फिटनेस कॉर्नर : फरक खेळ आणि व्यायामातील...

फिटनेस कॉर्नर : फरक खेळ आणि व्यायामातील...

‘आम्ही स्वतंत्र व्यायाम करण्याऐवजी मैदानी खेळ खेळतो,’ असे काहीजणांना बोलताना तुम्ही ऐकले असेल. टेनिस, बॅडमिंटन, बास्केटबॉल आदी खेळ खेळणे हे दररोज व्यायाम करण्यासारखेच आहे, असा विचार ते करतात. मात्र, हे गृहीतक बरोबर नाही. कसे ते पाहूयात. मुळात कोणताही मैदानी खेळ खेळणे आणि व्यायामामध्ये मूलभूत फरक आहे. कोणताही खेळ (उदा. व्हॉलीबॉल किंवा बॅडमिंटन) ही एक प्रकारची कौशल्याधारित कृती असते. खेळामध्ये तुमची कामगिरी चांगली होण्यासाठी तुम्ही तंदुरुस्त असणे गरजेचे असते.

तुम्ही अशा प्रकारे तंदुरुस्त नसल्यास खेळ खेळताना जखमी होण्याची शक्यता खूपच अधिक असते. त्याचप्रमाणे, तुम्ही ‘अनफिट’ असल्यास खेळात कौशल्य मिळविणे किंवा स्वत:ला खेळाडू म्हणून विकसित करणेही अवघड असते. त्यामुळेच, कोणत्याही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या दिनक्रमात फिटनेस किंवा व्यायाम हा अविभाज्य घटक असतो. आता तुम्ही मला विचाराल की, मी बॅडमिंटन खेळताना काही कॅलरींचे ज्वलन नक्कीच होते. निश्‍चितच. तुम्ही यावेळी अशी कृती करत असता जी तुमच्या हृदयाची गती वाढवते, त्यामुळे तुम्ही निश्चितपणे काही कॅलरींचे ज्वलन करता. मात्र, ते इष्टतम आहे का, तुमच्या शरीरासाठी ते पुरेसे आहे का आदी प्रश्न आपण स्वत:ला विचारले पाहिजेत.

मी येथे तुम्हाला असे विचारते की, कोणताही खेळ खेळल्यामुळे तुमच्या शरीराची ताकद (स्ट्रेंथ), क्षमता (स्टॅमिना), लवचिकता (फ्लेक्झिबिलीटी) सारख्याच प्रमाणात विकसित होते का? मी मध्यंतरी जागतिक टेनिस क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या नोवाक जोकोविचबद्दल वाचले होते. तो दररोज जवळपास दीड तास स्ट्रेचिंग करतो, कोणत्याही सामन्यापूर्वीही ४५ मिनिटे स्ट्रेचिंग करतो. तुम्हाला याबद्दल काय वाटते? तो सर्वाधिक वेगाने सर्व्हिस परतवणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो. यावेळी, तो बॉलपर्यंत पटकन पोचण्यासाठी आपले दोन्ही पाय एकमेकांपासून खूप ताणू शकतो. अर्थात, यासाठी त्याला खूप लवचिकतेची गरज असते. तो लवचीक असल्यामुळेच पाय स्ट्रेच करून प्रतिस्पर्ध्यांपर्यंत क्षणार्धात बॉल परतवू शकतो. एवढी लवचिकता त्याने टेनिस खेळताना विकसित केलेली नाही. तुमच्या लक्षात आले का, कोणताही खेळ खेळताना अँड्रेलिन निर्माण होते, मन:शांती लाभते, स्पर्धात्मक वृत्ती विकसित होते आणि हो, तुमच्या मित्रांना भेटण्याची संधीही मिळते, हे मला मान्य आहे. तुम्ही रिकाम्या वेळेत खेळत असल्यास खेळ ताणतणावही दूर करतो. तरीही, तो संपूर्ण शारीरिक व्यायामाला चांगला पर्याय आहे, असे म्हणणे व्यायामाच्या फायद्यांकडे दुर्लक्ष करण्यासारखे ठरते. तुम्ही वरील कारणांसाठी खेळ निश्चितच खेळायला हवा. मात्र, आठवड्यातून किमान तीन दिवस फक्त व्यायामाला वेळ द्या, असा माझा सल्ला आहे. (समाप्त)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com