रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी 'या' गोष्टी कराच

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी 'या' गोष्टी कराच

- सायली जोशी-पटवर्धन

कोरोना व्हायरसने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. अजूनही हा आजार पूर्णपणे गेलेला नाही. याबरोबरच पावसाळा, पूरस्थिती आणि बदलते हवामान त्यामुळे आरोग्याच्या इतरही अनेक तक्रारी वाढत आहेत. या परिस्थितीचा सामना करायचा असेल आणि लहान-मोठ्या आजारांपासून आपली सुटका करायची असेल तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यानीच आपली प्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक आहे. तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर अनेकदा काही आजारांपासून बचाव होऊ शकतो. ही प्रतिकारशक्ती व्यक्तीगणिक वेगळी असते, ती वाढवायची असेल तर सुरुवातीपासूनच कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी जाणून घेऊया...

१. नियमित व्यायाम करणे हा प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्याचा एक उत्तम उपाय आहे. व्यायामामुळे शरीरातील स्नायू तर बळकट होतातच पण ताकद वाढण्यासही मदत होते. त्यामुळे नकळत प्रतिकारशक्ती उत्तम राहण्यास मदत होते.

२. वारंवार अँटीबायोटिक्स घेणे हे प्रतिकारशक्ती कमी करण्याचे एक महत्त्वाचे कारण ठरु शकते. एखादा अवयव दुखला की पेनकीलर घेणे, साधे सर्दी-पडसे झाले तरी डॉक्टरांकडे जाऊन अँटीबायोटीक्स घेणे यामुळे शरीराला औषधांची सवय लागते आणि शरीराची स्वत:ची प्रतिकारशक्ती नकळत कमी होते. त्यामुळे सामान्य समस्या घरगुती उपायांनी बऱ्या करण्यावर भर दिल्यास प्रतिकारशक्ती टिकून राहण्यास मदत होते.

३. आहार हा आरोग्याच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा घटक आहे. प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह, खनिजे, तंतूमय पदार्थ असे शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक मिळतील असा चौरस आहार घेतल्यास प्रतिकारशक्ती चांगली राहते. यासाठी आहारात दूध व दुधाचे पदार्थ, पालेभाज्या, फळे, सलाड, कडधान्ये, डाळी अशा सर्व गोष्टींचा पुरेशा प्रमाणात समावेश असावा.

४. झोप हा प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. दररोज ७ ते ८ तास इतकी पुरेशी झोप घेतल्यास आरोग्याच्या तक्रारी नकळत कमी होतात आणि प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी 'या' गोष्टी कराच
सुशील किंवा सुशीलकुमार नाव असेल तर तुम्हाला मिळणार मोफत पेट्रोल

५. आवळा, लिंबू, तुळस या गोष्टी घरात किंवा बाजारात सहज उपलब्ध असतात. आवळ्याचे चूर्ण, च्यवनप्राश, मोरावळा, आवळा कँडी दररोज खाल्ल्यास प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच आहारात लिंबाचाही समावेश करावा. तुळशीमध्येही शरीराला आवश्यक असे अनेक महत्त्वपूर्ण घटक असतात, त्यामुळे तुळशीची पाने कच्ची, चूर्ण, चहामध्ये घेतल्यास त्याचा निश्चितच फायदा होते.

६. योगासने हा भारतीय परंपरेतील एक उत्तम व्यायामप्रकार आहे. सूर्यनमस्कार किंवा काही विशिष्ट योगासनांमुळे शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहण्यास मदत होते. त्यामुळे नियमित योगासने करावीत.

७. मानासिक,शारिरिक वा सामाजिक ताणतणाव तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर घातक परिणाम करतात. दिर्घकाळ तणावाखाली राहिल्याने शरीरात काही हानीकारक हार्मोन्सची निर्मिती होते. त्यामुळे  शरीरातील रोगप्रतिकारक पेशी कमकुवत होतात आणि रोगप्रतिकारशक्ती ढासळते. त्यामुळे मानसिक व शारीरिक ताणांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.

८. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित असणे अतिशय महत्त्वाचे असते. अनेकदा धावपळीत आपण पाणी पिण्याचे विसरतो. किंवा बाहेर असताना लघवी लागेल म्हणून पाणी पिणे टाळतो. मात्र त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहीजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com