स्टेथोस्कोपचा शोध कसा लागला माहितीये? डॉक्टरांपुढे निर्माण झाला होता उपचाराचा गंभीर प्रश्न

टीम ई सकाळ
Monday, 21 September 2020

स्टेथोस्कोपच्या शोधामागे एक रंजक कथा आहे. डॉक्टरांच्या या प्रमुख आयुधाचा शोध लावण्याचे श्रेय जाते एका फ्रेंच डॉक्टरला. हे डॉक्टर अतिशय दयाळू आणि परोपकारी होते. त्यांनी क्षयरोगावर अत्याधुनिक उपचार शोधून काढले. स्टेथोस्कोपचा शोध लागण्यापूर्वी डॉक्टर पेशंटच्या छातीला कान लावून त्याचे हृदयाचे ठोके किंवा छातीतील कफाचा अंदाज घेत असत.

नागपूर : विना स्टेथोस्कोप आपण डॉक्टरचा विचारही करू शकत नाही. डॉक्टर म्हटले की डोळ्यांपुढे उभे राहते पांढरा  कोट घातलेले, गळ्यात स्टेथोस्कोप घातलेले व्यक्तिमत्व.  डॉक्टर व स्टेथोस्कोप यांचे नाते इतके अतूट आहे की स्टेथोस्कोपशिवाय डॉक्टर आपल्या कल्पनेत सुद्धा येत नाहीत. डॉक्टरांच्या गळ्यातील ताईत असलेल्या स्टेथोस्कोपचा शोध कसा लागला असेल, असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल. याबाबतची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत...

डॉक्टर आणि स्टेथोस्कोपचे नाते एवढे घट्ट आहे की, जाहिरातींमध्ये डॉक्टरला स्टेथोस्कोपशिवाय पाहू शकत नाही. लहान मुलेसुद्धा डॉक्टर डॉक्टर खेळताना खोट्या खोट्या स्टेथोस्कोपने पेशंटची छाती व पोट तपासतात. मुळात डॉक्टरांना डायग्नोसिस करण्यास अत्यंत उपयुक्त अशा स्टेथोस्कोपचा शोध कुणी लावला, हेसुद्धा जाणून घेणे महत्वाचे आहे. 

जाणून घ्या - सत्तावीस वर्षीय युवक स्मशानघाटासमोरून गाडी ढकलत घेऊन जात होता, पुढे...

स्टेथोस्कोपच्या शोधामागे एक रंजक कथा आहे. डॉक्टरांच्या या प्रमुख आयुधाचा शोध लावण्याचे श्रेय जाते एका फ्रेंच डॉक्टरला. हे डॉक्टर अतिशय दयाळू आणि परोपकारी होते. त्यांनी क्षयरोगावर अत्याधुनिक उपचार शोधून काढले. स्टेथोस्कोपचा शोध लागण्यापूर्वी डॉक्टर पेशंटच्या छातीला कान लावून त्याचे हृदयाचे ठोके किंवा छातीतील कफाचा अंदाज घेत असत. परंतु ही पद्धत स्त्रियांसाठी जरा अवघड होती. पूर्वीच्या काळी बहुतांश डॉक्टर पुरुष असत. त्यामुळे स्त्री पेशंटला तपासताना दोघांनाही अवघड जायचे.

रेने थिओफाईल हायसिंथ लेनेक या फ्रेंच डॉक्टरांनी १८१६ साली स्टेथोस्कोपचा शोध लावला. रेने लेनेक यांचा जन्म १७ फेब्रुवारी १७८१ रोजी झाला. त्यांचे वडील प्रख्यात वकील होते. त्यांच्या वडिलांची इच्छा त्यांनी डॉक्टर होऊ नये अशी होती. परंतु, लेनेक यांनी वैद्यकीय व्यवसायच निवडला. एकदा लेनेक त्यांच्या एका स्त्री पेशंटला तपासत होते. तिच्या तब्येतीची सर्व लक्षणे बघून डॉक्टर लेनेक यांना त्या स्त्रीला हृदयविकार असावा अशी शंका आली.

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला

त्यावेळी ह्रदयाचे ठोके तपासण्यासाठी दुसरी कोणतीही पद्धत अस्तित्वात नव्हती. परंतु त्या पेशंटच्या वयामुळे व ती स्त्री असल्याने शक्य नव्हते. तेव्हा त्यांना लक्षात आले की, लाकडाच्या एका टोकावर जर पिन घासली तर त्याचा आवाज दुसऱ्या टोकाला लाकडाला कान लावला तर ऐकायला येतो. ही कल्पना सुचल्याने त्यांनी एका कागदाची सुरळी  केली व ती हृदयाच्या ठिकाणी ठेवली व दुसऱ्या बाजूने कान लावला आणि त्यांचा उद्देश सफल झाला. आज लेनेक यांना फादर ऑफ मॉडर्न पल्मनरी डिसीज रिसर्च मानले जाते.

दम्याच्या रोग्यांमध्ये छातीत जे म्युकस तयार होते त्याला लेनेक्स पर्ल्स असे नाव लेनेक यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून दिले आहे. त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील आणखी महत्वाचे योगदान म्हणजे क्षयरोगावरील उपचार होय. ते अतिशय हुशार व कष्टाळू विद्यार्थी होते. १८०१ साली पॅरिसमध्ये त्यांनी मेडिकलचा अभ्यास सुरू केला. १८१५ साली सत्ता स्थापन झाल्यानंतर नेकर हॉस्पिटलमध्ये काम करणे सुरू केले.

बासरीतून मिळाली प्रेरणा

१८१६ साली एक तरुण स्त्री हृदयाच्या तक्रारींनी ग्रस्त होती. त्या काळात डॉक्टरांना पेशंटच्या छातीला कान लावून तपासावे लागे. लेनेक यांना एखाद्या स्त्रीला असे तपासणे योग्य वाटले नाही आणि ती स्त्री लठ्ठ असल्याने इतर प्रकारे तिला तपासून निदान करणे शक्य नव्हते. म्हणूनच त्यांनी कागदाची सुरळी करून त्या स्त्रीच्या हृदयाची स्पंदने ऐकण्याचा प्रयत्न  केला आणि ते यशस्वी ठरले. असेही सांगितले जाते की, लेनेक यांना स्टेथोस्कोपची प्रेरणा बासरीतून मिळाली. ते उत्तम बासरी वाजवत असत. कागदाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी तशीच पोकळ लाकडी नळी तयार केली. तिच्या एका बाजूला एक मायक्रोफोन जोडला व दुसऱ्या बाजूला इयरपीस जोडला. यातून त्यांना स्टेथोस्कोपची कल्पना सूचल्याचे सांगितले जाते. 

१८५१ साली सुधारित स्टेथोस्कोप

ब्रिटनीचे रहिवासी असलेले लेनेक अत्यंत धार्मिक कॅथलिक होते. तसेच ते अत्यंत दयाळू वृत्तीचे व परोपकारीसुद्धा होते. त्यांनी गरीब लोकांसाठी अनेक दानधर्म केले. क्षयरोगावर रिसर्च करत असताना दुर्दैवाने त्यांनाही क्षयरोगाची लागण झाली आणि स्टेथोस्कोप शोधून काढल्यानंतर केवळ  दहाच वर्षांत त्यांचे निधन झाले. लेनेक  यांचे हे उपकरण फ्रांसमध्ये सर्वत्र प्रसिद्ध झाले. संपूर्ण युरोप खंडात डॉक्टर लोक हे उपकरण वापरू लागले. त्यानंतर अमेरिकेत ते वापरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर १८५१ साली एक आयरिश डॉक्टर आर्थर लिरेड यांनी दोन्ही कानांत घालता येईल असा स्टेथोस्कोप तयार केला.

उपचारात येणाऱ्या अडथळ्यांमुळेच संशोधन
पूर्वीच्या काळी स्टेथोस्कोप नसल्याने महिलांवरील उपचारांवर मर्यादा यायच्या. त्यांच्या आजारांचे योग्य निदान व्हावे, या गरजेतूनच स्टेथोस्कोपचा शोध लागला. डाॅक्टरांसाठी अतिशय आवश्यक असणाऱ्या स्टेथोस्कोपमुळे त्यांची ओळख आहे. ह्रदय, फुप्फुस, छातीशीसंबंधित निदानासाठी स्टेथोस्कोप वरदान आहे. ग्रामीण भागात आजही स्टेथोस्कोपव्दारे निदान केले जाते.
डाॅ. यशवंत देशपांडे,
शल्यचिकित्सक, माजी अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन

संकलन आणि संपादन - अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The invention of the stethoscope for the treatment of women