घडण-मंत्र : टीचर : पहिली ‘अधिकारी’ व्यक्ती!

मोठ्या शाळेतल्या पहिल्या शिक्षिकांना लहान मुलांच्या मनात एक वेगळेच स्थान असते.
Teacher
TeacherSakal
Summary

मोठ्या शाळेतल्या पहिल्या शिक्षिकांना लहान मुलांच्या मनात एक वेगळेच स्थान असते.

- डॉ. भूषण शुक्ल

मोठ्या शाळेतल्या पहिल्या शिक्षिकांना लहान मुलांच्या मनात एक वेगळेच स्थान असते. आई, आजी, सांभाळणाऱ्या मावशी, छोट्या शाळेच्या ताई वगैरे मंडळींपेक्षा एक वेगळा थाट आणि अधिकार असलेली ही तशी आयुष्यातली पहिलीच व्यक्ती. दिसायला वगैरे आईसारखी, पण सर्व मुलांना एकसारखी वागवणारी. मृदू आवाजात पण खंबीरपणे काम करून घेणारी आणि वागणे बोलणे नियंत्रित करायला लावणारी ही एक व्यक्ती. पाच-सहा तासांची शाळा आणि अभ्यास म्हणजे बराच वेळ एका जागी बसणे, सांगितलेल्या सूचना नीट पाळणे आणि अभ्यासाची कौशल्ये शिकणे असा एक मोठा बदल या शिक्षिकेच्या देखरेखीखाली घडून येत असतो.

आदर्श समाजाची ओळख

नेहमीच्या आणि साध्या वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा नीटपणे परवानगी घेऊन कराव्या लागतात. उदा. तहान लागली तर पाणी प्यायला जाणे किंवा स्वतःची पाण्याची बाटली वापरणे, शी-शूला जाणे सुद्धा परवानगीशिवाय करता येत नाही. शिक्षिकेच्या परवानगीने सगळे करता येते, पण परवानगी घ्यावीच लागते. अशा प्रकारे अनेक तास शिस्तीत काढण्याचा हा पहिलाच अनुभव. मित्रांबरोबर खेळणे, बोलणे, भांडणे करणे यावरसुद्धा ‘टीचर’चे लक्ष असते आणि त्यांचा शब्द हा वर्गातला शेवटचा शब्द. त्यापलीकडे जाऊन दंगा करणाऱ्या मुलांना मोठ्या टीचरकडे पाठविण्याची शिक्षा होऊ शकते. पण वर्गात शिकवताना, गोष्ट सांगताना, गाणे-कविता म्हणताना, काही अडले, दुखले खुपले तर याच टीचर आईसारख्या मायेने सगळे व्यवस्थित करून देतात हा सुद्धा अनुभव असतोच. एकाच व्यक्तीची ही मृदू आणि कर्मकठोर बाजू एकाच वर्गात बघायला मिळणे आणि ती वर्गातल्या सर्व मुलांशी समान असणे हा एक वेगळा अनुभव असतो. आपल्याला खूप आपुलकीची पण एकसमान वागणूक मिळते आहे, हा अनुभव देणारी मोठी शाळा आणि त्यातल्या टीचर खऱ्या अर्थाने आदर्श समाजाची ओळख करून देतात.

इतक्या मोठ्या आणि तात्त्विक गोष्टी समजण्याचे हे वय नाही. पण अनुभव पक्का असतो आणि त्यातून येणारी समज सुद्धा पक्की असते.

अनोखे नाते

काही दिवसांनी पालक आणि मुले यांच्या नात्यात या टीचरचा एक वेगळाच प्रभाव दिसायला लागतो. आपले न ऐकणाऱ्या मुलाला टीचरच्या नावाने पालकांकडून दम दिला जातो आणि आपल्याला न करायच्या गोष्टी, ‘पण टीचरने असं नाही सांगितलंय.’ म्हणून मुलांकडून टाळल्या जातात. बहुतेक मुलांच्या मनात या पहिल्या टीचरला अगदी परमेश्वरासारखे स्थान असते. त्यांच्या समोर आपली ‘इमेज’ जपण्याचा आणि इतरांपेक्षा आपण जास्त चांगले आहोत असे दाखवण्याचा मुले आटोकाट प्रयत्न करतात. टीचरचा शब्द खाली पडू देत नाहीत. घरी उच्छाद मांडणारे मूल शाळेत एकदम ‘गुड बॉय/गर्ल’ असू शकते. न आवडणाऱ्या आणि पटणाऱ्या गोष्टी सुद्धा फक्त टीचरने सांगितल्या म्हणून पटकन केल्या जातात. बहुतेक आई-वडिलांसाठी हा आनंदाचा अनुभव असतो. शाळा आणि शिक्षण या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आपले मूल नीट रुळले याचे हे मोठे समाधान असते.

यात एक महत्त्वाचे पथ्य मात्र पाळावे लागते. अनेक प्राथमिक शिक्षकांकडून मला कळलेली ही गोष्ट आहे. शिक्षकांकडून दबाव आणून मुलाकडून काही गोष्टी करून घेणे हा तो नाजूक विषय.

अभ्यास वगैरेच्या बाबतीत टीचरची साक्ष काढणे ठीक, पण स्वच्छ्ता, जेवण, टीव्ही/मोबाईल वगैरेचा वापर या सर्व गोष्टीत टीचरचे नाव वापरणे आणि त्यांच्याकडे तक्रारी करून, ‘तुम्हीच सांगा, तुमचं सगळं ऐकतो,’ असा हट्ट धरणारे पालक म्हणजे टीचर्ससाठी मोठे धर्मसंकट असते. मुलांबरोबरच आपले नाते असल्या ‘सुपाऱ्या’ घेतल्यावर बिघडते याची अनुभवी टीचरला चांगलीच माहिती असते.

घरच्या गोष्टी घरच्यांनी आणि शाळेतल्या शाळेतल्या व्यक्तींनी कराव्यात, हेच खरे शहाणपण. त्यांनी हातमिळवणी करून मुलांना कोपऱ्यात पकडल्यास बरीच मुले दोघांचेही ऐकेनाशी होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com