ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं, जय हनुमान ! धन्यवाद भारत

सकाळ ऑनलाइन टीम
Saturday, 23 January 2021

जागतिक अडथळा दूर करण्याच्या प्रयत्नात सहभागी असलेला एक चांगला साथीदार मिळाल्याचा ब्राझीलला अभिमान आहे.

नवी दिल्ली- संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी विविध उपाय करत आहे. जगातील अनेक देशांमध्ये लसीकरणास सुरुवात झाली आहे. तर अनेक देश असेही आहेत जे कोरोना लसीची वाट पाहत आहेत. अशावेळी भारत जगातील इतर देशांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. भारताने आतापर्यंत सौदी अरेबिया, भूतान, मालदिव, सेशेल्स, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मोरक्को, बांगलादेश आणि म्यानमारसारख्या देशांना लाखोंच्या संख्येने लसीचे डोस पाठवले आहेत. 

भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचे अभियान सुरु आहे. जगभरातून याचे मोठे कौतुक केले जात आहे. यासर्वांमध्ये भारताकडून पाठवण्यात आलेली लस ब्राझीलमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो यांना इतका आनंद झाला आहे की त्यांनी भारताचे आभार मानताना हनुमान संजीवनी घेऊन जात असलेला फोटो शेअर केला आहे. भारताने ब्राझीलला 20 लाख कोविड लसीचे डोस पाठवले आहेत. 

हेही वाचा- खळबळजनक! ट्रॅक्टर रॅलीत 4 शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट? सिंघू सीमेवर संशयिताला आंदोलकांनी पकडले

राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांनी टि्वटमध्ये म्हटले की, जागतिक अडथळा दूर करण्याच्या प्रयत्नात सहभागी असलेला एक चांगला साथीदार मिळाल्याचा ब्राझीलला अभिमान आहे. ब्राझीलला कोविडवरील लसीच्या रुपात मदत करण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर त्यांनी हनुमानांचा संजीवनीच्या रुपात लस घेऊन जात असल्याचा फोटोही टि्वटरवर शेअर केला. 

हेही वाचा- Bird Flu Alert: अंडी-चिकन खाताना कोणती काळजी घ्याल? जाणून घ्या 10 मुद्दे

दरम्यान, ब्राझीलला कोरोनाचा मोठा फटका बसलेला आहे. त्यांच्या देशात आतापर्यंत कोरोनाने 86.97 लाखांचा आकडा पार केला आहे. तर सुमारे 2.14 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारताने शुक्रवारी ब्राझील आणि मोरक्कोला लसीची पहिली खेप पाठवली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President of Brazil Bolsonaro shared a photo of Hanuman and thanked to India for sanjeevni booti against Covid