आरोग्यासाठी झोप

आपण सहज म्हणून जातो की ‘मी आज लवकर उठलो, किंवा उशिरा उठलो’ पण खरोखरच आपण उठलेलो असतो का? की आपल्याला जाग आलेली असते? एकवेळ जो मनुष्य झोपतो तो उठूही शकतो.
Sleep
SleepSakal

आपण सहज म्हणून जातो की ‘मी आज लवकर उठलो, किंवा उशिरा उठलो’ पण खरोखरच आपण उठलेलो असतो का? की आपल्याला जाग आलेली असते? एकवेळ जो मनुष्य झोपतो तो उठूही शकतो, परंतु बहुतांशी लोकांना झोप झोपेच्या इच्छेने येते आणि झोप संपली की आपसूक जाग येते. ‘मी झोपलो’ व ‘मी उठलो’ एवढे साधे कर्म केल्याचे श्रेयही निसर्ग आपल्याला देत नाही. झोप म्हणजे काय, ती घ्यायची कशी, उठायचे कसे, झोपेत काय करायचे या असल्या गोष्टी आपल्या लक्षातच येत नाहीत. या गोष्टींचा मनुष्याने विचारच केलेला नाही.

तसे पाहता आपला दिनक्रम काय असावा, रोजचा आहार-विहार कसा असावा याचाही मनुष्याने विचार केलेला नसतो. दिवसाच्या व्यवहारावर झोप अवलंबून असते आणि झोप जेवढी व्यवस्थित होईल तेवढा दिवस चांगला जातो हे आपल्या लक्षात येत नाही. अव्यवस्थित झोप व अस्वस्थ दिवस हे दुष्टचक्र बहुतेकांना मोडता येत नाही. दिवसभर उचापती करणे, निंदानालस्ती करणे, खोटे बोलणे असे केलेले असले तर झोप नीट येत नाही.

आपण कुणाला तरी फसवतो आहे, शिक्षा भोगली जात आहे, आपल्याला कोणीतरी बडवते आहे, अशा तऱ्हेची स्वप्ने पडतात आणि झोप बिघडते. झोप बिघडली की डोळे चुरचुरतात, लाल होतात, कामात लक्ष लागत नाही, चिडचिड होते, जेवण जात नाही किंवा खूप खावेसे वाटते, पोट बिघडते आणि पर्यायाने पुन्हा नीट झोप येत नाही. हे झाले खाण्या-पिण्याच्या वा एकूण व्यवहाराच्या बाबतीत, परंतु चांगली झोप येण्यासाठी आपले शरीर स्वस्थ असावे लागते तसेच मनही शुद्ध असावे लागते.

झोप या गोष्टीची निसर्गाने कशासाठी योजना केली? आपण डोळ्यांनी दिवस-रात्र जे काही पाहतो, कानांनी ऐकतो, हातांनी काम करतो ते सर्व मेंदूपर्यंत पोचवून काय काय काम झाले ते स्मृतीत ठेवण्याचे काम मेंदूलाच करावे लागते. एकापाठोपाठ एक शांतपणे ज्यावेळी काम केले जात नाही, भरभर केले जाते त्यावेळी त्या कामांची नोंद मेंदूत व्यवस्थित होत नाही. नंतर झोपेत जेव्हा नवीन संवेदना येत नाहीत तेव्हा मेंदू आत आलेल्या माहितीचे वर्गीकरण व नोंद करत असावा.

शांत व चांगल्या झोपेसाठी जसे खाणे-पिणे, दिवसातील आचरण जसे नीट असणे आवश्‍यक असते तसेच यासाठी बऱ्याच अंशी झोपण्याची व्यवस्थाही जबाबदार असते. आमची झोपण्याची खोली छान मोठी आहे असे लोक म्हणतात. झोपण्याची खोली लहान आहे वा मोठी हा खरा प्रश्र्न नसतो, प्रश्र्न असतो तो वास्तूच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने झोपण्याची खोली कशी आहे याचा आणि त्यावरही झोप कशी येईल हे अवलंबून असते. झोपण्याच्या खोलीत अडगळ नसावी. तसेच कुणीतरी अनोळखी व्यक्तीने दिलेली भेटवस्तू, प्रदर्शनात वगैरे विकत घेतलेल्या वस्तू वगैरे सामान आणल्यावर ते प्रथम झोपण्याच्या खोलीत ठेवू नये.

झोपण्याच्या खोलीला बाथरूम जोडलेली असावी म्हणजे सोयीचे होते असे म्हटले जाते, व तशी व्यवस्था अनेक जणांकडे केलेली असते. परंतु बाथरूम झोपण्याच्या खोलीच्या बाहेर असणे अधिक योग्य ठरते. झोपण्याच्या खोलीतून बाहेर आल्यावर २-४ फुटांवर बाथरूम असावी. बॅक्टेरिया, छोटे किडे हे कितीही छोटे असले व त्यांची चालण्याची गती कितीही कमी असली तरी ते प्रत्यक्षात अनेक किलोमीटर प्रवास करत असतात.

त्यामुळे शौचकूपापासून, बाथरूमच्या जाळीपासून पलंगापर्यंत यायला त्यांना १०० वर्षे लागत नाहीत. शिवाय शौचकूप, बाथरूम असलेली जागा (चौक) वर आकाशाला उघडा असावा असे शास्त्र सांगत असत. यामुळे तेथील मोकळ्या हवेमुळे जंतू व दुष्ट शक्ती या दोन्हींपासून संरक्षण मिळत असे. दुष्ट शक्ती असे वाचल्यावर एकदम घाबरून जायचे कारण नाही.

प्रत्येक वातावरणाची तसेच प्रत्येक जागेची एक विशिष्ट शक्ती असते. तेथे येणारे वेगवेगळे शक्तिप्रवाह म्हणजे खालून जाणारे पाणी, वरून जाणाऱ्या विजेच्या तारा वगैरेंमुळे जागेच्या शक्तीत बदल झालेले दिसतात. या शक्ती प्रत्येकाला अनुकूल असतीलच असे नाही. त्या अनुकूल नसल्या तर त्यांना दुष्ट शक्ती असे म्हणण्याची पद्धत पडलेली आहे.

झोपण्याच्या खोलीत कचरा नसावा. तेथे निवडुंगाची झाडे वगैरे ठेवण्याची पद्धत चुकीची आहे. झोपण्याच्या खोलीत एखादे-दुसरे चांगले निसर्गचित्र, उत्तुंग अशा हिमालयाचे एखादे चित्र किंवा आपल्या श्रद्धेनुसार देवादिकांचा किंवा प्रियजनांचा फोटो असावा. झोपल्यावर डोक्यावर किंवा अंगावर पंख्याचा वा एसीचा सरळ झोत येणार नाही, याकडे लक्ष असावे. खिडकीतून येणारा थंड वारा डोक्यावर येणेही चांगले नसते. शिवाय अशा वेळी खिडकीतून आत हात घालून कोणीतरी त्रास देण्याची भीती वाढू शकते.

शास्त्र असे म्हणते की, जमिनीवर झोपले तरी जमिनीवर सतरंजी घालावी, त्यावर खूप जाड नाही, खूप बारीक नाही अशी गादी किंवा ब्लँकेटची चौघडी असावी. पलंगावर झोपण्यास हरकत नसते, परंतु पलंग बनविताना वेगवेगळ्या (चुकीच्या) वृक्षांचे लाकूड, कोठेतरी लाकूड, कोठेतरी प्लास्टिक, स्टील वा ॲल्युमिनियम नसावे. पलंगात शक्यतो स्प्रिंग टाळाव्यात.

गादी फार मऊ नसावी. फार कडक नसावी. ती कितपत कडक असावी याचा एक नियम आहे. गादी शरीराला मऊ असावी, पण शरीर गादीत आत रुतू नये. म्हणजेच फार जाड वा फार मऊ नसावी. तोंड छताकडे करून गादीवर झोपावे, हात शरीराच्या दोन्ही बाजूला असावेत व कोपरावर दाब न देता कंबरेत वाकून उठता यावे. हे शक्य झाल्यास गादी चांगली समजावी. चुकीच्या गादीमुळे मेरुदंड, मान यांचे विकार होऊ शकतात. झोपताना सहसा दक्षिणेकडे पाय करून झोपू नये. ज्यांना लोहचुंबकीय शक्तीविषयी समजते त्यांना हे सांगण्याची वेगळी गरज नाही.

झोपायच्या आधीची दहा मिनिटे जास्तीत जास्ती स्वतःच्या बरोबर साक्षित्वाने राहणे आवश्‍यक असते. झोपेपर्यंत टीव्ही पाहणे, आता बसवत नाही असे म्हणून टीव्ही पाहता पाहता झोपणे वगैरे सवयी आरोग्यासाठी योग्य नव्हेत. झोपायच्या आधी १० मिनिटे बिछान्यात पडल्या पडल्या छान संगीत ऐकावे, एखादे स्तोत्र ऐकावे किंवा म्हणावे, ते स्तोत्र संस्कृत असले तर मेंदूला अधिकच उपयोगी ठरते. अशा तऱ्हेने झोपण्याच्या आधी नेहमी प्रार्थना करण्याची सवय ठेवावी.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com