नका करू जिभेकडे दुर्लक्ष, ती आहे तुमच्या आरोग्याची रक्षक!

टीम ई सकाळ
Friday, 20 November 2020

कर्करोगासारखे मोठे आजार सुरुवातीला शरीराला जास्त हानी पोचवत नाही, ही बाब ध्यानात ठेवण्यासारखी आहे. महत्त्वाचं म्हणजे, अनेकदा आपली जीभ लाल पडते किंवा अधिक मऊ होते. अशावेळी आपण सावधगिरी बाळगायला हवी. विटामिन बी-१२ आणि आयरनच्या कमतरतेमुळेही जीभ मऊ पडू शकते.

नागपूर : दररोज आपल्या दिनचर्येची सुरुवात तोंडाच्या स्वच्छतेपासून अर्थात दात घासण्यापासून होते. आपण दात घासत असताना कधी जीभेकडे बघितले आहे काय? ती स्वच्छ आहे की अस्वच्छ, तिचा रंग कसा आहे वगैरे वगैरे. नाही, नक्कीच अनेक जीभेच्या आरोग्याकडे लक्षसुद्धा देत नाही. तुम्हाला माहिती असेल आपली प्रकृती बरी नसल्यावर आपण डॉक्टरकडे जातो, तेव्हा डॉक्टर सर्वप्रथम आपल्याला जीभ बाहेर काढायला सांगतात. म्हणजेच या जीभेवरून डॉक्टरला आपल्या आरोग्याविषयी माहिती मिळते, इतके महत्त्व जीभेच्या स्वच्छतेचे आहे. याच जीभेविषयी आपल्याला माहिती जाणून घ्यावयाची आहे.

रोज सकाळी आणि रात्री झोपताना आपण दात साफ करीत असतो. हे करीत असताना आपण आपल्या जिभेच्या रंगाकडे लक्ष दिल्यास समजेल की, जिभेवर सकाळच्या सुमारास असणारे रंग काही विशेष गोष्टींना सूचित करतात. याचाच अर्थ जिभेवरील रंगच आपल्या आरोग्यविषयक बाबी दर्शवितात. त्यामुळे तुम्ही जर जिभेच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असाल तर ही मोठी चुक ठरू शकते. ज्याप्रमाणे आपली जीभ ही आहाराच्या चवीची जाणीव करून देते त्याचप्रमाणे हीच जीभ आपल्याला आपल्या आरोग्याचीही जाणीव करून देत असते.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

तुम्ही जेव्हा कधी डॉक्टरांकडे जाता तेव्हा डॉक्टर सर्वप्रथम तुमच्या जिभेला बारकाईने न्याहाळतात. त्यामुळे हे सिद्धच होते की, जीभ ही आरोग्यविषयक अनेक गोष्टींची सूचक अवयव आहे. जिभेवरील पांढरे चट्टे किंवा लाल जखमा याबद्दल थोडसं जाणून घेऊ या. तुमच्या जिभेवर असे काही पांढरे छोटे खानी चट्टे किंवा लाल जखमा पडत असतील तर पोटासंबंधी गंभीर आजाराची शक्यता आहे.

पचनक्रियेतील गडबड जिभेवर स्पष्टपणे दिसून येते. अनेकदा अशाप्रकारचे लक्षणे ‘हार्पिज’ नावाच्या आजाराशीही निगडित असतात. हा आजार घरगुती उपायांनी बराही होतो. जिभेवर कमी प्रमाणात पांढऱ्या रंगाच्या तवंगांचं येणं जिभेच्या उत्तम स्थास्थ्याचं लक्षण ठरतं. परंतु अनेकदा हे तवंग अधिक काळ जिभेवर असल्याणं ते ‘कैंडिडा’सारख्या बुरशीजन्य (फंगस) आजारात बदललं जातं. पुढे चालून हे फंगल व यिस्ट इन्फेक्शन शरीरासाठी फारच घातक ठरू शकतं. त्यामुळे योग्यवेळी खबरदारी घेणंच उचित राहतं.

अधिक वाचा - 23 नोव्हेंबरपासून शाळा सूरू, शिक्षकांना कोविड चाचणी बंधनकारक!

यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे, जिभेवर सतत लाल रंगाचे चट्टे असल्यास हे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचं लक्षण समजलं जातं. अनेकदा हे चट्टे एखाद-दोन आठवड्यात ठीक होतात, तेव्हा त्यांची गांभिर्याने दखल घेण्याची आवश्यकता नाही. परंतु एक किंवा दीड महिन्यापेक्षा अधिक काळ जर हे लाल चट्टे जिभेच्या खालच्या किंवा वरच्या भागावर राहिले तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

कर्करोगासारखे मोठे आजार सुरुवातीला शरीराला जास्त हानी पोचवत नाही, ही बाब ध्यानात ठेवण्यासारखी आहे. महत्त्वाचं म्हणजे, अनेकदा आपली जीभ लाल पडते किंवा अधिक मऊ होते. अशावेळी आपण सावधगिरी बाळगायला हवी. विटामिन बी-१२ आणि आयरनच्या कमतरतेमुळेही जीभ मऊ पडू शकते.

क्लिक करा - फक्त दोन बोटांनी उचलता येणारी हलकी सायकल, पण किंमतीला आहे भारी

अशावेळी द्रव पदार्थ पितानाही जिभेला त्रास झाल्याचं जाणवतं. वेजिटेरियन लोकांमध्ये विटामिन बी-१२च्या कमतरतेची शक्यता अधिक असते. अनेकदा जिभेला भुरका रंग येतो किंवा जिभेवर थोड्याशा रेषा दिसायला लागतात. या गोष्टी नार्मल असू शकतात.

ज्याप्रमाणे आपण इतर अवयवांची काळजी घेतो, त्याचप्रमाणे जिभेची स्वच्छता ठेवणं, तिची काळजी घेणं ही बाब तितकीच महत्त्वाची आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आरोग्याच्या समस्या ओढवून घेणे होय. म्हणून आपण जिभेची योग्य काळजी घ्यायला हवी.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don't ignore the tongue read full story