‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट’ बालकांसाठी नवसंजीवनी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट’ बालकांसाठी नवसंजीवनी

‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट’ बालकांसाठी नवसंजीवनी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

स्टेप्टोकोकस न्यूमोनिया हा बॅक्टेरिया शरीरातील विविध भागात पसरून विविध आजार निर्माण करू शकतो. स्टेप्टोकोकस न्यूमोनिया बॅक्टेरिया (जिवाणू) पाच वर्षांच्या आतील मुलांमधील न्यूमोनियाचे मुख्य कारण आहे.

बालमृत्यू टाळता यावे म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येतो. बालकांचे विविध आजारांपासून संरक्षण व्हावे म्हणून बीसीजी, पोलिओ, रोटाव्हायरस, पेंटाव्हॅलेंट, गोवर, रुबेला, जेई या लशी दिल्या जातात. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, बालकांचे न्यूमोनियापासून संरक्षण करण्यासाठी म्हणजेच न्यूमोकोकल आजारापासून रक्षण करण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन दिली जाणार आहे.

न्यूमोनियापासून बालकांच्या संरक्षणासाठी राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिनचा समावेश आहे. याअंतर्गत साधारणपणे १९ लाख बालकांना लस देण्याचे नियोजन केले आहे. लस देण्यासाठी लसीकरण करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. पीसीव्ही लशीच्या बालकांना तीन मात्रा दिल्या जाणार असून, बाळाच्या जन्मानंतर सहाव्या आठवड्यात, चौदाव्या आठवड्यात आणि नवव्या महिन्यात दिल्या जाणार आहेत. नियमित लसीकरणात ही लस बालकांना दिल्याने अर्भक मृत्यूच्या प्रमाणात नक्कीच घट होईल.

हेही वाचा: उस्मानाबाद : शंभर टक्के लसीकरणाच्या गावांचे शतक

स्टेप्टोकोकस न्यूमोनिया बॅक्टेरियामुळे न्यूमोकोकल आजार होतो. स्टेप्टोकोकस न्यूमोनिया हा बॅक्टेरिया शरीरातील विविध भागात पसरून विविध आजार निर्माण करू शकतो. स्टेप्टोकोकस न्यूमोनिया बॅक्टेरिया (जिवाणू) पाच वर्षांच्या आतील मुलांमधील न्यूमोनियाचे मुख्य कारण आहे. या बॅक्टेरियामुळे श्वसन मार्गाला संसर्ग होऊन फुप्फुसाला सूज येते. त्यात पाणी भरू शकते. यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो आणि ऑक्सिजन कमी होऊ शकतो.

न्युमोकोकल आजाराची खोकला, धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे ही लक्षणे आहेत. आजार गंभीर असेल तर मृत्यूही ओढवू शकतो. गंभीर न्यूमोनिया होण्याचा धोका दोन वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये दिसून येतो. एक वर्षाच्या आतील मुलांमध्ये तो धोका सर्वाधिक असतो. पीसीव्ही लसीकरणाने या गंभीर आजारापासून बालकांचे संरक्षण होईल. सोबतच समाजातील इतर घटकांमध्ये न्यूमोकोकल आजाराचा धोका कमी होईल. या संसर्गामुळे एक वर्षाच्या आतील मुलांमध्ये डायरिया आणि न्यूमोनिया होऊन मुले दगावण्याचे प्रमाण लक्षात घेऊन राज्य शासनाने डायरिया प्रतिबंधासाठी रोटा व्हायरस लस तर आता न्यूमोनिया प्रतिबंधाकरिता पीसीव्ही लशीचा समावेश केला आहे. दुर्गम तसेच अतिवृष्टीचे प्रमाण अधिक असलेल्या भागात जिथे कोंदट वातावरणामुळे बालकांमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण अधिक आढळून येते अशा भागातील बालकांना ही लस या आजारापासून रोखण्यास महत्त्वपूर्ण ठरेल. न्यूमोकोकस बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्यास मेनिंजायटिस, सेप्टिसिमिया आणि न्यूमोनियासारखे गंभीर आजार होऊ शकतात. तसेच सायनुसायटिससारखे सौम्य आजारही होऊ शकतात.

एका व्यक्तीपासून दुसऱ्याला खोकला किंवा शिंकताना संसर्ग होऊ शकतो. भारतात २०१० साली जवळपास १ कोटी पाच लाख बालमृत्यू न्यूमानियाने झाल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात ही लस इतर लशींप्रमाणे शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत दिली जाते. बालकांना पीसीव्हीचे दोन डोस आणि एक बूस्टर डोस बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या आत देणे आवश्यक आहे. जर लस देण्यास एक वर्षापेक्षा जास्त उशीर झाला तर पीसीव्हीचे उर्वरित डोस तेव्हाच देता येतील. मुलांचे विविध आजारांपासून संरक्षण होणे गरजेचे आहे. त्यांना योग्य स्तनपान, योग्य आहार, योग्य देखभाल, एका वर्षाआतील संपूर्ण लसीकरण केल्यास त्यांची योग्यरीत्या वाढ आणि विकास होण्यास मदत होईल.

-डॉ. श्रीराम गोगुलवार , प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नागपूर

loading image
go to top