शोध स्वतःचा : ...सवयींचे संवर्धन!

देवयानी एम.
Tuesday, 26 January 2021

एखादी लहान सवय बदलायला प्रचंड मानसिक ताकद लावावी लागते, आणि झालं नाही तर हिरमोड होतो. सवय आपल्याला कंट्रोल करतेय असं वाटतं, कारण काळाबरोबर त्या आणखीन कडक आणि ऑटोमॅटिक होऊ लागतात.

लहानपणापासून ऐकत आलेला एक शब्द म्हणजे सवय. ‘ही सवय लावली पाहिजे, ती सवय सोडली पाहिजे,’ असं कायम आपल्याला पालक, शिक्षक, मित्र-मैत्रिणी किंवा आपला आतला आवाज सांगत असतो. याला ‘हो ना, खरंच करायचंय..’ असंच आपण म्हणत राहतो. सवय बदलणे इतकं अवघड का आहे? बुद्धीला पटत असून मन आपलं का बरं ऐकत नाही? याचं कारण आपलं मन हट्टी आहे! त्याचबरोबर आपली बुद्धी भोळ्या आईसारखी वागते. ती विसरते की त्याला दोन रट्टे मारण्याचा तिला हक्क आहे.

सवय म्हणजे नक्की काय? तर दीर्घकाळ आणि वारंवार केलेली एखादी गोष्ट हळूहळू स्वयंचलित होते, म्हणजेच आपल्या मेंदूमध्ये त्याचं हार्ड वायरिंग होतं, तेव्हा तिचं सवयीत रूपांतर होतं. एक वेळ अशी येते की एखादी लहान सवय बदलायला प्रचंड मानसिक ताकद लावावी लागते, आणि झालं नाही तर हिरमोड होतो. सवय आपल्याला कंट्रोल करतेय असं वाटतं, कारण काळाबरोबर त्या आणखीन कडक आणि ऑटोमॅटिक होऊ लागतात.

शोध स्वतःचा : ...तो राजहंस एक!

आता शास्त्रीयदृष्ट्या पाहूया की एखादी सवय बदलणे अवघड का आहे! उदाहरणार्थ चहा किंवा कॉफीचं अतिसेवन. ते प्यायल्यावर आलेली तल्लफ आपल्याला आवडते. हे आवडणं आपला मेंदू लक्षात ठेवतो आणि पुन्हा असं वाटावं यासाठी तीव्र इच्छा निर्माण करतो. असं हे चक्र चालूच राहतं. चांगल्या-वाईट दोन्ही सवयींची आपल्या मेंदूमधील प्रक्रिया अशीच चालते.

एखादी चांगली सवय लावायची असल्यास स्वतःला कशी मदत करता येईल ते पुढील चार D''s मध्ये पाहू. उदा. वाचन

निश्चय (Determination) 
कोणतेही कर्म आधी विचारांच्या-निश्चयाचा रुपात जन्माला येतं. आदल्या रात्री किंवा सकाळी उठल्यावर तुमचा दिवस कसा असणार आहे याची कल्पना तुम्हाला येतेच. तेव्हाच ठरवा दिवसातला कोणता वेळ वाचनासाठी बाजूला काढणार आहात. ती वेळ येईपर्यंत स्वतःला आठवण करत राहा आणि ठरलेली वेळ झाली ती स्वतःचा शब्द पाळा आणि पुस्तक हातात घ्या.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्यत्यय (Distractions) 
तुमच्या कामात व्यत्यय आणणाऱ्या सर्व गोष्टी, जसे लॅपटॉप, टीव्ही इत्यादी बंद ठेवा आणि फोन सायलेंट करून किंवा डेटा ऑफ करून नजरेच्या टप्प्यात येणार नाही असा ठेवून द्या. याचं कारण प्रत्येक वेळी मेसेज किंवा नोटिफिकेशन आलं की लक्ष त्याकडं जाऊन फोन पहावासा वाटतो. महत्त्वाचं काही असल्यास लोक फोन करतील, मेसेज व सोशल मीडिया जरा वेळ थांबू शकतात. नुसता फोन सायलेंट केला आणि जवळ ठेवला तर ''काही आलय का'' हे पहावसं वाटतं म्हणून फोन नजरेआड ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ध्येयाचे विभाजन (Division of goals) 
कोणतेही मोठे ध्येय साध्य करण्यासाठी त्याचे छोटे-छोटे भाग करा.  उदा. वाचनाला सुरुवात करताना पहिले पुस्तक तुमच्या आवडीच्या विषयाचं निवडा. लहान, कमी पानांचं पुस्तक निवडा म्हणजेस ते संपवणं टप्प्यात आहे असं वाटेल आणि वाचून संपल्यावर आत्मविश्वास वाढेल. कुठेही गेलात तरी पुस्तक बरोबर ठेवा. दिवसात किती पानं वाचायची हेही टार्गेट ठरवून ठेवा. सुरू करताना माफक टार्गेट ठेवा. पहिल्याच दिवशी ‘आज मी पन्नास पानं वाचेन’ असं ठरवलं आणि झालं नाही तर दुसऱ्या दिवशी या ध्येयपूर्तीची नकारात्मकता आणि हिरमोड वाचनापासून दूर घेऊन जाईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नियमितता (Discipline) 
आज एक पुस्तक, उद्या दुसरं असं नको, आज वाचलं उद्या नाही असंही नको. पुन्हा दुसऱ्या दिवशी वाचनाची वेळ अशीच ठरवा आणि पहिल्या मुद्द्यापासून म्हणजे निश्चयापासून सुरू करा. असं  २१ दिवस सतत केल्यास त्याचं सवयीत रूपांतर होईल आणि पुढं  तीन महिने हे टिकवून ठेवल्यास ती सवय कायमस्वरूपी जीवनशैलीचा भाग बनेल. सवय लावणं किंवा बदलणं तितकंही अवघड नाही, सुरुवात करणं हे सर्वात मोठं आव्हान असतं. आपलं मन ‘राई का पहाड’ करण्यात पटाईत असतं आणि आपण गोष्टींचा उगीच धसका घेतो. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी सुरुवातीला ‘मना सज्जना..’ असं मनाला अंजारून-गोंजारून पुढं मनाच्या २०५ श्लोकात वेळोवेळी ‘नको रे मना..’ म्हणत शिस्त लावून खडसावतातही...

(लेखिका योगऊर्जा या संस्थेच्या संस्थापिका आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devyani m writes about habits Determination Distractions Division of goals Discipline

Tags
टॉपिकस
Topic Tags: