रानभेंडी असली तरी चविला उत्कृष्‍ट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रानभेंडी असली तरी चविला उत्कृष्‍ट!

रानभेंडी असली तरी चविला उत्कृष्‍ट!

रानभेंडीला हुळी गौरी असेही म्हटले जाते. रानभेंडीचे झुडुप असून, तिला वाकडे काटे असतात. उष्ण कटिबंधात ही रानभेंडी सर्वत्र आढळते. विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र, कोकण, घाटमाथा इथे ती आढळते. फुले मोठी, पिवळी असून तळाशी जांभळा ठिपका असतो. खोडाच्या सालीपासून बळकट, पांढरा, लवचिक धागा मिळतो; परंतु काट्यांमुळे तो काढण्यास कठीण जाते.

पूर्वी गुऱ्हाळ घरात या रानभेंडीचा पाला, खोड चेचून गुळाच्या रसाच्या काहिलीत टाकले जात असे. जेणेकरून काहिलीमध्ये असलेल्या गुळात काही कचरा, पाचटाचे कण, सूक्ष्म माती असली तर ती गाळून पृष्ठभागावर येत असे. यानंतर हा कचरा बाजूला करून गूळ स्वच्छ केला जात असे. कालांतराने गूळ तयार करण्यासाठी नवनवी रसायने आली अन्‌ रानभेंडीचा वापर कमी होऊ लागला.

हेही वाचा: जागतिक ‘सीओपीडी’ दिन विशेष

रानभेंडी खायची असते, ते लोक भाजी, आमटीत वापर करतात. या रानभेंडीवर बारीक कूस असल्यामुळे जनावरे, शेळ्यामेंढ्या या भेंडीच्या झाडाला तोंड लावत नाहीत; मात्र ही भेंडी काढून नेहमीच्या भेंडीप्रमाणे भाजी केली तरी ती चविला उत्कृष्‍ट लागते.

प्रकार - रान भेंडी ,कापूर भेंडी ,भूर भेंडी

सुधारित वाण परभणी क्रांती, अर्का अनामिका, फुले कीर्ती, फुले उत्कर्षा, पुसा सावनी, कामिनी, पुसा मखमाली.

उपयुक्तता

  • ताप, सर्दी, खोकला, मूतखडा, अनेक घातक आजारांवर पारंपरिक पद्धतीने किंवा आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे रानभेंडीचे सत्व वापरले जाते; मात्र हे करत असताना आयुर्वेदतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

  • या रानभेंडीची लागवड कोणीही करत नाहीत. पूर्वी भेंडीची नवीन वाण तयार झालेले नव्हते, तेव्हा काहीजण या रानभेंडीचा अन्नात वापर करत असत.

-प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर, वनस्पतीतज्ज्ञ

माळरान, दगडी खाणी, जिथे पाऊस कमी पडतो अशा ठिकाणी रानभेंडीची झुडुपे दिसतात. कोल्हापूर परिसरात ती सर्वत्र दिसते. जूनमध्ये उगवायला सुरुवात होते. ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या दरम्यान रानभेंडीची फळे तयार होतात. पण, ती कुणीही खात नाहीत. ही भेंडी खायची असते, याची माहितीही कुणाला नाही. ही भेंडी चविला उत्कृष्‍ट असून, अनेक औषधीयुक्त तत्त्‍वांनी परिपूर्ण आहे.

- अमोल सावंत

loading image
go to top