योग ‘ऊर्जा’ : प्रतिकारशक्तीसाठी व शुद्धिक्रिया योगासने

Yogasan
Yogasan

कोरोनामुळे ओढवलेली आजची परिस्थिती आपल्याला काही सांगू पाहतेय का? आपण निसर्गातून आलो असलो, तरी अनेक वर्षे निसर्गाविरुद्ध वागत आहोत. सगळे धावत आहोत, पण पोचत कुठेच नाही. कोरोनाच्या निमित्ताने थोडे मागे आणि आत जाऊ, कालातीत अशा योग शास्त्राकडे. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त जाणून घेऊ योग शास्त्राबद्दल. ते व्यापक आणि बलवान असल्याने आपल्याला बरेच काही देऊ शकते. आपण रोगप्रतिकारक शक्तीबद्दल बोलू.

आपली रोगप्रतिकार शक्ती एक मोठी यंत्रणा आहे. प्रतिकारशक्ती कमी होते, म्हणजे आपली आंतरिक प्रणाली असंतुलित होते. ‘Low immunity is unbalanced internal environment’. हे असंतुलन कसे होते? शारीरिक-मानसिक ताण, सवयी, झोप, आहार, जीवनशैली, व्यायाम, विश्रांती व सकारात्मक विचार या सर्व गोष्टींचा नकळत अगदी खोलवर, म्हणजे पेशींपर्यंत परिणाम होत असतो. शरीर व मन या दोन्हींवर उत्तम इलाज म्हणजे योगातील विविध प्रकार. आपण योगासनांच्या मदतीने आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची, ते पाहू.

1) पेशी (Cells) 
विविध प्रकारच्या आसनांनी शरीराच्या भागांना आपण ताणतो, पीळ देतो किंवा प्रसरण करतो, त्याने सूक्ष्म अभिसरण वाढते. अभिसरण म्हणजे साध्या शब्दांत पोषक तत्त्वे आणि ऑक्सिजन सर्व पेशींपर्यंत पोचवणे आणि कार्बन डायऑक्साइड व विषारी द्रव्ये बाहेर फेकणे.

आसने - भुजंगासन, उष्ट्रासन, सूर्यनमस्कार, मत्स्यासन, धनुरासन, ऊर्ध्वहस्तासन, अधोमुखश्वानासन, त्रिकोणासन, योगमुद्रा, हलासन इ.

2) लसिका संस्था (Lymphatic system) 
ही रक्ताभिसरण संस्थेचा एक भाग आहे. या प्रणालीने आपल्या शरीरातील विविध टॉक्झिन्स, बॅक्टेरिया, व्हायरस यांचा नाश होतो. यामध्ये प्रामुख्याने बाहेरील संक्रमणापासून पांढऱ्यापेशी (WBC) शरीराचे संरक्षण करतात. यासाठी पीळ बसणारी आसने आणि उलट्या स्थितीतील आसने उपयोगी ठरतात. लसिका प्रणालीमध्ये संचय झाल्यास रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होतो.

आसने - विपरीत करणी, सर्वांगासन, शीर्षासन, सेतुबंधासन, वक्रासन, अर्धमत्स्येंद्रासन, सूर्यनमस्कार इ.

3) मज्जासंस्था (Nervous System) 
स्ट्रेस शरीरात दीर्घकाळ मुरल्यास कॉर्टिसॉल नावाचे हार्मोन रक्तात वाढते आणि ते आपल्या रोगप्रतिकार शक्तीला दडपून टाकते. आसनांनी स्नायू ताणल्याने त्यातील तणाव कमी होतो. रक्तातील स्ट्रेस हार्मोन कमी होतो आणि मज्जासंस्था शांत होते.

आसने - मकरासन, सुप्तभद्रासन, शशांकासन, मार्जारासन, भद्रासन, वज्रासन, मत्स्य क्रीडासन, शवासन इ.

आसने करणाऱ्यांना आरोग्याचा खजिना मिळाल्यासारखेच आहे. आसनांचा अभ्यास शरीर साफ आणि शुद्ध असल्यावरच परिणामकारक ठरतो. याचीही तरतूद योगात आहे. योगात शारीरिक-मानसिक स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता आपण योगातील काही शुद्धिक्रियांचा थोडक्यात आढावा घेऊ. ही आतील शुद्धी आपली रोगप्रतिकारक शक्ती अधिक बळकट करणार आहे.

कपालभाती
हा श्‍वसनाचा व्यायाम असला, तरी तो प्राणायाम नाही - एक शुद्धिक्रिया आहे. नाक, सायनस व फुफ्फुसांमधील घाण बाहेर फेकण्यात कपालभातीचा उपयोग होतो. कपालभातीचे शेकडो शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक फायदे आहेत, त्यामुळे तो जरूर करावा.

नेती 
नेतीमध्ये जलनेती व सूत्रनेती असे दोन प्रकार येतात. यात नाकाची व घशाची पूर्ण स्वच्छता होते, तसेच सायनस व डोळे साफ होतात. श्वासनलिकेसंबंधित अनेक समस्यांवर उत्तम उपाय म्हणजे नेती. नेती केल्याने नाकातून होणारे स्राव रक्तातील विषारी द्रव्ये बाहेर टाकतात.

वमन धौती
पोटातील घाण, कफ, आम्ल (acid) इत्यादी वमन क्रियेने बाहेर पडते. ही घाण साफ करणे महत्त्वाचे आहे आणि ती वेळोवेळी साफ न केल्यास अन्नमार्गात असलेले विषारी पदार्थ साठून राहतात. काही काळातच ती रक्तात प्रवेश करून निरनिराळे आजार उत्पन्न करतात. अन्ननलिका व श्वासनलिका दोन्ही साफ करून, आंतरइंद्रियांचे सूक्ष्म अभिसरण वाढवून, तसेच ग्रंथींचा स्राव वाढवून रक्तातील विषारी द्रव्ये खेचून बाहेर फेकणारी क्रिया म्हणजे वमन धौती.

या तीन क्रिया सोडून इतरही अनेक शुद्धिक्रिया आहेत. परंतु आज कोरोनाच्या निमित्ताने श्वसन संस्थेच्या आरोग्यासाठी या तीन क्रिया उपयोगी आहेत. आपण त्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकणे अत्यावश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com