Health News
Health Newsesakal

Health News : मुलांमधील स्थूलतेचा वाढता प्रकोप; कोणती आहेत कारणे, कशी घ्याल काळजी?

बालपणी स्थूल असणारे ७० टक्के लोक मोठेपणी पण स्थूलच राहतात.
Summary

भारतातील वाढत्या स्थूलतेचे प्रमाण बघता २०२५ मध्ये भारत जगातील सर्वाधिक स्थूल व्यक्ती असणाऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोचेल!

-श्रुतिका कोतकुंडे, सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण sajagclinic@gmail.com

स्मितची आई सांगत होती की, स्मित आजीचा भारी लाडका. पहिला नातू म्हणून त्याचा प्रत्येक शब्द तळहातावर झेलला जाई. आजीला गोड आवडे तसे त्यालाही. कौतुकाचे चार दिवस ओसरले; पण त्याची खदाडी काही ओसरेना. एकदा शाळेत खेळताना त्याला दम लागला आणि डॉक्टरांनी (Doctor) दम्याचे निदान केले. डॉक्टरांनी जाड असलेल्या स्मितला वजन कमी करायला सांगितले होते. वाढत्या वयात खाण्यावर निर्बंध आणणे त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे उद्दिष्ट बनले होते.

आजकाल निष्क्रिय जीवनशैली मुलांमध्ये वाढती स्थूलता व त्यामुळे होणाऱ्या बऱ्याच आजारांचे कारण ठरत आहे. मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर (Cancer), उच्च रक्तदाब, निद्रानाश यांच्यामागे बऱ्याच अंशी शारीरिक स्थूलता असते. शरीराबरोबर तणाव, नैराश्य अशा मानसिक व्याधी मुलांमध्ये वाढत्या प्रमाणात दिसत आहेत याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शारीरिक प्रतिमेबद्दल असंतोष. अशा भावनांमुळे मुले एकटी व आत्मकेंद्रित होत चालली आहेत.

Health News
Frozen Shoulder Symptoms : फ्रोझन शोल्डरपासून मिळवा मुक्ती, फिजिओथेरपीमुळे पुनश्‍च येई शक्ती।

एकीकडे कुपोषण तर दुसरीकडे स्थूलता मुलांसाठी संकट बनत चालली आहे. एकेकाळी क्रियाशील असलेला आपला देश झपाट्याने बदलत आहे. बऱ्याच व्याधींचे मूळ असणारी स्थूलता नव्या पिढीला कवेत घेऊ लागली आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात स्थूलता मुलांचे जीवनमान बदलत आहे. हल्लीच अंगणवाडींमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणामध्ये समोर आले की, ०-५ वयोगटातील ६ टक्के मुले स्थूल आहेत. स्थूलतेचे प्रमाण कुपोषित मुलांइतकेच आहे, असे आढळले. देशाच्या १३ प्रांतांत झालेल्या या सर्वेक्षणामध्ये मध्यप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, उत्तराखंड या राज्यांमध्ये हे प्रमाण राष्ट्रीय टक्केवारी ६ टक्केपेक्षाही जास्त आढळले.

एक प्रकारचे कुपोषण म्हटली जाणारी स्थूलता काळजी वाढवणारी ठरत आहे. मुलांची नियमित जेवणाची सवय सुटत चालली आहे. स्मार्टफोनमध्ये अडकलेली मुले खेळ व मैदानापासून दूर फेकली गेली आहेत. आहाराच्या वाईट सवयींनी मुलांना घेरले आहे. खाण्याचा समतोल मोठ्या शहरांपासून छोट्या गावापर्यंत बिघडला आहे. मुले जास्तीत जास्त प्रक्रिया केलेले, पाकीटबंद खाद्यपदार्थ फस्त करताना दिसत आहेत. अशा पाकीटबंद खाऊच्या पदार्थांची जाहिरातींची रेलचेल मुलांना गारूड घालत आहे. यामुळे पारंपरिक खाणं मुलांच्या आहारातून बाद होत चालले आहे. पालकांच्या अनास्थेमुळे व मुलांच्या हट्टामुळे अशा सवयींना प्रोत्साहन मिळत आहे.

Health News
Oral Cancer Symptoms : कॅन्सर होऊ नये यासाठी काय करावे? Cancer नक्की कशामुळं होतो? जाणून घ्या..

अतिरिक्त साखर असलेली पेय व फास्टफूड मेद वाढण्याचे मोठे कारण आहे. अशा खाण्यामध्ये पोषणमूल्य कमी व जास्त उष्मांक असतात. यांच्या नियमित सेवनाने शरीराची सर्वांगीण वाढ होत नाही तसेच यातील चटपटीतपणामुळे मुलांना यांची चटक लागते. असमतोल आहार व निष्क्रिय जीवनशैलीमुळे मुलांमधील स्थूलतेचा प्रश्न गहन होत चालला आहे. त्यामुळे डॉक्टर, शिक्षक, पालक चिंतित होणे स्वाभाविक आहे.

भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात स्थूलता बालआरोग्याला भेडसावणारी जोखीम बनत आहे. शून्य ते पाच वयोगटातील मुलांमधील स्थूलता लक्षणीयरित्या वाढली आहे. खाण्याच्या चुकीच्या सवयींचा परिणाम शरीरावर तसेच मनावर होताना दिसत आहे. खेळण्याबागडण्याच्या वयात स्थूल मुलांना श्वासाचा त्रास जडताना दिसत आहे. ते बैठ्या जीवनशैलीचे शिकार बनत चालले आहेत. साखर व मेद असलेले पदार्थ खाल्ल्याने वागण्यावरही नकारात्मक परिणाम होताना दिसतो जसे बेचैन वाटणे, आळस येणे, शारीरिक क्षमता कमी होणे व उंची वाढणे बंद होणे.

Health News
जंगल भटकंतीचा आनंद अन् थरारही..; भेकराचं भुंकणं, बिबट्याची साद, वानरांचं खेकसणं आणि बरंच काही..

बालपणी स्थूल असणारे ७० टक्के लोक मोठेपणी पण स्थूलच राहतात. भारतातील वाढत्या स्थूलतेचे प्रमाण बघता २०२५ मध्ये भारत जगातील सर्वाधिक स्थूल व्यक्ती असणाऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोचेल! असे असले तरी बऱ्याच परिवारांना यात काही वैशम्य वाटत नाही. कारण, याचे गांभीर्यच समजून घेतले जात नाही. हे चित्र बदलायचे असेल तर महत्वाचे म्हणजे मुलांनी आणि पालकांनी स्वीकारायला हवे की, स्थूलता ही एक मोठी समस्या आहे. पूर्ण कुटुंबाने आपल्या आहाराच्या सवयी बदलायला हव्यात.

कारणे

अनुवंशिकता कारण असले तरी ते प्रमाण खूप कमी आहे. अतिखाणे ही कौटुंबिक सवय एक महत्वाचे कारण. शारीरिक निष्क्रियता, मधल्या वेळेत खाण्याची चुकीची सवय, चमचमीत सतत खाणारे मित्रपरिवार, योग्य आहार/पोषण ज्ञानाचा अभाव, आरोग्याला घातक अशा पदार्थांची सहज उपलब्धता करणारी बाजारू अर्थव्यवस्था, अनिर्बंध जाहिरातबाजी व सरकारचा त्यावर अंकुश नसणे.

Health News
कृष्णाची जीवनगीता! 'मुंबादेवीने ती पोर माझ्या संगती पाठवली नसती, तर मी आज बी मुंबईतच असतो'

उपाय

परिवारांनी पारंपरिक आहार व क्रियाशील राहण्यावर भर दिला पाहिजे. मुलांचे जाहिरातींपासून रक्षण केले पाहिजे. पालकांची आहाराबाबतची सजगता वाढवली पाहिजे. पोषणमूल्यांबद्दल थोडे जाणून घेणे गरजेचे आहे व योग्य आहाराच्या सवयी लावून घेणे गरजेचे आहे. नवजात अर्भकाला मातेचे दूध मिळाल्याने नंतरच्या जीवनात स्थूल होण्याची शक्यता कमी होते. शाळेने क्रीडाप्रकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे व शाळेत पोषक आहार मिळेल याची सोय केली पाहिजे. पालकांनी स्वतः स्मार्टफोनपासून अंतर ठेवले पाहिजे व मुलांवर सुरवातीपासून स्क्रीनच्या वापरावर बंधने घालावीत.

त्यांना वेगवेगळे छंद जोपासण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. आजकालच्या भरकटलेल्या काळात जाहिराती आरोग्यदायी जीवनशैलीला प्राधान्य देणाऱ्या आहेत ना, यासाठीही सजग राहावे लागेल. पालकांनी स्वतः व आपल्या पाल्याला लहानपणापासून मैदानी खेळ, व्यायामासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. सरकारने खेलो इंडिया फक्त कागदावर न ठेवता खेळ संस्कृती रूजवण्यासाठी प्रयत्न केले तर मुलांचे सर्वांगीण आरोग्य सुधारेल, यात शंकाच नाही.

(लेखिका मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com