अशी करा दिवसाची आरोग्यपूर्ण सुरुवात...

Tips for healthy start to the day kolhapur
Tips for healthy start to the day kolhapur

प्रत्येक माणसाच्या मनात आरोग्यपूर्ण दीर्घायू हीच इच्छा कायम असते. त्यासाठी आपल्या माहितीनुसार जीवनशैलीत विविध बदल आपण सर्व जण करीत असतो. पण, खरंच शास्त्र काय सांगते, याबद्दल अचूक माहिती दर वेळी मिळतेच असे नाही. त्यामुळे काही वेळा कळत, नकळत काही अप्रिय अपघात घटना घडतात. ते सर्व टाळले जावे व उत्तम आरोग्य सर्वांना मिळावे, यासाठी हा ऊहापोह.आपण रोज जास्तीत जास्त कसे आयुर्वेदाला धरून मार्गक्रमण करता येईल ते पाहू या.

"ब्राह्म मुहुर्तावर उठावे' एक साधी सुरवात आयुर्वेदाने सुचवली आहे. सूर्योदयापूर्वी साडेतीन घटिका म्हणजे पहाटे साधारण चार वाजता. असे का करावे? तर पहाटे शारीरस्थ वायूची गती उत्तम असते व मलमूत्र विसर्जन सुलभ होते. क्रमाने त्याज्य वस्तू शरीराबाहेर वेळेवर पडल्यामुळे शरीराची स्वच्छता होते व अनुक्रमे शरीरांतर्गत सर्व संस्थांना चैतन्य मिळते. सध्याच्या जीवनशैलीत हे कसे बसवावे? क्रमाने रात्रीचे जेवण लवकर म्हणजे 8 वाजेपर्यंत घेतल्यास व 10.30 वाजेपर्यंत झोपण्याची तयारी केल्यास 7 ते 8 तासांच्या पूर्ण विश्रांतीनंतर तुम्ही पहाटे 5 वाजेपर्यंत उठू शकता. यामुळे आपल्याला स्वतःचा आहार व व्यायाम यासाठी योग्य वेळ मिळू शकतो. या छोट्याशा बदलाचा फायदा सूक्ष्मपणे अनुभवा. त्यासाठी तुमच्या मलविसर्जन सवयीत काय बदल होतो, तो नोंदवा. तसेच तुमची भूक व संध्याकाळपर्यंत टिकणारी energy level यामध्ये काय बदल होतो, याचा विचार करा. म्हणजे लवकर उठण्याची इच्छा सवय होऊन जाईल.

सकाळची सुरुवात

दांतधावन - म्हणजेच दात घासणे.. आता सर्वांच्या मनात प्रश्न पडेल की आपण सर्व जण सकाळी उठल्यावर दात घासतो. यामध्ये नवीन काय? यासाठी आयुर्वेदाने कारणासहित तत्त्वशुद्ध मार्गदर्शन केले आहे.
आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्या तोंडाला एक प्रकारचा वास येत असतो व तोंडात चिकटा असतो (आयुर्वेदनुसार हा चिकटा म्हणजे रात्रभर साचलेला कफ होय.)
हा कफ काढून टाकण्यासाठी तुरट व कडवट चवीच्या रसाने तोंड स्वच्छ केले, तर कफ पातळ होऊन सुटतो व तोंड स्वच्छ होते. तुरट रस वापरण्याचे अजून एक कारण म्हणजे हिरड्यातून होणारा रक्तस्राव थांबण्यास मदत होते; तसेच तुरट रस हा astringent म्हणूनही काम करतो. त्यामुळे हिरड्यांना व दातांना बळकटी येण्यास मदत होते.
आयुर्वेदात जे दंतधावन सांगितले आहे ते म्हणजे वनस्पतीच्या काड्यांनी दात स्वच्छ करायची पद्धत होय. त्याची लांबी 12 अंगूल अशी निश्‍चित आहे व योगायोग असा आहे, की ब्रशची लांबी ही तेवढीच आहे. आता सध्याच्या काळात काय करता येईल ते पाहूया...चांगल्या प्रतीच्या ब्रशने दंतमंजन लावून तोंड धुणे श्रेयस्कर व सोपे.
दंतमंजनमध्ये वापरायच्या वनस्पती म्हणजे सहज मिळणारे त्रिफळा (आवळा, हिरडा व बेहडा) यांचे मिश्रण कफ, कृमिनाशक व दुर्गंधीचा नाश करणारे व उत्तम astringent आहे. तसेच बकुळ, वड, खैर, नीम, बेल या वनस्पतीपासून तयार होणारे मिश्रण उत्तम दंतरक्षक ठरू शकते.

ही दिनचर्येची फक्त सुरुवात आहे. यानंतर क्रमाने व्यायाम, अभ्यंग, आहार, विहार, जेवणाचा काल, पाणी पिण्याविषयी नियम, आहारातील घटक येतात. त्यातही ऋतूनुसार बदलणारा आहार व विहार या प्रत्येक विषयावर शास्त्रीय कारणमीमांसे सहित भाष्य केले आहे. हे जर योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाखाली काही प्रमाणात जरी पाळले गेले, तरी दवाखान्यातील गर्दी कमी होऊ शकेल व आरोग्यम्‌ धनसंपदा हे खऱ्या अर्थाने साध्य होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com