तीन-चार फुलांच्या गटांमध्ये आढळते ब्रम्हकमळ : खोकला, सर्दी, कॅन्सरवर आहे गुणकारी

टीम ई सकाळ
Friday, 2 October 2020

ब्रह्मकमळ हे खरंतर उत्तराखंड राज्यातील फूल आहे. उत्तराखंडमध्ये पिंडारी, चिखला, रूपकुंड, हेमकुंडगंगा, केदारनाथ इथे ब्रह्मकमळ आपल्याला पाहायला मिळते. हिमाचल प्रदेशच्या काही भागात आणि काश्मीरमध्ये हे फूल उमलते

नागपूर - वर्षातून एकदाच उमलणारे फूल म्हणजे ब्रम्हकमळ. दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर या महिन्यामध्ये हे फूल उमलते. याचे धार्मिक महत्व सर्वांनाच माहिती आहे. मात्र, ब्रम्हकमळामध्ये औषधीय गुणधर्म असतात याबाबत बऱ्याच जणांना माहिती नसतं.

ब्रह्म कमळाच्या फुलात जवळजवळ 174 फॉर्म्युलेशन्स मिळतात. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. ब्रम्ह कमळाच्या पाकळ्यांमधून अमृताचे थेंब पडतात, असे मानले जाते. या पाण्याने थकवा दूर होतो. जुना सर्दी खोकला असेल तर त्यावर देखील आराम मिळतो. तसेच कॅन्सरसारखे गंभीर आजार देखील ब्रम्हकमळामुळे दूर होऊ शकतात. 

या राज्यांमध्ये उगवतो ब्रम्हकमळ -
ब्रह्मकमळ हे खरंतर उत्तराखंड राज्यातील फूल आहे. उत्तराखंडमध्ये पिंडारी, चिखला, रूपकुंड, हेमकुंडगंगा, केदारनाथ इथे ब्रह्मकमळ आपल्याला पाहायला मिळते. हिमाचल प्रदेशच्या काही भागात आणि काश्मीरमध्ये हे फूल उमलते. 

हेही वाचा - पोटाच्या विकारांपासून तर वजन कमी करण्यापर्यंत फायदेशीर बुरशीजन्य पदार्थ

ब्रम्हकमळाबद्दलची आख्यायिका -
ब्रम्हकमळ भगवान शंकाराच्या केदारनाथ आणि बद्रीनाथ येथील मंदिरातील पिंडीवर वाहिले जाते. भगवान विष्णू हिमालयात आल्यानंतर त्यांनी भगवान शंकराला १००० ब्रम्हकमळ चढवले होते. त्यातील एक फूल कमी झाले तेव्हा भगवान विष्णूने या फुलाच्या रुपात आपला एक डोळा शंकरांना समर्पित केला. यानंतर हिमालयामध्ये ठिकठिकाणी ब्रम्हकमळ उगवायला सुरुवात झाली, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे ब्रम्हकमळ केदारनाथच्या शंकराच्या पिंडीवर वाहिले की भगवान शंकर प्रसन्न होऊन प्रत्येक मनोकामना पूर्ण करतात, अशीही भक्तांची श्रद्धा आहे.

हेही वाचा - जागतिक गर्भनिरोधक दिवस : अनैच्छिक गर्भधारणा अन् त्यातून होणाऱ्या गर्भपाताचं प्रमाण का वाढतंय?

ब्रम्हकमळाच्या रोपाला संरक्षित दर्जा -
ब्रह्मकमळ हिमालयावर १३,००० ते १७,००० फुटांवर पाहावयास मिळते. या अस्सल ब्रह्मकमळाचे शास्त्रीय नाव सॉसूरिया ऑबव्हॅलाटा (Saussurea obvallata) हे आहे. सूर्यफुलाच्या कुळातील हे फूल असून जुलै-सप्टेंबरमध्ये या ब्रह्मकमळाचा बहर असतो. परंतु 'फुलांच्या दरीत' (व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये) आणि उत्तराखंडातील हेमकुंड साहेब येथे हे ब्रह्मकमळ जूनच्या शेवटच्या आठवड्यात हजेरी लावते. या फुलाचे वरचे टोक जांभळ्या रंगाचे असून पाकळ्या हिरव्या-पिवळ्या कागदी प्रदल मंडलात गुंडाळल्यासारख्या दिसतात. हिमवृष्टीतही मुख्य फुलाच्या आतील तीनचार छोट्या फुलांचे संरक्षण व्हावे यासाठी ही रचना आहे. हे ब्रह्मकमळ साधारणपणे एकटे-दुकटे नसते, ते तीन चार फुलांच्या गटांमध्येच आढळते. हे हिमालयातील फूल उत्तराखंड राज्याचे राज्यपुष्प आहे. बद्रीकेदारच्या आणि केदारनाथाच्या मंदिरात देवाला ब्रह्मकमळ वहायाची परंपरा आहे. त्यामुळेच याला देवपुष्प म्हणतात. सध्या दुर्मिळ होत चाललेले हे फूल वाचवण्यासाठी या ब्रह्मकमळाच्या रोपाला संरक्षित रोपाचा दर्जा देण्यात आला आहे.

संकलन आणि संपादन - भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health benefits of brahmkamal