Exam
ExamSakal

घडण-मंत्र : परीक्षा कोणाची?

शाळा आणि परीक्षा हे दोन शब्द आता समानार्थी आहेत, असे म्हटल्यास फारसे चुकीचे ठरणार नाही. विविध प्रकारच्या परीक्षा शाळेत सतत सुरू असतात.
Summary

शाळा आणि परीक्षा हे दोन शब्द आता समानार्थी आहेत, असे म्हटल्यास फारसे चुकीचे ठरणार नाही. विविध प्रकारच्या परीक्षा शाळेत सतत सुरू असतात.

- डॉ. भूषण शुक्ल

शाळा आणि परीक्षा हे दोन शब्द आता समानार्थी आहेत, असे म्हटल्यास फारसे चुकीचे ठरणार नाही. विविध प्रकारच्या परीक्षा शाळेत सतत सुरू असतात. शाळेतली प्रत्येक गोष्ट ही स्पर्धा किंवा परीक्षाच समजली जाते आणि त्याप्रमाणेच ‘लढवली’ जाते असे म्हणणेही चूक नाही. उदा. एखादा खायचा पदार्थ बनवून शाळेत आणा किंवा उद्या अमुक रंगाचा ‘दिवस’ साजरा करूया अशी मजेची कृतीसुद्धा ‘माझा पदार्थ ‘सगळ्यांपेक्षा’ जास्त छान झाला पाहिजे’ किंवा ‘मी त्या रंगाच्या सर्वांत जास्त वस्तू पेहेरल्या होत्या’ अशा प्रकारे स्पर्धेचे रूप घेतात. घरी आल्यावर या प्रकारची पद्धतशीर चौकशी पालकांकडून केली जाते आणि शाळासुद्धा एक किंवा दोन मुलांचा विशेष उल्लेख करून इतरांना हरल्याची भावना घरपोच करतात.

स्पर्धेचा विचार कराच

छोट्या शाळेतच ही सतत स्पर्धा आणि परीक्षेची भावना रुजते. शालेय आयुष्याचा प्रवास या केंद्रबिंदू भोवतीच होत असल्याने आपणसुद्धा शाळा सुरू होण्याच्या वयातच त्याचा विचार करूया. जी गोष्ट जन्मभर लढवायची आहे, त्याची तयारी सुद्धा लवकरच करायला हवी. अफ्टर ऑल, इट इस कॉम्पेटिटीव्ह वर्ल्ड, यु नो! परीक्षेबाबत सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पालकांचा उत्साह आणि स्पर्धा भावना कितीही उतू जात असेल, तरी मुलांची इच्छा, कष्ट करायची तयारी आणि परीक्षा देण्याची पद्धत यापुढे पालक हतबल असतात. हे सत्य सर्व हुशार पालकांना मुलांच्या पहिलीतच उमजते.

मुलांची स्पर्धेची इच्छा ही खूपशी जन्मजात असते. त्यामुळे अत्यंत निवांत पालकांच्या घरात कमालीची स्पर्धक मुले आणि अती स्पर्धक पालकांच्या घरात निवांत आनंदी मुले नेहमी दिसतात. पहिले येण्याचे खूप कौतुक करून, असे वागणाऱ्या इतर मुलांचा नेहमी विषय काढून किंवा सरळ सरळ बक्षीसे देऊ करून पालक मुलांची स्पर्धा, इच्छा वाढविण्याचा प्रयत्न करतात. आणि काही मुले त्याला तात्पुरता का होईना प्रतिसाद देतात. पण, बक्षिसावर जन्मलेला प्रतिसाद लवकरच खूप खर्चिक होऊन बसतो आणि साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा मुले अवास्तव मागण्या करायला शिकतात. नियमित काम करण्यासाठी सुद्धा लाच खाण्याचा आपला राष्ट्रीय छंद कदाचित अशा प्रकारे आपल्या कुटुंबातच जन्माला येत असावा.

सतत इतरांची उदाहरणे देणे हा प्रयत्न सुद्धा लवकरच उलटा पडतो. ‘तुम्हाला मी आवडतच नाही,’ असा समज होऊन मुले खट्टू होतात. डॉ राजेश नेहेते (मानसोपचातज्ज्ञ, लंडन) यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘‘मुलांना गरज प्रेमाची असते पण मिळते मात्र कौतुक.’’ काही मुले घरी आणि बाहेर मिळणाऱ्या या कौतुकाला खूप महत्त्वाचे समजू लागतात आणि ते सतत मिळवण्याचा ध्यास आयुष्यभर बाळगतात आणि सतत या स्पर्धेत पळत राहतात. त्यातले अनेक खूप यशस्वी सुद्धा होतात, पण अपयशाची कल्पनाही त्यांना असह्य वाटते.

आपल्या मुलाला या रस्त्यावर किती वेळ आणि कसे पळवायचे आणि त्याची सुरवात किती लवकर करायची हे ज्या त्या कुटुंबाने स्वतःसाठी ठरवावे.

कष्टाला पर्याय नाही...

चांगले यश मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतातच, त्याला काही पर्याय नाही आणि शॉर्टकट सुद्धा नाही. ही गोष्ट मुलांच्या गळी कशी उतरवायची? त्यांना यासाठी तयार कसे करायचे हा सर्व पालकांसमोरचा भलामोठा प्रश्न आहे. अत्यंत उत्साहात सुरवात करून लवकरच प्रयत्न सोडून देणारे मूल हे पालकांना मोठे कोडे वाटते. अनेकदा तर ‘यांना सगळे तयार मिळत म्हणून त्याची काही किंमत नाही. आमच्या लहानपणी....’ अशा प्रकारच्या रागाचे शब्द फुटतात.

परीक्षा देण्याची पद्धत ही एक वेगळीच गंमत आहे. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी तीसुद्धा जमावी लागते. मूल लहान असताना पालक स्वतःच्या डोक्यातून निघणाऱ्या अनेक कल्पना त्यांना सुचवून बघतात. नंतर तर ‘यशाची गुरुकिल्ली’ नावाने हे परीक्षा तंत्र शिकवणारी मंडळी गल्लोगल्ली उपलब्ध असतातच. पहिलीपासून केंद्रीय लोकसेवा आयोगापर्यंत प्रत्येक परीक्षेत अशा यशाच्या गुरुकिल्ल्या सर्व प्रकारच्या खिशांना विकत घेता येतील अशा प्रकारे बाजारात उपलब्ध आहेत.

आपण पालक म्हणून इच्छा, कष्ट आणि पद्धत याबाबतीत काय करू शकतो हे पुढच्या लेखात बघुया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com