esakal | लस घेतल्यावर वंध्यत्व येईल का ते दारु पिलं तर चालेल का? अशा प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

बोलून बातमी शोधा

लस घेतल्यावर वंध्यत्व येईल का ते दारु पिलं तर चालेल का? अशा प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर
लस घेतल्यावर वंध्यत्व येईल का ते दारु पिलं तर चालेल का? अशा प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोना काळात असे अनेक प्रश्न आहेत, जे तुम्हालाही भेडसावत असतील. कोरोनाचा दुसरा डोस घेण्यामध्ये जर उशीर होत असेल तर काय केलं जावं? कोरोनाचा दुसरा डोस दुसऱ्या एखाद्या कंपनीचा घेतला जाऊ शकतो का? हे आणि असे अनेक प्रश्न सध्या तुम्हाला सतावत असतील. या प्रश्नांचीच उत्तरे मिळवण्याचा आपण प्रयत्न करु.

1. जर लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाचं संक्रमण झालं तर दुसरा डोस किती उशीरा घेऊ शकतो? ऍपवर उशीरा रजिस्ट्रेशन होऊ शकतं का?

रजिस्ट्रेशन फक्त एकदाच करायचं आहे, दुसऱ्या डोससाठी याची गरज नाही. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस घेण्याची वेळ 6 ते 8 आठवड्यांची आहे. मात्र जर एखाद्याला पहिल्या डोस नंतर संक्रमण झालं तर बरे झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्यांच्या दरम्यान दुसरा डोस घेऊ शकतो.

2. एका कंपनीची लस घेतल्यानंतर दुसरा डोस फायझर अथवा मॉडर्ना वा अन्य एखाद्या कंपनीचा घेतला तर चालू शकेल का?

नाही, असं चालणार नाही. ज्या कंपनीचा पहिला डोस आहे, त्याच कंपनीचा दुसरा डोस घेतला जावा. दुसरा कोणताही घेऊ नये.

3. दुसऱ्या डोससाठी नव्या रेटनुसार पेमेंट करावं लागेल का?

सरकारी हॉस्पिटल्समध्ये लस सध्या फ्री आहे आणि 1 मेपासून देखील फ्री राहिल. सरकारी हॉस्पिटल्समध्ये सध्या 250 रुपये किंमतीचा एक डोस आहे. येत्या काही दिवसांत खासगी हॉस्पिटल्समध्ये लशीची किंमत वेगवेगळी असू शकते. हॉस्पिटल्सचा स्वत:चा दर असू शकतो. त्यामुळे त्यानुसार दर असू शकतो.

4. सगळ्यांनाच रजिस्ट्रेशन करावं लागेल का? की थेट जाऊन लस घेऊ शकतो?

नाही. सध्या 18 वर्षांवरील व्यक्तींना रजिस्ट्रेशनशिवाय लस मिळू शकत नाही. त्यांना रजिस्ट्रेशन करुनच लस मिळू शकते. सध्या थेट जाऊन रजिस्ट्रेशनशिवाय लस मिळू शकत नाही.

हेही वाचा: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कोरोनामुक्त; AIIMS मधून मिळाला डिस्चार्ज

5. लशीकरणासाठी आपला नंबर खूप लांबचा असेल आणि दुसरा डोस घेण्यामध्ये उशीर होत असेल, तर काय करावं?

लशीच्या दुसऱ्या डोसची वेळ 4 ते 12 आठवड्यांची आहे. या काळातच दुसरा डोस घेण्याचा प्रयत्न करा. याहून अधिक वेळ लावल्यास पहिल्या डोसचा प्रभाव कमी होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला आवश्यक प्रमाणात एँटीबॉडी मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात.

6. मासिक पाळीदरम्यान महिला लस घेऊ शकतात का?

मासिक पाळीदरम्यान महिला-युवती लस घेऊ शकतात. त्याचा आणि लशीकरणाचा काहीही संबंध नाहीये.

7. लस घेतली तर महिलांना वंध्यत्व येऊ शकतं का?

अशा प्रकारच्या अफवांवर लक्ष देऊ नका. लस घेतल्यानंतर वंध्यत्व येण्याबाबत कसलाही पुरावा नाहीये. कोरोनावरील लस घेतल्यानंतर या प्रकारच्या कसल्याही अडचणी नाहीयेत. लस फक्त विषाणू विरोधात सुरक्षा प्रदान करण्यासाठी आहे.

8. लस घेतल्यानंतर जिम करु शकतो का?

ज्याठिकाणी इंजेक्शन दिलं जातं तिथं थोड्या वेदना होतात. त्यामुळे लस घेतल्यानंतर लगेचच जिमला जाऊ नये. काही दिवस जिमला जाणे टाळावे. त्याचप्रकारे ताप आल्यास देखील जिमला जाऊ नये.

9. लस घेतल्यानंतर दारू पिऊ शकतो का?

यासंदर्भात काही गाईडलाईन्स तर नाहीयेत. मात्र, एका आठवड्यांपर्यंत अल्कोहोल न घेणं योग्य ठरेल.