esakal | पालकांनो, लहान मुलांचे मानसिक आरोग्य जपताय ना?

बोलून बातमी शोधा

child's mental health
पालकांनो, लहान मुलांचे मानसिक आरोग्य जपताय ना?
sakal_logo
By
- मीनाक्षी गुरव

पुणे : अवघ्या आठ वर्षांची त्रिशा (नाव बदलले आहे) आता सतत झोपू लागलीय. आई-बाबांनी सतत झोपण्याचे कारण विचारले असता, ‘आई मला बोअर (कंटाळा) होतंय ग’, असे ती सांगू लागल्याचे तिच्या आईने सांगितले. तर सहावीत असणाऱ्या सुजयला (नाव बदलले आहे) यापूर्वी नावीन्यपूर्ण काहीतरी करायला आवडायचे. घरातील वेगवेगळ्या वस्तूंची तोडफोड करून त्यातून काहीतरी बनविण्यात रमणारा सुजय आता मोबाईल, लॅपटॉप म्हणजेच इंटरनेटशिवाय राहू शकत नाहीये. त्याच्याकडून इंटरनेटचा वापर अति होत असल्याने कनेक्शन बंद केले तर तो चिडचिड करून आक्रमक होत असल्याचे निरीक्षण त्याच्या आईने नोंदविले.

घरातील लहान मुलांच्या मानसिकतेत थोड्या किंवा मोठ्या फरकाने असे बदल होत असल्याचे निरीक्षण पालक नोंदवीत आहेत. वर्षभरापासून शाळा, घराबाहेर पडणे, मित्र-मैत्रिणीसोबत खेळणे असे सगळेच बंद आहे. वर्ष उलटले, तरी या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे मुलांमधील चिडचिड वाढू लागल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि आता दुसऱ्या लाटेतही पालक घरातून काम (वर्क फ्रॉम होम) आहेत. अशा परिस्थितीत घरात असले तरी मुलांसोबत अधिक वेळ घालविणे शक्य होत नाही. परिणामी आपसूक मुले मोबाईल, लॅपटॉप याद्वारे इंटरनेटच्या वापराकडे वळली आहेत. इंटरनेटवर वेगवेगळ्या विषयावर अधिकाधिक माहिती वाचण्याचा, व्हिडिओ पाहण्याची सवय मुलांना लागली आहे. परिणामी एकलकोंडेपणा, एकमेकांमधील दुरावलेला संवाद, खाण्यात लक्ष नसणे, असे बदल मुलांमध्ये प्रकर्षाने दिसत असल्याचे बाल मानसोपचारतज्ञांनी सांगितले.

हेही वाचा: ओटा स्कीम हादरले ! खुनाची घटना ताजी असताना २४ तासातच प्राणघातक हल्ला

इंटरनेटच्या अतिवापरामुळे मुलांचे मानसिक आरोग्य बिघडतयं

‘‘गेल्या वर्षभरात मुलांचे शिक्षणात सातत्य नसल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय ही मुले घरातच बसून आहेत. त्यामुळे अर्थातच मोबाईलचा आणि त्यातही इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. त्यामुळे इंटरनेटद्वारे वेगवेगळे व्हिडिओ पाहून मन विचलित होत आहे. परिणामी एकटेपणा, निरुत्साही, खेळात लक्ष नसणे असे बदल मुलांमध्ये झाल्याचे प्रकर्षाने दिसते. तसेच अनेक मुले तणावग्रस्त होण्याचाही धोका आहे. त्यामुळे पालकांचे मुलांच्या इंटरनेटच्या वापराकडे लक्ष हवे आणि नियंत्रणही हवे.’’

- डॉ. ज्योती शेट्टी, बाल मानसोपचारतज्ञ

आपल्याला डांबून ठेवल्याची भावनेने मुले होतायंत व्याकूळ

‘‘कोरोनामुळे मुले घरातच असल्यामुळे त्यांच्यात आपल्याला डांबून ठेवले असल्याची भावना निर्माण होत आहे. सातत्याने घरात राहून मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत आहे. परिणामी त्यांना शांत करण्यासाठी पालकांकडून हात उगारला जात आहे. मुलांकडून इंटरनेटचा होणारा अतिवापर याकडे गांभीर्याने पहायला हवे. मुले इंटरनेटवर काय पाहतात, याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. तर अनेक मुले आता कंटाळा आला आहे.’’

- डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे, संस्थापिका ज्ञानदेवी चाईल्डलाइन

हेही वाचा: कडक निर्बंध : सकाळी ७ ते ११ या वेळेतच राहणार दुकानं सुरु; आजपासून नवी नियमावली लागू

हे करणे शक्य

  • वेगवेगळ्या कलाकृती बनविण्याची आवड लावणे

  • वाचनाची गोडी लावणे

  • इंटरनेटवरील सकारात्मक आणि चांगल्या गोष्टी पाहण्यास शिकविणे

  • व्यायाम, फिटनेसवर भर देणे

  • घरातील कामात गुंतवून ठेवणे

  • वेगवेगळे खेळ शिकविणे