योगा लाईफस्टाईल : योगासनांचा सराव

वसुंधरा तलवारे
Tuesday, 16 February 2021

योग हे यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधी अशा आठ घटकांवर आधारित असतात. यापैकी एखादा घटक जरी बिघडला-म्हणजे त्याचा सराव कमी झाला असेल, किंवा झालाच नसेल, तर एकूण संतुलन बिघडते.

 योग हे यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधी अशा आठ घटकांवर आधारित असतात. यापैकी एखादा घटक जरी बिघडला-म्हणजे त्याचा सराव कमी झाला असेल, किंवा झालाच नसेल, तर एकूण संतुलन बिघडते.

उदाहरणार्थ, पूर्ण उपास किंवा खूप खाणे हे दोन्ही अतिरेक आहेत आणि योगसाधनेमध्ये हे दोन्ही टाळण्याचा सल्ला दिला जातो. उपाशीपोटी राहण्यापेक्षा समजा एक पोळी आणि भाजी खाल्लीत, तर तुमच्या पोटातला दोन तृतीयांश भाग भरेल आणि एक तृतीयांश भाग रिकामा राहील, ज्यामुळे पचन चांगले होईल आणि योगसाधनाही चांगली होईल. करून बघा. अशाच प्रकारे तुम्ही आसनेच खूप केलीत आणि प्राणायाम आणि ध्यान केले नाहीत तर त्याचा उपयोग होणार नाही. तुमचे शरीर ताकदवान, फ्लेक्झिबल होईल; पण मनाचे ‘संस्कार’ (स्वरूप) तेच राहील. उलट कदाचित आसनांचा अति सराव केल्याने मन अधिक अस्वस्थ होऊ शकते-कारण हा सराव शांततेसाठी न राहता त्याला स्पर्धेचे स्वरूप येईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

योगासने आणि प्राणायामाचा आदर्श सराव कसा हवा हे आपण बघू या. 
सराव एकाच ठिकाणी, एकाच वेळी करा. ज्या ठिकाणी तुम्ही सराव करता, ते ठिकाण तुमच्या ऊर्जेबरोबर ‘व्हायब्रेट’ होऊ लागते आणि जसजसा काळ सरतो, तसे तुम्ही जेव्हा त्या ठिकाणी प्रवेश करता, तेव्हा तुम्ही अगदी सहजपणाने योगसाधना करू लागता-कारण ती एक प्रकारे तुमची ‘तपोभूमी’ बनते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तुमची स्वतःची मॅट असूदेत आणि ती फक्त योगासनांच्या सरावासाठीच वापरा. तुमची मॅट सार्वजनिक बनवू नका आणि तुम्हीही इतरांची मॅट वापरू नका. या मॅटचा आदराने वापर करा. तिच्यावर बूट-चप्पल ठेवू नका. ती पिकनिकसाठी, नुसते बसण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी किंवा इतर कामांसाठी वापरू नका. इतर काही कामं असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी वेगळी मॅट आणि योगासनांसाठी स्वतंत्र मॅट असे करू शकता. तुमची ही मॅट तुमच्या ऊर्जांचंही वहन करत असते. त्यामुळे तुम्ही स्वतःला जशी वागणूक देता, तशीच या मॅटला द्या. 

तुम्हाला कितीही घाम येत असला, तरी योगासनांचा सराव शक्यतो एसी किंवा पंखा न लावता करा. तुम्ही करत असलेला सराव तुमच्या संपूर्ण यंत्रणेला अंतर्बाह्य गरम करत असतो. त्यामुळे तुम्ही बाहेरून तिला गार करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला कदाचित डोकेदुखी जाणवेल आणि तुम्हाला योगासनांच्या सरावाचा काहीच फायदा होणार नाही. 

योगासनांच्या सरावाबाबत इतरही काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. त्यांच्याबाबत माहिती घेऊ पुढच्या भागात. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vasundhara Talware Writes about Practice yogasan