सेलिब्रिटी फिटनेस  : ध्यान व योगातून सुदृढता! 

sonali shewale
sonali shewale

सध्याचे युग मोठ्या धावपळीचे आहे. त्यातच गेल्या सात ते आठ महिन्यांपासून आपण कोरोनाशी लढा देत आहोत. या काळात प्रत्येकालाच फिटनेसचे महत्त्व पटले असले. आपले शरीर फिट आणि मन हेल्दी राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मी स्वतः त्याचे तंतोतंत पालन करते. मी चौथीत असल्यापासून नृत्य करत होते व त्याचवेळी मला योगाची गोडी लागली. आताही मी दिवसाची सुरुवात योगसाधनेनेच करते. त्यासाठी मी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान उठते. रिकाम्या पोटी सर्व साधना केल्याचा फायदा मिळतो. योग साधनेमध्ये शांभवी, महामुद्रा, सूर्यक्रिया, अंग मर्दनी, भूत शुद्धी या वेगवेगळ्या क्रिया करते. तसेच, प्राणायाम व ध्यानधारणा करते. शांभवी महामुद्रा दररोजच करते. बाकीच्या क्रिया आलटूनपालटून करते. 

योगसाधनेमुळे अध्यात्म प्रगती होते. सध्या मी ध्यानधारणा व श्‍वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित केले आहे. या दोन गोष्टींमुळे मन आणि शारीरिक शांती मिळते. 

मी योगसाधना माझ्या गुरूंकडून शिकले. योगसाधना शास्त्रशुद्ध पद्धतीनेच करायची असते. त्यासाठी गुगल व यू-ट्यूबवरील व्हिडिओ पाहून उपयोग नाही. मला लहानपणापासूनच नृत्याची आवड आहे. मी अभिनय क्षेत्रामध्येही आहे. योगसाधनेचा मला नृत्यामध्ये खूप फायदा होतो. माझा स्टॅमिना वाढतो आणि माझ्यात जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे नृत्य करताना वा भरपूर काम केल्यावरही थकवा जाणवत नाही. क्रिया आणि योगसाधनेमुळे ताणतणाव कसा दूर करायचा, याचेच धडे मिळतात. अभिनय क्षेत्रामध्ये कधी काम असते, तर कधी नसते. कोरोनाच्या काळामध्ये सर्वच कलाकार घरी होते. अशावेळी अनेकांना ताण-तणाव व नैराश्यही येत होते. पण, ध्यानधारणा व योगसाधनेमुळे मला प्रचंड फायदा झाला. सूर्यनमस्काराचाही खूप फायदा होतो. हल्ली करिअर आणि आयुष्याचा मेळ बसवावा लागतो. अनेकजण करिअरलाच आयुष्य मानतात. मात्र, या दोन गोष्टी एकत्र करू नये. 

माझा आहारही खूप सात्त्विक आहे. मी शुद्ध शाकाहारी आहे. माझ्या आहारामध्ये फळे, सॅलड, डाळी, सुकामेवा यांचा समावेश असतो. प्रोटीनसाठी मी कोणतीही पावडर घेत नाही. दिवसभरात सहा लीटर पाणी पिते. माझा नाश्ता व जेवण सकाळी अकरा वाजता होते. संध्याकाळी पाच-सहा वाजता मी रात्रीचे जेवण करते. रात्री दहा वाजता झोपते आणि सकाळी चार वाजता उठते. मी पहिल्यापासूनच योगासने, प्राणायाम करत असल्यामुळे माझे वजन संतुलित राहते. त्यामुळे कोणत्याही भूमिकेसाठी मला वजन कमी व जास्त करण्याची वेळ आली नाही. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकेत मी पार्वतीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी जशी शरीरयष्टी हवी होती तशीच माझी शरीरयष्टी आहे. या सर्व गोष्टी योगसाधनेमुळे शक्य झाल्या. त्यामुळे सर्वांनी आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यावे. तेच तुम्हाला आयुष्यभर कामी येईल. 

(शब्दांकन : अरुण सुर्वे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com