. त्यांच्या म्हणण्याला फेसबुकच्या पब्लिक पॉलिसी डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्यांनी दुजोरा दिला होता.
अमेरिकेत फेसबुक आरोपीच्या पिंजऱ्यात
अमेरिकेत फेसबुक पॉलिसी कंटेंटची मोठी अडचण झाली आहे. अनेकदा राजकीय पक्षपात केल्याचा आरोप फेसबुकवर झाला. काही बड्या कंपन्यांनी, जाहिरातदारांनी त्यांच्यावर बहिष्कारही टाकला. दरम्यान, फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी म्हटलं होतं की, कंपनी त्यांचा प्लॅटफॉर्म कधीच हिंसा भडकावण्यासाठी किंवा लोकशाहीच्या प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी वापरू देणार नाही. असं कृत्य सहन केलं जाणार नाही. दुसरीकडे मे महिन्यात ट्रम्प यांच्यावरून प्रश्न विचारल्यावर झुकरबर्ग यांनी म्हटलं होतं की, लोकांना समजलं पाहिजे की राजकारणी काय म्हणत आहेत. मात्र यातील काही गोष्टींकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत.
हे वाचा - कमला हॅरिस यांच्यापेक्षा भारतीयांचं माझ्यावर जास्त प्रेम- डोनाल्ड ट्रम्प
टी राजा सिंग यांच्या प्रकरणात पक्षपात
सध्या फेसबुकमध्ये काम करत असलेल्या आणि माजी कर्मचाऱ्यांनी म्हटलं की, टी राजा सिंग यांच्यावतीनं दास यांनी केलेला हस्तक्षेप हा एक प्रकारे मोदींसह भाजप आणि कट्टर हिंदू लोकांबाबत केला जाणारा पक्षपातच आहे. फेसबुक प्रवक्त्या अँडी स्टोन यांनी मान्य केलं की दास यांनी मुद्दा उपस्थित केला होता की टी राजा सिंग यांच्यावर कारवाई केल्यानं काय परिमाम होतील. मात्र केवळं त्यांचे म्हणणे कंपनीच्या निर्णयात महत्वाचं ठरत नाही. फेसबुक अजुनही त्यावर विचार करत आहे.
जगातील कोणत्याही पक्षाचा किंवा इतर विचारधारेकडे लक्ष न देता हिंसाचार किंवा हेटस्पीचवर कंपनीकडून बंदी घातली जाते. दिल्लीत झालेल्या हिंसाचारावेळी अशा प्रकारच्या पोस्ट हटवण्यात आल्या होत्या हेसुद्दा त्यांनी सांगितलं. या प्रकरणावर दास किंवा टी राजा सिंग तसेच राजकीय पक्षांकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. पंतप्रधान कार्यालयाच्या प्रवक्त्यांनीसुद्धा यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
(Edited By - Suraj Yadav)