esakal | चेतना तरंग : संशयवाद आणि संशयात्मा
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Sri Ravishankar

चेतना तरंग : संशयवाद आणि संशयात्मा

sakal_logo
By
श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग

तुम्ही संशयात्मा आहात असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही संशयात्मा राहिलेले नाही. अज्ञात असे काहीतरी असावे, ज्याबद्दल तुमच्या हाती काही धागे आले आहेत. म्हणून आता तुम्हाला संशय येत आहे! तुम्ही खरेच संशयात्मा असाल, तर मात्र हे सत्य तुम्हाला कधी कळणारच नाही!

संशयवादी हा त्याच्या धारणांच्या परिमाणात असा गुरफटलेला असतो, की बाकी सर्व शक्यता त्याच्यासाठी बंद होऊन जातात. मात्र, सृष्टीमध्ये तर अनेकविध शक्यता आहेत. आपल्या धारणा समयानुसार कशा बदलत असतात याची तुम्हाला जाणीव झाली, की संशयावाद संपुष्टात येतो.

सृष्टीच्या अज्ञात अनंत पसाऱ्यामध्ये जिज्ञासेने भ्रमण करण्यामध्ये संशयवाद वितुष्ट आणतो. त्यामुळे एका वैज्ञानिकाला संशयवादी असणे परवडणारे नाही. संशयवाद हा ‘मला सर्व माहीत आहे,’ अशा भावनेला पुष्टी देत असतो आणि ही वृत्ती अवैज्ञानिक आहे. ज्ञानोपासनेच्या सहाय्याने संशयवाद संपू शकतो.

कुणी संशयवादी आहे अशी मनोमन धारणा करून त्याच्याशी या विषयावर वाद घालू नका. कारण अशा वादामुळे ‘आपले विचारस्वातंत्र्य हरवेल की काय,’ अशी भीती निर्माण होऊन संशयवादी त्याचा प्रतिकार करू पाहतो आणि त्यामुळे संशयवाद अधिकच बळावतो.

मानवाच्या अंतःकरणात खोलवर प्रेम आणि विश्वास अस्तित्वात असतात. संशयवृत्ती ही केवळ एक वरवरचे पातळ आवरण असते. एखादी व्यक्ती संशयवादी आहे अशी तुम्ही मनामध्ये धारणा ठेवल्याने त्याच्या किंवा तिच्या संशयवृत्तीला खतपाणीच मिळते.

या विषयावरचे तुमचे मौन आणि तुमचे सहज हास्य यामुळे संशयवाद दूर होण्यास मदत होईल. संशयवाद तोडण्यासाठी त्याबाबतीत मौन राखणे हा सर्वोत्तम उपाय आहे. पण मौन म्हणजे केवळ त्यावर चर्चा नको, असे नव्हे. तुमच्या चेतनेमधूनच या मौनाची अनुभूती व्हायला हवी.

जे लोक खूप मर्यादा राखून जीवनक्रम करतात, त्यांच्यामध्येच संशयवृत्ती निर्माण होत असते. लहान मुलांमध्ये संशयवृत्ती अजिबात असत नाही. ती त्यांच्या सभोवतालच्या अद्भुत जगात आश्चर्याने पाहात जगतात. त्या अद्भुत जगात असंख्य अमर्याद शक्यता असतात. त्यांच्या जगामध्ये सहजता, निष्कपटता, सौंदर्य, अतीव आनंद आणि प्रेम असते. मग तिथे संशयाला काय वाव?

loading image