Breaking : WHO कडून Pfizer-BioNTech लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 January 2021

या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.  

जागतिक आरोग्य संघटनेने आज गुरुवारी फायझर-बायोनटेक (Pfizer-BioNTech) लशीच्या आपत्कालीन वापराला मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.  

याआधी ब्रिटनने 8 डिसेंबर रोजी या लशीला मान्यता देऊन लशीकरणाची मोहीम सुरु केली आहे. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि इतर युरोपियन युरोपिअन देशांनीही या लशीला मान्यता दिली आहे. गेल्या एका वर्षापासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरस विरोधातील पहिली लस म्हणून आपत्कालीन वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेने मंजूरी दिली आहे. 

हेही वाचा - अमेरिकेत चोवीस तासात कोरोनाचे ३,७०० बळी

कोरोनाविरोधातील लढाईसाठी एक सकारात्मक पाऊल म्हणून ही मंजूरी आहे, असं आरोग्य संघटनेच्या मारियानगेला सिमाओ यांनी एका निवेदनात म्हटलं. पण साऱ्या जगाची गरज भागविण्यासाठी पुरेशा प्रमाणात लशीचा पुरवठा होण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्याची आणखी गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. 
आरोग्य संघटनेने म्हटलंय की आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आल्याने विविध देशांमधील नियामकांना लशीचे आयात आणि वितरण मंजूर करण्यासाठीचा मार्ग मोकळा होत आहे.

याबाबत याआधी जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या तज्ज्ञ तसेच जगभरातील इतर तज्ज्ञांनाही फायजर-बायोटेकच्या लशीच्या सुरक्षा, दर्जा तसंच इतर गोष्टींची पडताळणी करण्यासाठी सांगितलं होतं. यादरम्यान फायजर-बायोटेकची लस सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या निकषावर योग्य असल्याचं समोर आलं. तसंच करोनामुळे निर्माण होणारे धोके लशीमुळे दूर होत असल्याचंही सांगण्यात आलं.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WHO approved emergency validation to Pfizer BioNTech vaccine

Tags
टॉपिकस
Topic Tags: