
सध्याच्या काळात ‘टेन्शन’ हा परवलीचा शब्द झाला आहे. तो सगळीकडं अत्यंत मोठ्या प्रमाणात वापरला जातोय. याचा परिणाम म्हणून यापुढं जन्माला येणारे लहान मूल ...‘टॅsहॅ ss’ ऐवजी ‘टेन्शन आssहेss’ हे म्हणत जन्माला येईल की काय, असं वाटतं!
आजकाल ज्यालात्याला ‘टेन्शन’! टेन्शन, टेन्शन, टेन्शन... आणि ज्याला टेन्शन नाही, त्याला या गोष्टीचं टेन्शन, की ‘मला का बरं टेन्शन नाही?’ सध्याच्या काळात ‘टेन्शन’ हा परवलीचा शब्द झाला आहे. तो सगळीकडं अत्यंत मोठ्या प्रमाणात वापरला जातोय. याचा परिणाम म्हणून यापुढं जन्माला येणारे लहान मूल ...‘टॅsहॅ ss’ ऐवजी ‘टेन्शन आssहेss’ हे म्हणत जन्माला येईल की काय, असं वाटतं!
जगण्याशी निगडीत अनेक प्रश्न निर्माण होत असतात. एखादा प्रश्न कसा सुटेल, केव्हा सुटेल, कोण सोडवेल याचं उत्तर मिळवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. ज्या प्रश्नांना उत्तर सापडत नाही, त्याचं रूपांतर टेन्शनमध्ये होतं. व्यक्ती, घटना, परिस्थिती यांमुळं हा ताण निर्माण होत असतो. थोडक्यात, काही वेळेला टेन्शन येतं. पण आजकाल लोकं स्वतःहून टेन्शन तयार करायला लागले आहेत. त्यातही ‘आभासी टेन्शन’ ! मोबाईल, सोशल मीडियाच्या वापरातून, लोकं स्वतःहून आभासी ताण निर्माण करताहेत...
उदाहरणार्थ ...पहिला प्रकार म्हणजे मोबाईलचे चार्जिंग संपेल का? पूर्वीच्या काळी घरी पाहुणा आला तर लोकं विचारायचे ‘चहा हवा का?’ आता पाहुण्याला बरं वाटायचं असेल तर विचारा ‘चार्जिंग हवंय का?’
तणावमुक्तीसाठी,आनंदाच्या क्षणांत कृतीनं नक्की गुंतवणूक करण्याचा संकल्प करा!
दुसरा प्रकार, सव्वाशे मित्रमंडळींचा ‘व्हाट्सॲप’वर ग्रुप असतो. ज्याचा वाढदिवस असतो त्याला रात्री बारा वाजून एक सेकंदांपासून मेसेज वर मेसेज यायला लागतात. कोणी केकचे फोटो पाठवतो, कोणी मेसेज पाठवतो, कोणी फूल पाठवतो. कोणी ‘ईमोजी’ पाठवतो. एकंदरीत दिवसभर त्याच्या मोबाईलवर सतत मेसेजचा मारा सुरू असतो. मोबाईलसारखा वाजत असतो. पण ज्याचा वाढदिवस असतो, त्याचं लक्ष वेगळ्याच ठिकाणी गुंतलेलं असतं....त्या ग्रुपमधल्या चार-पाच जणांनी अजून का बरं शुभेच्छा पाठवलेल्या नाहीत? म्हणजे जे आहे त्याची किंमत नाही आणि जे नाही त्याची किंमत आहे!!! तणावमुक्त जगायचं असल्यास या आभासी ताणातून मुक्त व्हायची गरज आहे.
तिसरा प्रकार, ग्रुपवर कोणीतरी ‘पोस्ट’ टाकतो. इथं नवीन प्रश्न सुरू होतात. लोकं मनात तराजू घेऊन बसतात. यापूर्वी माझ्या पोस्टला त्यांनी ‘लाईक’ टाकला होता का? जर त्यानं माझ्या पोस्टला ‘लाईक’ टाकला नाही तर मी कशाला टाकू ? ... समाजामध्ये एखाद्याला वाळीत टाकण्याला कायद्यानं बंदी आहे, पण आभासी जगात ‘लाईक’ टाकणं व न टाकणं यानुसार ग्रुपमध्ये वाळीत टाकण्याचं प्रमाण वाढायला लागलं आहे ! कौतुक करणं चांगली गोष्ट आहे, पण दुसऱ्याची पोस्ट तिसऱ्याला पाठवून ‘लाईक’ मिळालाच पाहिजे, या अपेक्षेवर मात करण्याची वेळ आली आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
चौथा प्रकार, थोड्या थोड्या वेळाने मेसेज पाहण्याची सवय. यामुळं मोबाईल वाजला नाही, तरीही खिशातून मोबाईल काढून स्क्रीनवर नजर टाकल्यावर लोकांना बरं वाटतं. तुम्ही मोबाईल वापरण्याऐवजी मोबाईलचं तंत्रज्ञान तुमचा वापर करायला लागलं आहे!
हे प्रकार वाचताना तुम्हालाही नवे प्रकार आठवतील. लिहिताही येतील, पण या आभासी ताणाच्या नादात, जगण्याच्या मूळ प्रश्नांकडं दुर्लक्ष व्हायला लागतं. ते प्रश्न गंभीर व्हायला लागतात. यावर उपाय काय?
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
....सोमवारपासून रविवारपर्यंत लोकं वेगवेगळ्या कारणांनी उपास करतात. आता आभासी ताणातून मुक्ती मिळविण्यासाठी, दिवसातून काही काळ आणि शक्य झाल्यास एखादा दिवसभर मोबाईल न वापरण्याचा अर्थात ‘मोबाईल’चा उपवास करण्याची वेळ आली आहे!!!
(लेखक एकपात्री कलाकार व लाफ्टर योगा ट्रेनर आहेत.)