
Baby Diet Plan: मुलांना सुका मेवा कसा द्यायचा?
एक वर्षाच्या बाळाला तुम्ही घरात शिजवता किंवा तुम्ही जे खाता ते खाता आलं पाहिजे. पदार्थांना चव आणण्यासाठी हिंग, सुंठ, जिरेपूड, धणेपूड किंवा दालचिनीचा वापर करावा.
या वयाची मुले थोडं वेगळं आणि थोडंसं जड अन्न खाऊ शकतात. त्यांना खाऊ घालणे सोपे जाते. आहारातला बदल आवडू लागल्याने खाताना ते जास्त त्रासही देत नाहीत.
स्तन्यपानाविषयी बोलायचं झाल्यास १ वर्ष पूर्ण होत आले, म्हणून बाळाचे स्तन्यपान बंद करू नये. बाळ साधारण १२ ते १८ महिन्यांचे होईपर्यंत त्याच्या आहारात स्नन्यपान महत्त्वाचे असते.
बाळाला आहार देतानाची काळजी
बाळानं घास गिळलाय ही खात्री झाल्याखेरीस पुढचा घास भरवू नये.
बाळ लहान असताना त्याला चमच्यामधील मधला पदार्थ ओढून घेता येत नाही हे लक्षात घेऊन चमच्याच्या टोकावर छोटासा घास घेऊन त्याला भरवावा.
सुरुवातीच्या काही दिवसांत एक पदार्थ रोज फक्त एकदाच भरवावा.
एखादा नवीन पदार्थ भरवताना बाळाची काही तक्रार वाटली नाही तर तो पदार्थ बाळाच्या आहारात समाविष्ट करावा.
नवीन पदार्थ दिल्यावर बाळाची प्रतिक्रिया महत्त्वाची असते. त्यानुसार बाळाला काय पचते काय चालते हे जाणून घ्यावे.
टीप : बाळ साधारण १ वर्षांचे होईपर्यंत काही म्हणजे अंड्याचा पांढरा भाग, मीठ, साखर, तळलेले पदार्थ, शेंगदाणे, चहा, कॉफी हे पदार्थ डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय देऊ नये.
पचनासाठी : समप्रमाणात सुंठ, हिरवी बडीशेप, किंग हळद, काळे मीठ, जिरे, ओवा हे सर्व पदार्थ समप्रमाणात घेऊन याची पावडर करणे व ती पावडर वस्त्रगाळ करणे. प्रत्येक पदार्थामध्ये चिमूटभर वापरणे यामुळे लहान मुलांमध्ये गॅसेस होणार नाही व पोट व्यवस्थित साफ होईल
मुलांना सुका मेवा कसा द्यायचा?
लहान मुले सुकामेवा व्यवस्थित चावून खात नाहीत; तसेच त्यामुळे त्यातलं पोषकतत्त्व त्यांना मिळत नाही. यासाठी बदाम, अक्रोड, लाल भोपळ्याच्या बिया, थोडे काजू, पिस्ता या सगळ्याची पावडर करून देऊ शकता.
तीन ते पाच वर्षांच्या बाळाचा आहार
नाश्ता : नाश्त्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे, या सगळ्याचे मिश्रण असणारा नाश्ता हवा. जसे की, थालीपीठ, अंड्याचे ऑम्लेट करून त्याचा रोल, पनीर रोल, किंवा पराठा, बेसन, मुगाचे धिरडे, त्याचा रोलही करू शकता.
अकरा वाजता : एखादे फळ किंवा नारळ पाणी चालेल.
दुपारचे जेवण : पोळी-भाजी, सॅलडची सवय लहानपणापासूनच लावलेली बरी, दही किंवा लस्सी आणि वरण भात (घरी बनवलेले तूप घालून) किंवा पालक भात, टोमॅटो भात, पुलाव, बिर्याणी असे भाताचे वेगवेगळे प्रकार द्यावेत.
संध्याकाळी पाच वाजता : बदाम शेक, काजू शेक, सोयाबीनचे दूध, लस्सी यासारखे पदार्थ. हे खाल्ल्यानंतर मुलांना बाहेर खेळायला पाठवावे
संध्याकाळचे जेवण : आठच्या सुमारास द्यावे. दुपारच्या आहाराप्रमाणे आहार किंवा मूग डाळीची खिचडी- त्याच्यामध्ये, भाज्या, पनीर, सोयाबीन, शेंगदाणे यांसारखे पदार्थ वापरणे.