esakal | योगा लाईफस्टाईल : कोष : शारीरिक आणि मानसिक आरोग्य

बोलून बातमी शोधा

Yoga
योगा लाईफस्टाईल : कोष : शारीरिक आणि मानसिक आरोग्य
sakal_logo
By
वसुंधरा तलवारे

शरीरातील पाच कोषांची थोडक्यात माहिती घेतल्यानंतर आज आपण अन्नमय कोष व प्राणमय कोष या दोन महत्त्वाची कोषांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. हे दोन कोष तुमचे शारीरिक व मानसिक आरोग्य निरामय राखण्यासाठी कसे उपयुक्त आहेत, हे तुमच्या लक्षात येईल.

अन्नमय कोष

अन्नमय कोष हे आपल्या संपूर्ण शरीराचे एक शारीरिक आवरण आहे. ते मनुष्याचा जन्म, वाढ, आजार, व्यय आणि मृत्यू यांना कारणीभूत ठरते. ते स्नायू, हाडे, त्यांना जोडणाऱ्या उती, त्वचा, विविध अवयव आणि मेदाचे बनलेले असते. त्याला अन्न कोष असेही संबोधले जाते, कारण त्याला पोषणासाठी आपण ग्रहण करीत असलेले अन्न, पीत असलेले पाणी व श्वासाद्वारे घेत असलेली हवा गरजेची असते. त्याला या नावाने ओळखण्याचे आणखी एक कारण म्हणजे, आपले शरीर पृथ्वीमधील घटकांपासून बनले असून, एकेदिवशी ते इतर प्राण्यांचे अन्न बनणार आहे. जन्म आणि मृत्यू हे अन्नमय कोषाचे धर्म आहेत. आसनांच्या योग्य सरावातून या कोषाला सुदृढ ठेवता येते आणि त्याचबरोबर शरीरात निर्माण होणाऱ्या व्याधींवर उपचार करण्यासाठीही त्याचा उपयोग होते.

हेही वाचा: इनर इंजिनिअरिंग : आसन करताना श्‍वासाचे महत्त्व

https://youtu.be/z0PazLAekdsप्राणमय कोष

प्राणमय कोष हा आयुष्याची शक्ती किंवा ऊर्जा असलेले आवरण आहे. प्राण म्हणजे आयुष्याची ऊर्जा. हे श्वसनाच्या वहनाचे साधन असून, त्याद्वारे संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जेचा संचार होतो. ही केवळ श्वास आत घेणे व तो बाहेर सोडण्याची क्रिया नसून, त्याचा संबंध ऊर्जेच्या वहनाशी आहे. त्यातून शरीराला तारुण्य मिळते, त्याचे पुनरुज्जीवन होते व पुनरुत्थानाचे कामही केले जाते. या आवरणाचा आकार व स्वरूप तुमच्या शरीराप्रमाणेच असते, मात्र ते अन्नमय कोषाच्या तुलनेत अधिक सूक्ष्म व शुद्ध असते. भूक आणि तहान हे प्राणमय कोषाचे धर्म आहेत.

आपल्या श्वासाचा संबंध थेट आपल्या मन व शरीरावरील नियंत्रणाशी आहे. मन भरकटलेले, अस्वस्थ आणि त्याच्या तालात नसताना आपल्याला मनावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे जाणवते. त्याउलट आपला श्वास कोणत्याही अडथळ्याविना वाहत असतो, समान व सूक्ष्म असतो, तेव्हा आपण आपल्या मूळ स्वभावाच्या व आत्मज्ञानाच्या अगदी निकट असतो. शरीरातील सर्व प्रकारचा असतोल हा कोषांमधील असमतोलातूनच निर्माण झालेला असतो. आपण रागावलेले, तणावात किंवा भावनिकदृष्ट्या टोकाच्या प्रतिक्रिया देत असतो, त्यावेळी आपण अधिक प्रमाणात ऊर्जेचा वापर करतो. आपण सहानुभूतीदर्शक मज्जासंस्थेला उत्तेजित करून आपल्या प्राणमय कोषालाही उत्तेजित केलेले असते. यातून आपण केवळ आणि केवळ मनात झगडा निर्माण करीत असतो. यावेळी आपल्या हृदयाची गती वाढलेली असते, आपल्या श्वसनाचा दर बदलतो आणि शरीरावर मोठा ताण जाणवू लागतो. दररोज प्राणायमाचा सराव केल्यास प्राणमय कोष सुदृढ आणि आरोग्यपूर्ण राहतो.

त्यामुळेच आपण काय आणि किती खाता हे तुम्ही श्वास कसा घेता आणि कसा विचार करता याएवढेच महत्त्वाचे आहे. हे सर्व काही एकमेकाशी जोडलेले आहे. तुम्ही जगातील सर्वाधिक मसालेदार पदार्थ खाल्ल्यास तुमच्या शरीरात आग लागलेली असेल, मात्र ती वेगळ्या प्रकारची असेल. ही योगी व्यक्तीच्या, तप करणाऱ्याच्या पोटात लागणाऱ्या आगीपेक्षा खूप वेगळी असेल. तुम्ही काही पुण्याचे काम करण्याऐवजी अन्न पचवण्यात व ढेकर देण्यात अधिक व्यग्र असाल. तुम्हाला काय वाटते, प्राणायाम योगाच्या सरावामध्ये का समाविष्ट झाला असावा? तो अनुकंपा व परावनुकंपा यांतील समतोल साधण्यासाठी आला आहे.