फायदेशीर असूनही होमिओपॅथी उपचारपद्धती दुर्लक्षित का? काय सांगतात डॉ. पाटील

Tuesday, 6 October 2020

होमिओपॅथी एक सुरक्षित उपचारपद्धती आहे. मात्र, त्याबाबत पाहिजे तशी जनजागृती झाली नाही. त्यामुळे बऱ्याच जणांना माहिती नाही. अॅलोपॅथीमध्ये उपचार करताना आजारानुसार औषध दिलं जाते. मात्र, होमिओपॅथीमध्ये व्यक्तिमत्वावरून म्हणजेच रुग्णाची मानसिक आणि शारीरिक स्थिती बघून उपचार केले जातात.

नागपूर : कुठलाही आजार झाला तर सर्वसामान्यपणे अॅलोपॅथी औषधांकडे आपला कल असतो. पण,  याच काळात एका फायदेशीर उपचारपद्धतीकडे आपले दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. ही उपचार पद्धती म्हणजे होमिओपॅथी. यामुळे आजार हळूहळू बरा होत जातो. परंतु, रुग्ण पूर्णपणे बरा होतो. मात्र, सार्वजनिक आरोग्यसेवेत होमिओपॅथी डॉक्टरांचा समावेश नाही. तसेच रिसर्च सेंटर उपलब्ध नसल्याने होमिओपॅथीकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत ऑरेंज सिटी होमिओपॅथ असोसिएशनचे अध्यक्ष आणि आयुष टास्क फोर्स ऑन कोविड (महाराष्ट्र) चे सदस्य डॉ. मनीष पाटील यांनी व्यक्त केली. 

होमिओपॅथी एक सुरक्षित उपचारपद्धती आहे. मात्र, त्याबाबत पाहिजे तशी जनजागृती झाली नाही. त्यामुळे बऱ्याच जणांना माहिती नाही. अॅलोपॅथीमध्ये उपचार करताना आजारानुसार औषध दिलं जाते. मात्र, होमिओपॅथीमध्ये व्यक्तिमत्वावरून म्हणजेच रुग्णाची मानसिक आणि शारीरिक स्थिती बघून उपचार केले जातात.  केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर आरोग्य मंत्रालयाचे दोन विभाग करण्यात आले. ते म्हणजे आयुष आणि हेल्थ मिनिस्ट्री. 

हेही वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला
 

त्यामधून होमिओपॅथीला चांगले दिवस येतील, असे वाटले होते. मात्र, आयुषमध्ये आयु्र्वेदिक, युनानी, होमिओपॅथी यांसारख्या उपचार पद्धतीचा समावेश होतो. त्यामुळे येणाऱ्या निधीपैकी जास्तीत जास्त निधी आय़ुर्वेदावर खर्च होतो. कारण, होमिओपॅथीला स्वतंत्र संचलनालय नाही. त्यामुळे अद्यापही होमिओपॅथी उपचार पद्धती दुर्लक्षितच असल्याची खंत डॉ. पाटील यांनी व्यक्त केली. 

कोविडच्या काळात रुग्णांना आर्सेनिक अल्बम हे औषध देण्यात आले. तोपर्यंत ते औषध परिचित नव्हते. पण, गुजरात आणि केरळसारख्या राज्यांमध्ये होमिओपॅथीचे शासकीय रुग्णालय, महाविद्यालय असल्याने त्याठिकाणी या औषधाला प्रमोट करण्यात आले. त्यामुळे केरळमध्ये रुग्णांची संख्या कमी असल्याचे डॉ. पाटील म्हणाले.

अधिक माहितीसाठी - घरात स्मार्ट टीव्ही वापरताय? तर आत्ताच व्हा सावध, अन्यथा येणार डोक्याला हात लावायची वेळ
 

भारतात होमिओपॅथी कशी पोहोचली 

होमिओपॅथीचा जन्म जर्मनीत झाला. सॅम्युअल हॅनिमेन हे होमिओपॅथीचे जनक होते. पण, जर्मनीमधून भारतात होमिओपॅथी पोहोचली कशी? हादेखील एक प्रश्नच आहे. बंगालमध्ये एक श्रीमंत राजा होता. त्याच्यावर उपचार करण्यासाठी भारतात होमिओपॅथी आणली गेली. त्यानंतर त्याठिकाणी होमिओपॅथीसाठी कायदाही करण्यात आला. 

महाराष्ट्रात होमिओपॅथीचा प्रवेश

राजर्षी शाहू महाराजांच्या काळात महाराष्ट्रात होमिओपॅथी दाखल झाली. महाराजांवर होमिओपॅथीचे उपचार केले गेले. त्यानंतर शाहू महाराजांनीच महाराष्ट्रात पहिले होमिओपॅथी रुग्णालय सुरू केले. होमिओपॅथीसाठी १९७३ ला केंद्रीय कायदा मंजूर झाला. पण, पाहिजे त्या प्रमाणात होमिओपॅथीचा विकास झाला नाही. शासनाने कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांसाठी होमिओपॅथीच्या डॉक्टरांना खेड्यात पाठविले. मात्र, याठिकाणी होमिओपॅथी औषधांचा पुरवठाच होत नाही. त्यामुळे होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथी उपचार पद्धतीने उपचार करावे लागतात. यामुळेच जनतेपर्यंत होमिओपॅथी पोहोचलेली नाही.  

रिसर्च सेंटर नसल्यामुळे होमिओपॅथी दुर्लक्षित 
होमिओपॅथीमध्ये शासकीय पदनिर्मितीच नाही. पदभरतीचे नियमच नाहीत. त्यामुळे गावोगावी होमिओपॅथी पोहोचली नाही. तसेच होमिओपॅथीसाठी रिसर्च सेंटर नाही. त्यामुळे होमिओपॅथीचा आपल्या देशात विकास झाला नाही. त्यासाठी विभागीय स्तरावर रिसर्च सेंटर उभारणे गरजेचे आहे. विदर्भाचा विचार केल्यास या परिसरात सिकलसेल आणि अस्थमाचे रुग्ण आढळून येतात. याठिकाणी होमिओपॅथीचे रिसर्च सेंटर आल्यास या दोन्ही आजारांवर होमिओपॅथीच्या माध्यमातून चांगलं औषध तयार होऊ शकते.
- डॉ. मनीष पाटील, अध्यक्ष, ऑरेंज सिटी होमिओपॅथ असोसिएशन 

होमिओपॅथीचे मूलभूत नियम   

  • औषध व आजारामध्ये समानता असावी
  • कितीही प्रकारचे आजार असले तरी एकच औषध द्यावे
  • कमीत कमी औषध मात्रा वापरावी
  • व्यक्तीपरत्वे मानसिक आणि शारीरिक अभ्यास करून औषधांची निवड करणे
  • रोग बीज म्हणजे रोगाचे कारण जाणून घेणे.

या बाबींचा अभ्यास करूनच औषध देणे बंधनकारक करण्यात आले आहे. होमिओपॅथीच्या गोळ्या तयार करण्यासाठी मेंढी किंवा बकरीच्या दुधापासून पावडर तयार करतात. त्यानंतर त्यामध्ये औषधाचा अर्क टाकला जातो. त्याच्या साबुदाण्याच्या आकाराच्या गोळ्या तयार केल्या जातात. होमिओपॅथी औषधांमुळे या गोळ्या चवीला गोड असतात.     

होमिओपॅथी औषधाचे फायदे 

  • या औषध घेतल्यानंतर कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाही
  • हे सर्वात स्वस्त औषध असतं.
  • होमिओपॅथी औषधांचे गर्भधारणेदरम्यानही सेवन करता येते
  • चवीला गोड असल्याने लहान बाळांवर उपचारासाठी उत्तम 

संकलन आणि संपादन - भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Homeopathic treatment neglected despite being beneficial