आरोग्यमय जीवनासाठी फळे-भाज्यांचे सेवन वाढवा

vegetables-fruit
vegetables-fruit

जागतिक आरोग्य संघटनेने असे स्पष्ट  केले आहे की प्रत्येक प्रौढ व्यक्तीने दररोज किमान ४०० ग्रॅम फळे आणि भाज्या खाल्ल्या पाहिजेत. परंतु प्रत्यक्षात सध्याच्या ‘फास्ट फूड’च्या जमान्यामध्ये बहुतांश कुटुंबामध्ये हे साध्य होत नसल्याचे दिसून येतेय.

संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्लीच्या ७४ व्या अधिवेशनात २०२१ हे ‘आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीपाला वर्ष’ (आयवायएफव्ही) म्हणून घोषित केले गेले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या संलग्न संघटनेने म्हणजे अन्न आणि कृषी संघटनेने हे वर्ष साजरे करण्याची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. आरोग्यामध्ये फळे आणि भाज्यांचे आहारातील महत्त्व आणि त्यांची उपयोगिता यासंबंधीचा प्रचार-प्रसार तसेच शाश्वत शेती आणि दैनंदिन आहारातील पोषणमूल्यांबाबतचे फळांचे व भाज्यांचे महत्त्व याविषयी नागरिकांत जागरूकता वाढविणे हा यामागचा हेतू आहे. अर्थात फळांचे व भाज्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी योगदान देणाऱ्या घटकांना जागतिक स्तरावरून प्रोत्साहन देण्याची एक अनोखी संधी म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.

आरोग्यपूर्ण जीवनाचा मार्ग
अन्न आणि कृषी संघटनेने आणि जागतिक आरोग्य संघटनेने असे स्पष्ट  केले आहे की प्रत्येक प्रौढ व्यक्तीने कर्करोग, मधुमेह, हृदयविकार आणि लठ्ठपणा यासारख्या गंभीर आजारांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच आवश्यक सूक्ष्म पोषक तत्त्वांची कमतरता भरून काढण्यासाठी दररोज किमान ४०० ग्रॅम फळे आणि भाज्या खाल्ल्या पाहिजेत. परंतु प्रत्यक्षात सध्याच्या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये बहुतांश कुटुंबामध्ये हे साध्य होत नसल्याचे दिसून येतेय.

‘आयवायएफव्ही’ची रूपरेखा
फळ आणि भाज्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेविषयी जागरूकतेबरोबरच ज्ञान निर्मिती व प्रसार करणे आणि त्यासाठी व्यापक धोरण अवलंबून त्याची अंमलबजावणी करायची आहे. क्षमतावृद्धीसह शिक्षण आणि प्रशिक्षण वाढवण्याचा हा बहुआयामी कृतिकार्यक्रम आहे.

जागरूकता वाढवणे
फळे आणि भाज्यांचा आहारातील वाढता वापर आरोग्यासाठी कशाप्रकारे योगदान देतात, त्याचा समाज, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणावर परिणाम होऊन टिकाऊ विकासास कशाप्रकारे हातभार लागतो यावर जनजागृती करणे.

राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक अशा भिन्न घटकांच्या विकासाच्या अजेंडामध्ये त्याचे एकीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देणे.

फळे आणि भाजीपाल्याच्या विविध पैलूंबद्दल आणि इतर संबंधित अधिवेशने यांच्या योगदानाबद्दल जागतिक व्यासपीठावर विचार विनिमय घडवून आणणे.

आयवायएफव्हीच्या बहुआयामी फायद्यांचे होणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांचे परीक्षण आणि मोजमाप करण्यासाठी साधने आणि सक्षम यंत्रणा उभारून धोरणांची अंमलबजावणी करणे.

धोरण निर्मिती
पुरावा-आधारित धोरणे, कायदा आणि नियम प्रचार-प्रसार चांगल्या पद्धतींचा आदानप्रदान करणे आणि फळ आणि भाजीपाल्याच्या योगदानातून शाश्वत विकास, ग्रामीण आर्थिक वाढ, अन्न सुरक्षा आणि वैविध्यपूर्ण, संतुलित आणि निरोगी आहाराला प्रोत्साहन देणे.

एकात्मिक आणि समग्र दृष्टिकोनाच्या माध्यमातून फळे आणि भाजीपाला खाद्यप्रणालींना संबोधित करण्यासाठी व्यापक राष्ट्रीय धोरणांद्वारे शाश्वत विकास लक्ष्य आणि मार्गदर्शक सूचनांचे लक्ष्य गाठण्यासाठी जागतिक अधिवेशनांचे आयोजन करणे.

सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सहकार्य, भागीदारीस आणि आयआयएफव्हीच्या विविध बाबींशी  संबंधित संशोधनास उत्तेजन देणे.

नावीन्यपूर्ण पायाभूत सुविधांच्या उभारणीबरोबरच पुरेशा गुंतवणुकीच्या माध्यमातून फळे आणि भाजीपाल्याच्या वापरास आणि शाश्वत उत्पादनास प्रोत्साहित करणे ज्यायोगे त्यांचे नुकसान आणि कचरा कमी होईल.

क्षमता विकास शिक्षण व प्रशिक्षण
व्यापक स्वरूपाच्या शैक्षणिक धोरणाच्या कृतिकार्यक्रमाच्या आधारे फळे आणि भाजीपाला उत्पादन आणि वापराचे फायदे, आरोग्य आणि पौष्टिकतेशी संबंधित इतर विषयांना अभ्यासक्रमात समाविष्ट करणे.

२०३० च्या शाश्वत विकासाच्या महत्त्वपूर्ण उद्दिष्टाच्या अनुषंगाने शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आहारातील फळे आणि भाज्यांचे महत्त्व अधोरेखित करणे.

फळे व भाजीपाला उत्पादन, काढणीपश्चात तंत्रज्ञान प्रक्रिया, तयारी, विपणन आणि उपभोग आदी बाबतीत. वेगवेगळ्या भागधारकांना, विशेषतः महिला आणि तरूणांना योग्य प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या आधारे सबलीकरणास चालना देणे.

फळे व भाज्यांची नासाडी
भारत हा जगातील दुसऱ्‍या क्रमांकाचा फळे व भाजीपाला उत्पादक देश असून जगातील फळ व भाजीपाला उत्पादनातील वाटा अनुक्रमे १०.९ टक्के आणि ८.६ टक्के आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेतील फळे आणि भाज्यांची आर्थिक उलाढाल तब्बल ३.७ ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त आहेत. असे असताना देखील आपल्या देशातील एकूण शेती उत्पादनांपैकी दरवर्षी पुरेशा पायाभूत सोयीसुविधांअभावी १७ ते १८ टक्के फळे आणि भाज्या वाया जातात. तर देशात चार टक्केपेक्षा कमी नाशवंत शेतमालासाठी सक्षम अशा स्वरूपाच्या शीत साखळीद्वारे वाहतूक केली जात आहे. तसेच देशात फळे आणि भाजीपाल्यावरील जवळपास १० टक्के  प्रक्रिया उद्योग होते आहे. मात्र फिलिपाईन्स ७८ टक्के ,चीन २३ टक्के आणि अमेरिका (यूएस) ६५ टक्के प्रक्रिया होत असल्याचे दिसते. सध्या फळे आणि भाज्या यांच्या नासाडीमुळे तयार होणारा कचरा ही अत्यंत गंभीर समस्या  निर्माण होत आहे.   

‘आयवायएफव्ही’चे फलित
आज जगभरातून जवळपास ६९० दशलक्ष लोक भुकेले आहेत तर तीन अब्ज लोकांना निरोगी आहाराचा प्रश्न भेडसावतोय. त्यातच कोविड -१९ सारख्या महामारीमुळे देशभरातील १३२ कोटी लोकांच्या खाद्यान्न व पोषण सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यासाठी या वर्षाच्या निमित्ताने नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता आणि गुणवत्तेबरोबरच उच्च पौष्टिकमूल्य जतन करता येईल, तसेच शेतमालाची काढणीपश्चात सध्या होत असलेली मोठी नासाडी काही प्रमाणात थांबेल. प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांची निर्यात वाढेल. प्रक्रियेसाठी शेतमालाचा खप वाढून त्यास उचित दर मिळतील. ग्रामीण भागात काही प्रमाणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारांच्या अनेक संधी निर्माण करता येतील. अन्नाची हानी आणि अपव्यय कमी केल्यामुळे अन्न सुरक्षा आणि पोषण सुधारेल, ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी होण्याबरोबरच पाणी आणि जमीन या जैविक मूलभूत संसाधनांवरील ताण कमी होऊन उत्पादकता आणि आर्थिक वाढ होण्यास काही प्रमाणात हातभार लागेल अशी अपेक्षा आहे.

(लेखक शेती अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com