योग- जीवन : अधोमुखवीरासन

आजच्या लेखात आपण अष्टांगयोगाच्या सहाव्या अंगाची म्हणजे ‘धारणे’ची ओळख करून घेऊया. धारणा म्हणजे चित्ताची एकाग्रता. याला अय्यंगार गुरुजींनी अष्टांगयोगरूपी कल्पवृक्षाच्या आतून वाहणाऱ्या रसाची उपमा दिली आहे.
adhomukhshwanasan
adhomukhshwanasansakal
Summary

आजच्या लेखात आपण अष्टांगयोगाच्या सहाव्या अंगाची म्हणजे ‘धारणे’ची ओळख करून घेऊया. धारणा म्हणजे चित्ताची एकाग्रता. याला अय्यंगार गुरुजींनी अष्टांगयोगरूपी कल्पवृक्षाच्या आतून वाहणाऱ्या रसाची उपमा दिली आहे.

- मुकुंद मावळंकर, अय्यंगार योग शिक्षक

आजच्या लेखात आपण अष्टांगयोगाच्या सहाव्या अंगाची म्हणजे ‘धारणे’ची ओळख करून घेऊया. धारणा म्हणजे चित्ताची एकाग्रता. याला अय्यंगार गुरुजींनी अष्टांगयोगरूपी कल्पवृक्षाच्या आतून वाहणाऱ्या रसाची उपमा दिली आहे. यमरूपी मूळे कसदार जमिनीतून हा रस तयार करतात. रूपी बुंध्या तयार झालेल्या सूक्ष्म नलिकांतून हा धारणारुपी रस वर जातो. आसनारूपी फांद्यांतून सर्वत्र पसरतो. पानरूपी प्राणायामाच्या साह्याने वायूंच्या विविध घटकांतून तयार झालेली जीवनसत्त्वे त्यात मिसळली जातात आणि या रसाचे धारणारुपी जीवामृतच जणू तयार होते. हे बाहेर सांडून किंवा वाळून जाऊ नये याची काळजी प्रत्याहाररूपी साल घेते. या एकाग्रतेच्या जीवामृताचे एकाच ध्येय असते, ते म्हणजे सर्व शरीरात, मनात  आणि चित्तात नवचैतन्य पसरवून आत्म्याच्या दर्शनाची  ओढ निर्माण करणे. यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहाराच्या पालना शिवाय धारणा आचरणात आणताच येऊ शकत नाही. 

पतंजली महामुनी योगसूत्रांच्या तिसऱ्या पादाच्या पहिल्या सूत्रात म्हणतात

देशबन्धश्चित्तस्य धारणा॥३-१॥

अर्थात : शरीरातील अथवा शरीराबाहेरील एका बिंदूवर किंवा एका स्थळावर चित्त एकाग्र करण्याला धारणा म्हणतात. 

धारणेचा अभ्यास केल्याने चित्ताच्या सर्व घटकांवर प्रभुत्व मिळवून एकाग्रता ग्रहण करता येते. चित्ताला बांधून ठेवता येते. हे करण्यासाठी शरीर, मन, बुद्धी, व अहंकाराचे एकत्रिकरण आवश्यक असते. प्राणायामाच्या सरावाने शांत झालेले मन, आसन साधनेने कमावलेले सुदृढ शरीर, यम व नियमांच्या आचरणाने मिळवलेले मनोधैर्य आणि प्रबळ इच्छाशक्ती असली, तरच धारणेसाठीची योग्यता प्राप्त होते. ही सगळी पूर्वतयारी व्हायला वर्षानुवर्षाची तपश्चर्या लागते, पण एकदा ही पूर्वतयारी झाली, की साधकाला जणू धारणेची ओढच लागते. अंतरात्मा साधनेची ही सुरुवातीची लक्षणे आहेत. एकाग्रतेचा अभ्यास व सराव करूनच साधक अष्टांगयोगाच्या पुढच्या दोन अंगांपर्यंत पोचू शकतो. ही क्रमाक्रमाने होणारी प्रगती महत्त्वाची असते. हा प्रवास किती सुखकारक आहे याची कल्पनाच आपण करू शकत नाही, त्याच अनुभवच घ्यावा लागतो.

आज अधोमुखवीरासन शिकू

  • जमिनीवर ब्लॅंकेट पसरून त्यावर गुडघे जुळवून गुडघ्यावर उभे राहा. पावले मागच्या बाजूला एकमेकांपासून दीड फुटावर ठेवा. वीरासनात बसा.

  • हाताचे तळवे पावलांवर ठेवा. श्वास सोडा. धड लांब करून पुढे वाका. छाती व पोट लांब करून मांड्यांवर टेकवा, कोपरे वाकवून वर उचला. आधी हनुवटी व मग कपाळ जमिनीवर टेकवा. सामान्य श्वास घेत १ मिनिट भर थांबा. हे आहे अधोमुखवीरासन.

  • वीरासनात पार्श्वभाग जमिनीवर टेकवता येत नसल्यास दोन पावलांमध्ये ब्लॅंकेटची घडी किंवा लोड घेऊन त्यावर बसा. मग पुढे वाकून कपाळ जमिनीवर टेकवा. जसे सरावानुसार गुडघ्याचे आणि घोट्याचे सांधे मोकळे होतील, तसे ब्लँकेटच्या घडीची किंवा लोडची उंची कमी करता येईल.

  • पोटावरच्या मेदामुळे किंवा स्नायूंच्या ताठरपणामुळे पुढे वाकणे जमत नसल्यास गुडघ्यात अंतर घेऊन पुढे वाका आणि कपाळ टेकवा. डोके तरीसुद्धा जमिनीपर्यंत जात नसल्यास पुढे ब्लॅंकेटची घडी किंवा लोड ठेवा व त्यावर डोके टेकवा. हात लांब करून तळावे जमिनीवर टेकवा. धडाच्या पार्श्वकडा लांब करून पुढे ओढा आणि डोके गुडघ्याच्या जेवढे पुढे ठेवता येईल, तेवढे ठेवा. पार्श्वभाग वर उचलला जात नाही याची काळजी घ्या. पार्श्वभाग मागे पावलांकडे ओढा. सराव नियमितपणे केल्याने या आसनात ५ ते ६ मिनिटे थांबता येईल.

अधोमुखवीरासनामुळे पचनक्रिया सुधारते. थकवा कमी होऊन मन प्रसन्न होते. डोके शांत होते. डोक्याखाली लोड घेतल्याने डोकेदुखी कमी होते, उच्च रक्तदाब, अंगदुखी आणि मरगळ कमी होते. पाठीच्या कण्याला आधार आणि आराम मिळतो. प्रगतिशील साधकाने नियमित सर्व केल्याने चित्त शांत होऊन एकाग्रता प्राप्त होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com