
कोरोना : लसीचा चौथा डोस ओमिक्रॉनवर प्रभावी नाहीच, चाचणीचा अहवाल उघड
कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron variant) जगभरात वेगाने पसरत आहे. या वेगाने पसरणाऱ्या व्हेरिएंटमुळे जगभरातील आरोग्य सेवांवरील ताण वाढला आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी इस्रायलने गेल्या महिन्यात आपल्या नागरिकांना कोरोना लसीचा चौथा डोस (Corona Fourth Booster) देण्यास सुरुवात केली. मात्र, नुकतेच इस्त्रायली रुग्णालयांमधील बूस्टर डोसच्या वापराबद्दल करण्यात आलेल्या संशोधनामधून निराशाजनक बाब समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये कोरोना लसीचा चौथा डोस देखील ओमिक्रॉन(Omicron) पासून मर्यादित संरक्षणच देत असल्याचे समोर आले आहे.
चौथा डोस का दिला जातोय?
ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्यानंतर शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, लसीचे (Corona Vaccine) दोन डोस या व्हेरिएंटविरूद्ध कमी प्रभावी होतील, कारण कालांतराने त्याची प्रभाव कमी होत जातो. अशा परिस्थितीत, लोकांना या व्हेरिएंटपासून संरक्षणासाठी तिसऱ्या म्हणजे बूस्टर डोसची आवश्यकता असेल. मजेशीर बाब म्हणजे इस्रायलमध्ये कोरोना लसीची कमी होत चाललेली परिणामकारकता आणि विषाणूपासून अतिरिक्त संरक्षणासाठी लसीचा तिसरा डोस आधीच लागू करण्यात आला होता. असे असूनही, देशातील लोकांना ओमिक्रॉनची लागण होत असल्याचे समोर आले आहे.
यामुळे, इस्रायल सरकारने नंतर नागरिकांना कोरोना लसीचा चौथा डोस देण्याचा निर्णय घेतला. आता शेबा हॉस्पिटलमधून लसीचा चौथा डोस घेतलेल्या 270 हून अधिक डॉक्टरांच्या चाचणीच्या अहवालातून धक्कादायक खुलासे झाले आहेत. असे सांगण्यात आले आहे की, 270 पैकी 154 जणाांनी फायझर लस घेतली होती, तर 120 जणांनी फायझरचे ३ आणि मॉडेर्ना लसीचा एक डोस घेतला आहे.
हेही वाचा: राज्यात दिवसभरात 39,207 रुग्ण; एकही ओमिक्रॉनबाधित नाही
चौथ्या डोसचे परिणाम काय होते?
संशोधनात असे दिसून आले की चौथ्या डोसनंतर, सर्वांमध्ये अँटीबॉडीजचे प्रमाण आधीच्या म्हणजेच तिसऱ्या डोसपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले. मात्र, या वाढलेल्या अँटिबॉडीज देखील ओमिक्रॉनचा प्रसार रोखू शकलेल्या नाहीत. अभ्यासानुसार, चौथ्या डोसने वाढलेल्या अँटिबॉडीजने ओमिक्रॉन विरूद्ध केवळ आंशिक संरक्षण दिले.
या संशोधणाचे प्रमुख संशोधक प्रो. गिली रेगेव-योचे म्हणाले, “आधीच्या स्ट्रेन विरूद्ध अतिशय प्रभावी असलेली ही लस ओमिक्रॉन स्ट्रेन विरूद्ध कमी प्रभावी आहे.” या निकालांनंतर, इस्रायलच्या वृद्धांना आणि 60 वर्षांवरील डॉक्टरांना दुसरा बूस्टर डोस (एकूण चौथा डोस) देण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
इस्रायल सरकारचे म्हणणे आहे की, गेल्या आठवड्यात किमान पाच लाख लोकांना दुसऱ्यांदा बूस्टर डोस मिळाला आहे. इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाचे संचालक डॉ नहमान ऐश यांच्या म्हणण्यानुसार, हे संशोधन असे म्हणत नाही की, लसीचा चौथा डोस देणे ही आमची चूक होती. वृद्धांमध्ये अँटिबॉडीजची वाढलेली पातळी केवळ त्यांना जास्त संरक्षण देईल. मात्र, बूस्टर डोस पुन्हा लागू करण्याच्या निर्णयावर व्यापक चर्चेची गरज आहे.
हेही वाचा: फक्त फोन सुरु ठेवायचाय? हे आहेत Jio, Airtel अन् Vi चे बेस्ट प्लॅन्स
रुग्णालयाने या अभ्यासासंबंधी अधिक डेटा जारी केला नाही. मात्र रेगेव्ह-योचे यांनी सांगितले की, संशोधनाचे परिणाम केवळ प्राथमिक आहेत, परंतु यामुळे सुरुवातीला महत्वाती माहिती मिळत असल्याचे सांगीतले. लस ओमिक्रॉन व्हेरिएंटपासून सुरक्षा देत नसल्याचा निकाल जाहीर केल्यानंतर काही तासांनंतर, धोका असलेल्या गटांसाठी लसीकरण मोहीम सुरू ठेवण्याचे आवाहन करणारे विधान प्रकाशित करण्यात आले आहे.
दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने देशांना आवाहन केले आहे की, जोपर्यंत संपूर्ण जगाला लसीचे सुरुवातीचे डोस मिळत नाही तोपर्यंत बूस्टर डोस मोहिम थांबवण्यात यावी, मात्र इस्रायल आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार. सुमारे 9.5 मिलीयन लोकसंख्येपैकी सुमारे दोन तृतीयांश इस्रायली नागरिकांना लसीचा किमान एक डोस मिळाला आहे आणि सुमारे 4.4 मिलीयन इस्रायलींना तीन डोस मिळाले आहेत.
हेही वाचा: 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी! परीक्षेविना मिळेल रेल्वेत नोकरी
Web Title: Israeli Study Show 4th Dose Of Corona Vaccine Shows Limited Results With Omicron Variant Of Corona
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..