आरोग्यदायी दुर्मिळ रानशेपूची भाजी 

healthy Ranshepu vegetable
healthy Ranshepu vegetable

चवीला उत्कृष्ठ अन्‌ विविध आयुर्वेदिक घटक असणारी शेपूची भाजी रानावनात, दगडात, दगडकोपऱ्यात, कातळांवर, माळरानात उगवते. या शेपूला दगडी शेपू असेही म्हणतात. कदाचित तुम्ही ही रानशेपू पाहिली असेल; पण अन्नात तिचा कसा उपयोग करायचा हे माहिती नसेल. 

सर्वसाधारपणे वर्षभर आपल्या भाजी बाजारात शेपूच्या पेंड्या विक्रीसाठी येतात. अनेकजण शेपू विकत घेत नाहीत. खातही नाहीत. शेपूची ढेकर अनेकांना पचणी पडत नाही; पण शेपू खूप औषधीदृष्ट्या महत्वाची आहे. 

असे म्हणतात, की एखादा गोड पदार्थ खाण्याआधी शेपूची भाजी खाल्ली तर ढेकर गोडपदार्थाची येत नाही ती शेपूच्या भाजीची येते. लहान मुले, अगदी वयस्क लोकही ही भाजी खात नाहीत. पण या शेपूच्या भाजीचा रानभाजी म्हणून उल्लेख होतो. वनस्पतीशास्त्राच्या काही पुस्तकांमध्ये "कड विड' असा उल्लेख रानभाज्यांच्या बाबतीत दिसतो. ही रानशेपू किंवा दगडी शेपू कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, पन्हाळा, चंदगड, गडहिंग्लज, शाहुवाडी, कागल, आजरा आदी भागात क्वचित दिसते. ही दगडी शेपू हातकणंगले, शिरोळ, सोलापूर, सांगली, पुणे जिल्ह्यातील काही भागात, विदर्भ, मराठवाडा इथे ही दगडी शेपू अधिक दिसते. ही शेपू आणण्यासाठी तुम्हाला भटकंती करावी लागेल. आगळवेगळी ही दगडी शेपू खाण्याची मुळात आवड हवी. 

पर्जन्यछायेच्या (कमी पाऊस) प्रदेशातील माळराने, भुंडे डोंगररांगा, खडक, दगडे, कातळ, खाणींच्या बाजूला ही दगडी शेपू असते. जिथे उन्हाळ्यात जास्त तापमान आहे, तिथे ही शेपू तयार होते. हलका पाऊस, धुक्‍यातून मिळणाऱ्या पाण्यावर ही शेपू उगवते. दगडी बेचक्‍यात ती दिसते. माती, पाणी एकत्र आले की, ही शेपू तयार होते. खडकांवर ही शेपू पसरत जाते. जाळी पद्धतीने तिची वाढ होत जाते. ही दगडी शेपू आणून वाळवून ठेवता येते. जेणेकरुन तुम्हाला वर्षभर जेवणात ती खाता येते. विशेषत: नदी किनारी, वाळू दगड असलेल्या भागातसुद्धा ती दिसते. ही शेपू बारीक करुन लोखंडाच्या तव्यावर टाकून तिखट, मीठ, चटणी, तेल टाकून खमंगपणे करता येते. चविला मस्त असल्याने भाकरी, चपाती बरोबर खाता येईल. 

"काही रानभाज्या कमी पावसाळी प्रदेशातही उगवतात. या भाज्या आणून तिची चव घेतली पाहिजे. ही दगडी शेपू जास्त पावसाळी वातावरणात येत नाही. जिथे पाऊस कमी येतो तिथे ती येते.''
 - प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर, वनस्पतीशास्त्रज्ञ

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com