
चित्रीकरणाच्या या बिझी शेड्युलमध्ये फिट राहण्यासाठी खूप काही करायला मिळत नाही. मात्र मला वेळ मिळतो तेव्हा मी जिमला जाते, तसेच चालायला आणि पळायला जायला मला फार आवडते. त्यामुळे मला जास्त ताजेतवाने वाटते. झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया ही भूमिका मी साकारली तेव्हा मला तब्बल ११ किलो वजन कमी करावे लागले.
स्लिम फिट - ईशा केसकर, अभिनेत्री
एक कलाकार म्हणून या चित्रपटसृष्टीत येण्याआधी मला फिटनेसचे म्हणावे तितके वेड नव्हते. मात्र मी चित्रपटसृष्टीत आल्यानंतर स्वतःच्या शरीराची अधिक काळजी घेऊ लागले.
चित्रीकरणाच्या या बिझी शेड्युलमध्ये फिट राहण्यासाठी खूप काही करायला मिळत नाही. मात्र मला वेळ मिळतो तेव्हा मी जिमला जाते, तसेच चालायला आणि पळायला जायला मला फार आवडते. त्यामुळे मला जास्त ताजेतवाने वाटते. झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया ही भूमिका मी साकारली तेव्हा मला तब्बल ११ किलो वजन कमी करावे लागले. ही भूमिका स्वीकारल्यानंतर माझ्या शरीरयष्टीमध्ये झालेल्या बदलात मी किंचितसाही फरक पडू दिला नाही. याचे कारण म्हणजे व्यायाम आणि उत्तम डाएट.
व्यायामाबद्दल सांगायचे तर माझा व्यायाम हा सायकलिंग आणि स्वीमिंग करून होतो. मला स्वीमिंग करायला फार आवडते. ते माझ्या शरीरासाठी फारच लाभदायक आहे, तसेच माझा छंदही त्यातून जोपासला जातो. कधीकधी तर चित्रीकरण करत असताना सेटवर मोकळा वेळ मिळाला आणि त्यात मला सायकल दिसली तर मी दूरदूर सायकलिंग करायलाही जाते. आहाराच्या बाबतीत बोलायचे तर मी फारच फुडी आहे. मला सर्व काही खायला आवडते. मला कोणी एखादा पदार्थ खाऊ नको, असे सांगितले तर माझ्यातला बालिशपणा त्या वेळी जागृत होतो. तो पदार्थ चोरून किंवा गपचूप खाल्ल्याशिवाय मला त्यातून आनंद मिळत नाही. मी फुडी असले तरी सध्या माझे डाएट सुरू आहे. मालिकासृष्टीत वावरताना एक कलाकार म्हणून मी त्याचे तंतोतंत पालनही करत आहे. आहारामध्ये मी फक्त पोळी-भाजी किंवा भाकरी-भाजी असा आहार घेते.
मालिकेचे चित्रीकरण करत असताना कधीकधी १२ तास काम करावे लागते, आणि मुख्यत्वे अशा वेळी मेडिटेशनची आवश्यकता असते. या वेळी मी एखादे चित्र रेखाटते किंवा दूरदूर सायकल चालवायला जाऊन स्वतःला त्यात गुंतवून घेते. मी स्वतःला एखाद्या गोष्टीत गुंतवून घेते तेव्हा माझे मेडिटेशन होते. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी याची अत्यंत आवश्यकता असते.