अमेरिकेत वारे मतदानाचे आणि भयाचेही

America-Election.
America-Election.

मतदानानंतर हिंसाचार होण्याच्या शक्यतेने बंदोबस्त वाढवला
वॉशिंग्टन - अमेरिकेचा अध्यक्ष निवडण्यासाठी आज ‘इलेक्शन डे’ला देशभरात लोकांनी मतदान केले. अनेक ठिकाणी लोकांनी रांगा लावून मतदान केले. यंदा विक्रमी मतदान होण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही लोकशाहीच्या या सर्वोच्च उत्सवात अमेरिकेत उत्साहाऐवजी भीतीचे वातावरण पसरले आहे. अमेरिकेत आज मतदान संपल्यानंतर (भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे) रस्त्यांवर हिंसा होण्याची शक्यता असल्याने अमेरिकेतील प्रमुख शहरांमधील व्यापारी संकुले, मॉल आणि दुकाने येथे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिका सरकारने महत्त्वाच्या सरकारी संस्थांना सावधानतेचा इशारा दिला असून अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या ‘व्हाइट हाऊस’ बाहेरही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. ‘व्हाइट हाऊस’च्या कुंपणाची भींतही उंचावण्यात आली आहे. न्यूयॉर्क, बोस्टन, मॅनहटन, वॉशिंग्टन, शिकागो आणि इतर अनेक शहारांमधील दुकानदार आणि व्यावसायिक आपल्या दुकानांबाहेर लाकडाच्या फळ्या लावून तात्पुरते संरक्षण मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. असे चित्र अमेरिकेत प्रथमच दिसत असून यंदाची निवडणूक ही सर्वाधिक फुटीचे राजकारण झालेली निवडणूक म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. 
मतदानाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत गेल्या काही दिवसांत शस्त्रविक्रीही मोठ्या प्रमाणात झाल्याचे अहवाल आहेत. खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच काल ट्वीट करताना पेनसिल्वानियामधील मतमोजणीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हिंसाचार होऊ शकतो, असे म्हटले होते. 

समर्थक गोळा होणार
मतदानानंतर आज लगेचच मतमोजणी सुरु होणार असल्याने दोन्ही बाजूंचे समर्थकांशिवाय ‘ब्लॅक लाइव्हज्‌ मॅटर’ या चळवळीतील कार्यकर्तेही वॉशिंग्टनमध्ये विविध ठिकाणी गोळा होणार आहेत. जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिस अत्याचारात मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत ‘ब्लॅक लाइव्हज्‌ मॅटर’ या चळवळीने जोर धरला असून गेल्या दोन महिन्यात अनेक ठिकाणी हिंसाचारही झाला आहे. देशात या वर्षी झालेल्या हिंसाचार आणि लुटालुटीच्या घटनांमध्ये दुकानदारांचे आतापर्यंत एक अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.

कमला हॅरीस यांना अमेरिकेची पहिली महिला अध्यक्ष व्हायची इच्छा आहे. बायडेन यांना मतदान न करण्याचे हेदेखील एक कारण आहे. कोण कमला? तुम्हाला माहिती आहे का?
- डोनाल्ड ट्रम्प, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार

नागरिकांमध्ये चिंता
अध्यक्षांनीच हिंसाचाराची शक्यता वर्तवल्याने आणि निवडणूकीच्या संभाव्य निकालाबाबतही साशंकता व्यक्त केल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. अमेरिकेत सध्या निवडणुकीच्या मुद्दयावरून अनिश्‍चितता आणि संभ्रमाचे वातावरण आहे. स्थानिक नेत्यांनी मात्र, सर्व प्रकारच्या घटनांसाठी प्रशासन सज्ज असल्याचे म्हटले आहे.

कमला हॅरीस यांची हवा
वॉशिंग्टन :
डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्याकडे विविध वंशियांचे मते खेचण्यात उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांची मोलाची भूमिका असल्याचे मानले जात आहे. कमला हॅरीस यांनी रिपब्लिकन पक्षाच्या बालेकिल्ल्यांमध्ये जोरदार प्रचार करताना मतदारांना इतिहास बदलण्याचे आवाहन केले. ‘महिला ओबामा’ अशी ओळख असलेल्या हॅरीस यांचे वडिल आफ्रिकी आणि आई भारतीय वंशाची असल्याने या दोन्ही वंशाचे लोक त्यांच्याकडे आकृष्ट होताना दिसत आहेत. 

टेक्सासमध्ये रिपब्लिकन पक्षाला धक्का
ह्युस्टन : संसर्गाच्या काळात ह्युस्टनमध्ये ठिकठिकाणी उभारलेल्या ड्रॉप बॉक्समध्ये जमा झालेली १ लाख २७ हजार मते अवैध ठरविण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत या पक्षाला धक्का दिला आहे. निवडणुकीत अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या टेक्सास प्रांतात १४ लाख जणांनी आगाऊ मतदान केले असून येथे रिपब्लिकन पक्षाला पराभवाची छाया दिसत आहे. येथे ड्रॉप बॉक्समध्ये जमा झालेल्या सुमारे सव्वा लाख मतांची मोजणी करू नये, अशी मागणी करणारी याचिका केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळून लावली.

प्रशासनाचा निर्णय रद्द
शिकागो : सरकारी सुविधा घेणाऱ्या किंवा अन्नासाठी कूपन घेणाऱ्या स्थलांतरीतांना ग्रीन कार्ड नाकारण्याचा नियम सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. यामुळे मतदानाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प सरकारला धक्का बसला आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com