
थोडक्यात:
राजस्थानमध्ये नऊ वर्षांच्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
एवढ्या लहान वयात हार्ट अटॅक शक्य आहे का, यावर पालकांमध्ये चिंता आणि शंका निर्माण झाल्या आहेत.
तज्ज्ञ डॉक्टरांनी यामागे काय कारण असू शकते याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
Doctor Advice on Child Heart Health: काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील एका नऊ वर्षांच्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. शाळेच्या मधल्या सुट्टीत दाब उघडताना तिला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली. तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला गेला. दुर्दैवाने रुग्णवाहिकेतच तिला दुसरा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून, एवढ्या लहान वयातही मुलांना हार्ट अटॅक येऊ शकतो का? या वयात असा मृत्यू खरंच हार्ट अटॅकमुळे होतो का, की यामागे काही इतर वैद्यकीय कारणं असतात? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ डॉक्टरांनी याबाबत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे.
पुण्यातील लिटिल हार्ट केअर सेंटरचे बालरोग हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज सुगावकर सांगतात, "लहान मुलांमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू होणं हे फारच दुर्मिळ आहे. एवढ्या लहान वयात हार्ट अटॅकच झालाय असं लगेच गृहीत धरता येत नाही. अनेकदा जन्मतःच हृदयात काही तृटी असतात, जसं की हृदयात छिद्र असणं, ठोके कमी असणं किंवा एखादा वॉल्व्ह नीट न उघडणं; या सगळ्या शक्यतांचा बारकाईने विचार करूनच निदान केलं जातं."
लहान मुलांमध्ये सामान्य माणसांसारखा हार्ट अटॅक येणं नगण्य आहे. मात्र, जन्मतःच किंवा नंतर निर्माण झालेल्या हृदयदोषांमुळे जसे की अरिथमिया (Arrhythmia), गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
याव्यतिरिक्त पुढील स्थितींमध्ये देखील मुलांमध्ये गंभीर समस्या उद्भवू शकतात:
जन्मतःच हृदयात छिद्र असणे (Hole in Heart): अशा स्थितीत मुलांना वारंवार श्वसनाचे त्रास, सर्दी-खोकला होतो. या त्रासांमुळे परिस्थिती गंभीर झाली तर हृदयविकारासारखी स्थिती निर्माण होऊ शकते.
Rhythm Disturbance / Long QT Syndrome: हृदयाच्या ठोक्यांचा क्रम बिघडणे, ठोके अनियमित होणे किंवा अत्यंत कमी होणे. काही नवजात मुलांमध्ये इतका कमी ठोका असतो की त्यांच्या हृदयात 'पेसमेकर' बसवावा लागतो.
Arrhythmic Dysplasia: हृदयाच्या संरचनेत बिघाड असल्यास हृदयविकारासारखी स्थिती उद्भवू शकते.
Dilated Cardiomyopathy: अनेक वेळा मुलांना सर्दी-खोकला वारंवार होत असतो. पण जर ही सर्दी-खोकल्याचे प्रमाण जर जास्त असेल आणि त्याचा परिणाम हृदयाच्या स्नायूंवर झाला असेल, तर हृदयाच्या पंपिंग क्षमतेवर परिणाम होतो. जे अत्यंत गंभीर ठरू शकतं.
डॉक्टरांच्या मते, आजच्या काळात मुलांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. ज्याचा त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला असून लहान वयातही हृदयविकाराशी संबंधित लक्षणं दिसू लागली आहेत. त्यामुळे जीवनशैली खूप महत्त्वाची भूमिका बजावते.
"आता अनेक पालक आपल्या मुलांना छातीत दुखण्याच्या तक्रारीसह डॉक्टरांकडे घेऊन येत आहेत. काही शाळा तर पालकांना थेट हृदयरोगतज्ज्ञांकडून तपासणी करून आणायला सांगतात," असं एका डॉक्टरांनी सांगितलं.
तसेच संपूर्ण चेकअप झाल्यानंतर सुदैवाने त्यांच्या आरोग्यात काही समस्या निदान होत नसली, तरी ही एक चिंतेची बाब असल्याचे डॉक्टर सांगतात.
आपल्या मुलांचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पालक सतत प्रयत्न करत असतात. त्यामुळे लहान मुलांमधील आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी पालकांनी काय केले पाहिजे असा प्रश्न पालकांच्या मनात सध्या निर्माण होत आहे. त्याकरता सर्वात आधी त्यांनी मुलांचा आहार, झोप आणि त्यांचा व्यायाम या तीनही गोष्टी नियमित पाळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी पुढील प्रमाणे पालकांनी मुलांच्या जीवनशैलीत बदल करावेत.
मुलांच्या निरोगी वाढीसाठी लहानपणापासूनच संतुलित आणि पोषणमूल्यांनी भरपूर आहार आवश्यक आहे. डॉक्टरांच्यानुसार पुढीलप्रमाणे मुलांचा आहार असावा.
- मुलांचा आहार हा प्रमाणात आणि उपयुक्त व गरजेच्या कॅलरीजने भरपूर असावा.
- मुलांच्या आहारात तेलकट, जंक फूड आणि साखर यांचं प्रमाण मर्यादित ठेवा. त्यांच्या आहारात आवश्यक पोषणमूल्यं असणारे पदार्थ समाविष्ट करा.
- मुलांचा आहार हा प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि आवश्यक फाट्सने या सगळ्या पोषणमूल्यांनी परिपूर्ण असावा.
- मात्र लक्षात ठेवा की, जेवणात अति प्रमाणात कार्बोहायड्रेट्स नसावेत. आहार हा फायबरयुक्त देखील असावा.
- सध्या फळे-भाज्या औषध फवारणी झालेल्या येत आहेत. त्यामुळे त्यामुळे फळं-भाजी नीट धुणं, स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे. पण मुलांच्या रोजच्या आहारात फळांचा, सुकामेव्याचा, हिरव्या पालेभाज्या आणि पुरेशा सलाडचा समावेश असेल याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे.
- मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात, त्यामुळे फक्त मुलांचाच नाही तर तुमचा आहार देखील संतुलित ठेवा, जेणेकरून मुलं जेवताना कोणत्याही पद्धतीची चिडचिड करणार नाहीत.
उत्तम आरोग्यासाठी शारीरिक हालचाल आणि व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. यामुळे मुलं तंदुरुस्त राहतात आणि कोणतेही संभाव्य आजार होण्यापासून टाळता येतं.
- मोबाइल-टीव्हीपासून दूर ठेवून मुलांना खेळायला, फिरायला प्रवृत्त करा. फिजिकल अॅक्टिव्हिटी कमीत कमी १ तास तरी व्हावी.
- केवळ शालेतील शारीरिक शिक्षणाच्या तासांवर अवलंबून न राहता, मुलांना विविध खेळाचे कोचिंग लावा. जसे की फुटबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन किंवा त्यांच्या आवडीच्या कोणत्याही खेळात त्यांना सहभागी करा.
- सुट्टीच्या दिवशी मुलांना घरा जवळील टेकडीवर किंवा गड-किल्ल्यांवर ट्रेकिंगला घेऊन जा. एखाद्या दिवशी त्यांच्यासोबत सायकलिंग, रनिंग किंवा चालणं करा. अशाने तुमच्यामध्ये संवादही होईल, आणि तुमचं नातंही अजून घट्ट होण्यासाठी मदत होईल.
मुलांच्या आरोग्यासाठी आहार आणि व्यायामासोबतच झोपही तितकीच अनिवार्य आहे. रोज किमान ९-१० तासांची शांत झोप मुलांच्या मेंदूसोबतच एकंदरीत आरोग्यासाठी गरजेची असते असं डॉक्टर सांगतात.
मात्र शासनाने शाळांची वेळ सकाळी ८ नंतर ठेवायला सांगितली असूनही अजूनही बऱ्याच शाळा सकाळी ७.३०-८ वाजता सुरु होतात. त्यामुळे मुलांना ६ किंवा ७ वाजता उठावं लागतं. ज्यामुळे मुलांना आवश्यक तेवढी झोप मिळत नाही आणि मुलं आजारी पडू शकतात.
"ज्या वेगाने आज समाजात हृदयविकाराचे रुग्ण वाढत आहेत, ते पाहता भारतीय नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सजग होणं ही काळाची गरज बनली आहे. प्रत्येकाने आपल्या आरोग्याला प्राधान्य दिलं पाहिजे, ज्यामध्ये आहार ८०% आणि व्यायाम २०% भूमिका बजावतात. आठवड्याला किमान १५० मिनिटं व्यायाम किंवा कोणतीही शारीरिक हालचाल ही अतिशय गरजेचं आहे. हे आरोग्यविषयक भान प्रत्येक कुटुंबात रुजलं पाहिजे आणि कृतीत उतरलं पाहिजे."
- डॉ. पंकज सुगावकर (बालरोग हृदयरोगतज्ज्ञ), लिटिल हार्ट केअर सेंटर
एवढ्या लहान वयात हार्ट अटॅक येऊ शकतो का? (Can a heart attack occur at such a young age?)
- सामान्यतः लहान मुलांमध्ये हार्ट अटॅक होणं अत्यंत दुर्मिळ आहे. मात्र काही जन्मजात हृदयदोष, हृदयाच्या ठोक्यांशी संबंधित समस्या किंवा विशिष्ट वैद्यकीय स्थितींमुळे गंभीर अवस्था निर्माण होऊ शकते.
लहान मुलांमध्ये हृदयविकाराची लक्षणं कोणती असू शकतात? (What are the symptoms of heart problems in children?)
- छातीत दुखणं, श्वास घेताना त्रास होणे, वारंवार थकवा, चक्कर येणे, निळसर त्वचा किंवा ओठ, वारंवार सर्दी-खोकला, अशी काही लक्षणं हृदयविकाराशी संबंधित असू शकतात.
मुलांचं हृदय निरोगी ठेवण्यासाठी पालकांनी काय काळजी घ्यावी? (What precautions should parents take to keep their child's heart healthy?)
- पालकांनी मुलांना संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप देणं आवश्यक आहे. तेलकट, जंक फूड आणि साखरेचं प्रमाण कमी ठेवणं आणि फळं, भाज्या, सुकामेवा यांचा समावेश वाढवणं उपयुक्त ठरतं.
हृदयविकार निदानासाठी कोणत्या चाचण्या केल्या जातात? (What tests are used to diagnose heart problems in children?)
- हृदयविकाराचं निदान करण्यासाठी सामान्यतः ECG (हृदयाच्या ठोक्यांचं विश्लेषण) आणि 2D Echo (हृदयाच्या हालचालींचं निरीक्षण) या चाचण्या केल्या जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.