‘एक तास तरी व्यायाम हवाच’

कोणतीही गोष्ट किंवा वस्तूचा वापर केला नाही तर लवकर आणि जास्त खराब होते. गंज चढतो. हाच नियम रिकामं मन आणि व्यायाम न करणाऱ्या शरीराला लागू होतो.
Exercise for Health
Exercise for Healthsakal

- पूजा वाघ

कोणतीही गोष्ट किंवा वस्तूचा वापर केला नाही तर लवकर आणि जास्त खराब होते. गंज चढतो. हाच नियम रिकामं मन आणि व्यायाम न करणाऱ्या शरीराला लागू होतो. माझ्या मते मन आणि शरीर नाण्याच्या दोन बाजू आहेत. शरीर सुदृढ असेल, शारीरिक हालचालींमध्ये रमत असेल, तरच मनही प्रसन्न आणि उत्साही राहू शकतं. जिममध्ये जाणं म्हणजे तंदुरुस्तीबाबत जागरूक असणं असं अजिबातच नाही, तर मनानं तुम्ही फिटनेसबद्दल जागरूक असणं महत्त्वाचं आहे.

मी अभिनयासह मॉडेलिंग करते. मात्र कामाच्या वेगवेगळ्या, विचित्र वेळा, शेड्युलमुळे हे क्षेत्र आव्हानात्मक आहे. त्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती फार महत्त्वाची आहे. त्यासाठी काहीही झालं, तरी रोज किमान एक तास व्यायाम झालाच पाहिजे, यासाठी मी आग्रही आहे

मी कोणत्याही जिमला जात नाही; पण दररोज न चुकता घरच्याघरी सकाळी एक तास व्यायाम झाल्याशिवाय माझा दिवस सुरूच होत नाही.

यात वॉर्म अप, स्ट्रेचिंग, योगासन, पूर्ण बॉडी फॅट लॉस वर्क आऊट, प्राणायाम या गोष्टींचा समावेश असतो.

मी पूर्ण शाकाहारी आहे. दिवसाची सुरुवात सकाळी साडेपाचला स्वतः घरी तयार केलेल्या माझ्या मॉर्निंग ड्रिंकने करते. यात भाजलेले धने, जिरे, ओवा, बडीशेप यांची पाव चमचा पूड ग्लासभर कोमट पाण्यात टाकून रिकाम्या पोटी पीत असते. मग भिजवलेले बदाम, काळे मनुके, अंजीर खाते.

व्यायाम झाल्यानंतर सफरचंद, पेअर अशा प्रकारची सीझनल फळं खाते. दुपारी जेवणात पोळी, भाजी, सॅलड, कारळे/जवस चटणीचा समावेश असतो. तसंच ग्लासभर ताकही पिते. संध्याकाळी एखादं फळ त्याबरोबरीने कधी साळीच्या लाह्या, कधी फुटाणे, कधी एखादा खाकरा असा कोणताही एक खाऊ खाते. रात्रीचं जेवण साडेसातच्या आत होईल, यासाठी मी आग्रही असते. रात्री सव्वादहा- साडेदहाच्या सुमारास मी झोपते.

खरंतर आहाराबद्दल अनेक गैरसमज आहेत. अन्नाचा त्याग करणं म्हणजे डाएट नसून प्रमाणात खाणं म्हणजे डाएट आहे. त्यासाठी आपल्या शरीराला पुरेसं, योग्य प्रमाणात, सात्त्विक अन् नियमित योग्यवेळी आहार घेतला, तर आपलं शरीर तंदुरुस्त राहतं.

फिटनेसबद्दल टिप्स...

  • तुम्हाला फिट राहायचं असेल तर दररोज रात्रीची सात-आठ तास झोप अतिशय आवश्यकच आहे.

  • दररोज नियमितपणे व्यायाम झालाच पाहिजे. नृत्य, योगा, जिम, पोहणं, चालणं, सायकलिंग काहीही असो, शारीरिक हालचाली होणं गरजेचं आहे. मोठ्या माणसांनी आठवड्याला किमान दीडशे मिनिटं व्यायाम करावा, असा तज्ज्ञ सल्ला देतात तो उगीच नाही.

  • घरचं साधं, ताज, कमी तेलातील चौरस अन्न ज्यात प्रथिनं, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वं यांचा समतोल असेल, असं अन्न खावं.

  • फास्टफूड, हॉटेलमधील पदार्थ, चटपटीत व अतिगोड पदार्थ खाणं टाळावं. त्यातून आपल्याच शरीराचं नुकसान होतं.

  • वयानुरूप शरीरसंपत्ती खर्च होत असते, ती जपून वापरणं आपल्याच हाती असतं. त्यासाठी आपणचं आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यावी.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com