वाढता वाढता वाढे (पूर्वार्ध)

आयुर्वेदात या रोगाला ‘अति स्थौल्य’ असे म्हटलेले आहे. आयुर्वेदात आठ निंदनीय पुरुष (व्यक्ती) सांगितलेले आहेत.
average human weight healthy ayurveda disease cure
average human weight healthy ayurveda disease cure Sakal

- डॉ. मालविका तांबे

मध्यंतरी एका स्त्रीची मुलाखत ऐकत होते. ती सांगत होती की, समाजात आपण कधी कुणाला भेटलो तर सगळ्यांत प्रथम चर्चा होते ती वजनाची. कोणी भेटले की, तू कसा आहेस, काय आहे, हे विचारण्याआधी ‘‘अरे, बाप रे, तू किती बारीक झाला, तुला काही होते आहे का? किंवा तुझे वजन फार वाढलेले दिसते आहे, तुझे स्वतःकडे लक्ष आहे की नाही?’’

अशी चर्चा होताना दिसते. अर्थात ते खरंही आहे. कारण शारीरिक मापदंडांचा समाजात सगळीकडे विचार केला जातो. आजच्या काळात वजन समस्या संक्रामक रोगासारखी वाढत चाललेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार १९८० पासून २०१४ पर्यंत जगभरात लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलेले लोक दुपटीने वाढले आहेत.

आयुर्वेदात या रोगाला ‘अति स्थौल्य’ असे म्हटलेले आहे. आयुर्वेदात आठ निंदनीय पुरुष (व्यक्ती) सांगितलेले आहेत. त्यात स्थूलतेचा समावेश केलेले आहे. शरीरात मेदधातूचे अधिक प्रमाणात संचयन झाले की, त्याला मेदोरोग म्हटले जाते.

हा संतर्पणजन्य विकार आहे, असे आयुर्वेदात म्हटलेले आहे. जास्त प्रमाणात आहार घेतला जातो तेव्हा अशा प्रकारचा विकार उत्पन्न होताना दिसतो. अतिस्थूलतेचे आयुर्वेदातील लक्षण म्हणजे पोट, मांडी, कंबर, नितंब व छाती या ठिकाणी जास्त प्रमाणात मेदाचे संचयन होणे.

अर्थातच मेदधातूबरोबरच मांसधातू, वृद्धी व शोफ असणे हेसुद्धा वजनवाढीसाठी कारण ठरू शकते. अति स्थौल्य हा एकटा रोग नाही तर ते इतर अनेक रोगांचे कारण ठरते. शरीरात मंदाग्नी झाल्याने मेद धातू व आम वाढतो आणि त्यामुळे शरीरातील स्रोतांचा अवरोध होऊन शरीरातील धातूंचे पोषण नीट होत नाही,

शक्तीचा ऱ्हास होतो, उत्साह न वाटणे, व्याधिक्षमता कमी होणे, आयुष्य कमी होणे, शरीराला दुर्गंधयुक्त घाम येणे, धाप लागणे, जास्त प्रमाणात भूक-तहान लागणे, तसेच मधुमेह, हृदयरोग, अस्थिरोग, वीर्यधातूचा ऱ्हास, मानसिक अवसाद अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. त्यामुळेच प्रमाणाबाहेर वजन वाढणे हे बऱ्याच इतर रोगांना आमंत्रण असू शकते.

स्थौल्याचा कारणांचा विचार केला तर त्यात आहाराशी निगडित कारणे सगळ्यांत महत्त्वाची असतात. काही मुख्य गोष्टी आपण बघू या.

अधिक मात्रेत जेवण करणे : यात एकाच वेळी पोटभर खाणे किंवा रात्री उशिरा पोटभर खाणे हे दोन्ही असते.पहिल्या आहाराचे पचन झाल्याशिवाय दुसऱ्यांदा परत काही तरी खाणे, याला आयुर्वेदात अध्यशन म्हणतात.

  • फार जास्त प्रमाणात कफ वाढविणाऱ्या गोष्टी खाणे. जसे, गोड, थंड पदार्थ, चीज-क्रीम-लोणी-दही-आइस्क्रीम वगैरेंचे अतिसेवन.

  • तळलेल्या गोष्टी वा फार जास्त प्रमाणात तेल, तूप लोणी, मार्गारिन वगैरे वापरून बनविलेले पदार्थ अतिप्रमाणात खाणे.

  • यात सध्याच्या काळातील जंक फूडचाही समावेश होऊ शकेल.

  • फार जास्त प्रमाणात मांसाहार करणे.

  • नवीन धान्यांचा वापर करणे. गूळ व साखर यांचा अतिप्रमाणात वापर करणे.

  • जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे.

व्यवहारातील कारणांमध्ये सिडेंटरी लाइफस्टाइल म्हणजे फारशी हालचाल न करणे, बैठे काम करणे. व्यायामाचा अभाव, दिवसा झोपणे व जेवण झाल्याझाल्या झोपणे तसेच मैथुनाचा अभाव असणे.

मानसिक कारणांचा विचार केला असता आयुष्यात चिंता वा राग फार नसणे, मन आनंदित असणे.

सगळ्यांत महत्त्वाचे कारण म्हणजे बीजस्वभावात अर्थात घराण्यात स्थौल्याची प्रवृत्ती असणे. विचारपूर्वक आहार घेतला, विचारपूर्वक आचरण ठेवले, परंतु घराण्यात स्थौल्याचा इतिहास असला तर वजन वाढू शकते.

आजच्या युगातील कारणांचा विचार केला तर आजच्या काळात खाण्यापिण्याच्या बाबतीतील कुठलेही नियम पाळणे शक्य होत नाही किंवा ते पाळण्याची इच्छा नसते.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे अगदी लहान मुलांना भाज्या, फळे खायला आवडत नाही. सगळ्यांनाच सध्या बाजारात मिळणारे तयार अन्न आवडायला लागलेले आहे.

सध्या बहुतेक सगळ्यांच्या झोपण्याच्या वेळा चुकतात असे दिसते. रात्रीचे उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, हे सगळीकडे दिसते.

सध्या ऑफिसच्या कामकाजाची वेळ वाढल्यामुळे स्नॅकिंग म्हणजे दोन जेवणाच्या दरम्यान अधूनमधून काहीतरी तोंडात टाकण्याची सवय आजच्या काळात वाढताना दिसत आहे.

सध्याच्या आयुष्यात फार ताण आहे या नावाखाली आनंदी राहण्यासाठी किंवा रिलॅक्स होण्यासाठी फार प्रमाणात सोशल मीडिया व स्क्रीनचा वापर, रोज काहीतरी वेगवेगळे खाण्यात ठेवणे, तसेच मित्रमंडळींबरोबर आठवड्याच्या शेवटी एकत्र जमून धूम्रपान व मद्यपान करणे, प्रवासाची साधने सहज उपलब्ध असल्यामुळे जास्त प्रमाणात प्रवास करणे, याही गोष्टी वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

स्थौल्य नसावे आज याबद्दल समाजात जागरूकता वाढतानाही दिसत आहे. परंतु कधी कधी जागरूकतेचा अतिरेक होताना दिसतो. प्रत्येकाची झीरो फिगर असणे हे त्याच्या स्वास्थ्यासाठी इष्ट असेलच असे नाही. कधी कधी वजन जास्त असणे (स्थौल्य नाही) हे नैसर्गिकही असू शकते.

उदाहरणार्थ,

कफाची प्रकृती असणे : अशा अनेक व्यक्ती आपण पाहतो, ज्यांचे वजन थोडे जास्त असते, परंतु बांधा सुडौल असतो, ताकद भरपूर असते आणि व्यक्ती हसमुख असते. अशा व्यक्तींनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे वजन कमी होत नाही.

मी अर्धीच भाकरी खाल्ली, एकच पोळी खाल्ली तरी माझे वजन कमी होत नाही. मला फार भूकही लागत नाही, असे त्यांचे म्हणणे असते. वजन जास्त असणे हे त्यांच्यासाठी नैसर्गिक असते. आपले वजन जास्त आहे हे चुकीचे नाही, हे कसे ओळखावे तर थकवा नसेल तर वजन जास्त असले तरी त्याकडे फारसे लक्ष देऊ नये.

वजन वाढलेले असणे व बरोबरीने थकवा असणे ही मात्र दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. ज्या व्यक्तीचे वजन कफामुळे वाढलेले असेल तिचा बांधा सुडौल असतो व ती व्यक्ती सदैव उत्साही असते, कुठलेही काम करताना अशा व्यक्तीला शारीरिक वा मानसिक ताकद कधीही कमी पडत नाही.

गर्भवती स्त्री - गर्भवतीचे वजन वाढणे हे नैसर्गिक आहे. सध्याच्या काळात सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर वजन कमी करणे अवघड होत जाते, त्यामुळे गर्भवतीला तिने वजन वाढू देऊ नये असे सांगितले जाते. गर्भाचे वजन वाढणे ठीक आहे, मात्र गर्भवतीचे वजन वाढू देऊ नये असा सल्ला सध्या दिला जातो. गर्भारपणात ७ ते १२ किलो वाढणे नैसर्गिक आहे.

यातील ५ ते ६ किलो वजन गर्भाचे व त्याच्या आजूबाजूला असणारे गर्भजल, गर्भाभोवती असलेली वार वगैरेंचे असते. बाळंतपणाच्या दिव्यातून जाण्याकरिता तिला स्वतःलाही ताकद वाढवणे आवश्यक असते, म्हणूनच निसर्गाने तिचेही ४-५ किलो वजन वाढवलेले असते. सूतिकाचर्येचे पालन केल्यावर गर्भारपणात वाढलेले वजन काही प्रमाणात पूर्वपदावर यायला मदत मिळते.

गर्भारपणात व बाळंतपणानंतर २०-२५ किलो वजन वाढणे इष्ट नाही. तथापि वजनाचा अति विचार केल्यामुळे सध्या गर्भवतीला अशा प्रकारचा आहार दिला जातो की तिचे स्वतःचे वजन अजिबात वाढू नये. अशामुळे बाळाला स्तन्य न पुरणे, कंबर दुखणे, केस गळणे, ताकद कमी होणे, हॉर्मोन्सचे असंतुलन होणे वगैरे त्रास होताना दिसतात.

याबद्दलची आणखी माहिती व उपचार पुढच्या भागात बघू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com