नवजात बाळांसाठी का वापरलं जातं कांगारु केअर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवजात बाळांसाठी का वापरलं जात कांगारु केअर?

नवजात बाळांसाठी का वापरलं जात कांगारु केअर?

बदलती जीवनशैली, आहार पद्धती किंवा अन्य काही कारणांमुळे अनेक स्त्रियांची वेळीपूर्वीच डिलिव्हरी होते. त्यामुळे सध्याच्या काळात अनेक नवजात बालकांचा जन्म सातव्या किंवा आठव्या महिन्यातच होतांना दिसतो. यामध्येच गेल्या काही काळापासून वेळेपूर्वी जन्म झालेल्या बालकांना कांगारू केअर (kangaroo care) थेरपी दिली जात आहे. यात वजन कमी असणे, बाळ अशक्त असणे अशा बालकांनी ही थेरपी दिली जाते. ही थेरपी म्हणजे काय किंवा या उपचारपद्धतीमुळे नेमकं काय होतं हे इंडियन अकॅडेमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या (आयएपी) डॉक्टर नवीन बजाज यांनी सांगितलं आहे. (How kangaroo care and skin to skin contact)

कांगारू केअर ही नवजात बाळांची काळजी घेण्याची एक पद्धत आहे. खासकरून ज्या बाळांचे जन्माच्या वेळचे वजन कमी असते त्यांच्यासाठी कांगारू केअरचा उपयोग केला जातो. यामध्ये बाळाला त्याच्या पालकांच्या उघड्या छातीशी घट्ट कवटाळून ठेवले जाते, अशाप्रकारे पालकांच्या त्वचेशी बाळाच्या त्वचेचा थेट संपर्क होत राहतो (skin to skin contact), सर्व नवजात बाळांच्या बाबतीत या पद्धतीचा अवलंब केला जाऊ शकतो. अतिशय प्रभावी आणि वापराच्या दृष्टीने खूपच सोप्या अशा या पद्धतीमुळे बाळांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, प्रीटर्म आणि नॉर्मल प्रसूती होऊन जन्मलेल्या बाळांच्या तब्येतीची नीट काळजी घेण्यासाठी कांगारू केअर हे तंत्र उपयुक्त ठरते.

हेही वाचा: उपाशीपोटी चुकूनही करु नका 'ही' ४ काम!

कांगारू केअर कोण देऊ शकते?

बाळाची कांगारू केअर पद्धतीने काळजी घेण्यासाठी बाळाची आई ही सर्वोत्तम व्यक्ती असते. पण इतर कोणतीही व्यक्ती, बाळाचे वडील किंवा कुटुंबातील जवळची व्यक्ती (बाळाला जबाबदारीने हाताळू शकतील अशी भावंडे, आजी-आजोबा, काकी, मावशी, आत्या, मामी, काका, मामा यांच्यापैकी कोणीही) बाळाला कांगारू केअर देऊन आईच्या जबाबदारीतील काही वाटा उचलू शकतात. कांगारू केअर देणार असलेल्या व्यक्तीने स्वच्छतेच्या काही मूलभूत नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असते.

कांगारू केअरची सुरुवात केव्हा करावी?

कांगारू केअर किंवा ‘त्वचेचा त्वचेशी संपर्क’ तंत्राने बाळाची काळजी घेण्याची सुरुवात बाळाच्या जन्मापासूनच करावी आणि पुढे ठराविक कालावधीत सुरु ठेवता येऊ शकते.

कांगारू केअरचा कालावधी किती असावा?

कांगारू केअर किंवा ‘त्वचेचा त्वचेशी संपर्क’ तंत्राचा वापर करताना सुरुवातीला वेळ कमी ठेवावा. (जवळपास ३० ते ६० मिनिटे) हळूहळू आईला त्याची सवय होऊ लागते व ती आत्मविश्वासाने या पद्धतीचा वापर करू लागते, अशावेळी जितका जास्त वेळ कांगारू केअर देता येईल तितका वेळ ती द्यावी. खासकरून कमी वजनाच्या बाळांच्या बाबतीत कांगारू केअरचा कालावधी जितका जास्त असेल तितका चांगला ठरतो. बाळाला कांगारू केअर देताना आई स्वतः देखील आराम करू शकते किंवा अर्ध-पहुडलेल्या स्थितीत झोपू शकते.

कांगारू केअरची प्रक्रिया

आईच्या स्तनांच्या मधल्या पोकळीत बाळाला उभ्या स्थितीत ठेवावे, बाळाचे डोके एका बाजूला कलते असावे, जेणेकरून त्याला श्वास घेण्यात काही अडचण येणार नाही आणि आई सतत दिसत राहील. बाळाचे पोट आईच्या पोटाच्या वरच्या भागाला टेकलेले असावे, हात आणि पायांची घडी घातलेली असावी. बाळाला आधार देण्यासाठी स्वच्छ, मऊ, सुती कापड किंवा कांगारू बॅगचा वापर केला जाऊ शकतो.

कांगारू केअरचा फायदा?

मुदतीपूर्व प्रसूतीमध्ये जन्मलेल्या किंवा अतिशय कमी वजनाच्या बाळांच्या शुश्रूषेसाठी कांगारू केअरची सुरुवात झाली. परंतु मुदत पूर्ण होऊन जन्मलेल्या किंवा वजन व्यवस्थित असलेल्या बाळांसाठी देखील ही पद्धत खूप लाभदायी ठरते.

कांगारू केयर फायदे पुढीलप्रमाणे आहेत -

1. बाळाची नीट काळजी घेण्याचा आणि बाळासोबत आपले बंध निर्माण करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. या पद्धतीचा वापर करून शुश्रूषा करण्यात आलेल्या बाळांची पालकांसोबत खूप जास्त जवळीक निर्माण होते असे निदर्शनास आले आहे.

2. त्वचेशी त्वचेचा संपर्क आल्यामुळे मेंदूचा विकास होण्यास आणि भावनिक बुद्धिमत्ता निर्माण होण्यास सुरुवात होते. डोळ्यांशी डोळ्यांचा कॉन्टॅक्ट होत राहिल्याने (आय-टू-आय कॉन्टॅक्ट), जवळीक, प्रेम आणि विश्वास यामुळे सामाजिक बुद्धिमत्तेचा देखील विकास होण्यात मदत मिळते.

त्वचेशी त्वचेचा संपर्क पद्धतीचा वापर केल्याने स्तनपानाला आपसूकच प्रोत्साहन मिळते. बाळ आणि आई या दोघांच्याही आरोग्याच्या दृष्टीने स्तनपान अतिशय लाभदायक आहे. बाळाचे पोषण आणि विकास यामध्ये स्तनपानाचे योगदान लक्षणीय असते.

3. खासकरून कमी वजनाच्या बाळांच्या बाबतीत आणि थंडीमध्ये शरीराचे तापमान योग्य राखले जाणे आवश्यक असते.

4. या पद्धतीने काळजी घेतल्या गेलेल्या बाळांचे वजन चांगले वाढू लागते, ती बाळे बराच काळ, अगदी शांत झोपतात, जागी झाल्यानंतर देखील निवांत असतात आणि कमी रडतात.

Web Title: How Kangaroo Care And Skin To Skin

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top