आजही साता-यात घडताहेत उद्याचे बास्केटबॉलपटू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 डिसेंबर 2019

सातारा आणि बास्केटबाॅल खेळाचे दृढ नाते आहे. हे नाते निर्माण करण्यात (कै.) रणजीत गुजर यांचे महत्वपुर्ण याेगदान आहे. आजही सातारा जिल्ह्यातून अनेक दिग्गज खेळाडू घडत आहेत. (कै.) गुजर यांचा वारसा कुटुंबातील अर्निका, मिथीला, राेहन, जिज्ञासा हे केवळ जाेपासात नाहीत तर वृद्धींगत करीत आहेत.

सातारा : साता-यातील (कै.) रणजित गुजर बास्केटबॉल अकादमीचे एकाच वेळी एक-दोन नव्हे ... तब्बल 11 खेळाडू देशभरात विविध ठिकाणी होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धांतून चमकत आहेत. यातील यश राजेमहाडिक 19 वर्षांखालील मुलांच्या संघाचे नेतृत्व करत आहे. साता-यातील रणजीत बास्केटबॉल अकादमीची अवघ्या तीन  वर्षांतील वाटचाल जितकी दैदिप्यमान आहे, तितकीच ती रोमांचकारी !

हेही वाचा - Video देशातील शाळांमध्ये फिट इंडियाची धूम

सातारा म्हटलं की आठवतो अजिंक्यतारा किल्ला, कंदी पेढा आणि अलीकडे अलीकडे कास पठार ... परंतू आणखी एक गोष्ट सातारा या नावाला अनंत काळापासून जोडली आहे, ती म्हणजे बास्केटबॉल !

(कै.) रणजीत गुजर यांनी साधारण 35 वर्षांपुर्वी साता-याला बास्केटबॉल या खेळाची 
अोळख करुन दिली. नंतर हा खेळ त्यांनी परिश्रमपूर्वक जोपासला, रुजवला अन् वाढवला. सन 1991 मध्ये बार्शी येथून स्पर्धा संपवुन येत असताना अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बास्केटबॉलचे राष्ट्रीय प्रशिक्षक रोहन गुजर वडीलांचा वारसा पुढे चालवत आहेत. साता-यात 2016 मध्ये रणजीत गुजर यांच्या नावाने राेहन याने बास्केटबॉल अकादमी सुरु केली. आज सातारा पालिकेच्या श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकूलात अनेक मुले-मुली बास्केटबाॅलचे प्रशिक्षण घेत आहेत.

अवश्य वाचा -  अन प्रेक्षकांनी घेतले मैदान डाेक्यावर ; जय शिवाजी...जय कर्मवीरचा नारा

अकलूज व सातारा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत 14 व 19 वर्षांखालील वयोगटात रणजीत अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या सातारा इंग्लिश मिडीयम स्कूल आणि यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट आॅफ सायन्सच्या मुलांच्या संघांनी कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करताना विजेतेपदे तसेच 14 वर्षाखालील मुलींच्या गटात उपविजेतेपद पटकाविले. 

या अकादमीमधील कुणाल शिराळे, ध्रुव निकम, अथर्व परदेशी, ईफा इनामदार, ईश्वरी कुंभार, सिद्धी शिंदे, यशराज राजेमहाडिक, तेजराज मांढरे, विवेक बडेकर, दिप अवकिरकर व सिद्धी बादापुरे अशा ११ खेळाडूंची पाँडीचेरी, दिल्ली व छत्तीसगड येथील
राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली.

यंदा विक्रम नाेंदविला गेला 

एकाच वेळी 11 खेळाडूंची राज्य बास्केटबाॅल संघात निवड हाेणे हा राज्यातील आगळावेगळा विक्रम मानावा लागेल. विशेष म्हणजे यशराज राजेमहाडिक याने १९ वर्षांखालील गटात दुस-यांदा महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषवित चमकदार कामगिरी केली.

जरुर वाचा -  Video राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत तमिळनाडू, छत्तीसगड, महाराष्ट्र अव्वल 

विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक सामन्यांचा जास्तीतजास्त अनुभव मिळावा म्हणून पुणे, मुंबई सारख्या महानगरांमध्ये होणा-या स्पर्धांतून  अकादमीचे संघ पाठविले जाताे. या खेळाडूंचा पोषणआहार, सांघिक भावना व एकाग्रता विकास या बाबींवर  अकादमी विशेष लक्ष देते. 

बास्केटबॉल खेळाचा प्रसार व्हावा, खेळात मुलांचे करिअर घडावे या हेतूने रणजीत अकादमीची मुहूर्तमेढ रोवली. आमच्याकडे सध्या चार वर्षांवरील विद्यार्थी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत रोजचा सराव करतात. 
रोहन गुजर, बास्केटबॉलचे राष्ट्रीय प्रशिक्षक

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contribution OF Ranjit Gujar Family To Develop Basketball In Satara Is Strong