तंदुरुस्त राहण्यासाठी मनाचंही ऐका

आरोग्य म्हणजे शारीरिक आणि मानसिक सुस्थिती, संतुलन आणि सुनियंत्रण. हे साधण्यासाठी सर्वांत आवश्यक आहे तो नियमितपणा.
actress mrunmayee kolvalkar
actress mrunmayee kolvalkarsakal

- मृण्मयी कोलवलकर, अभिनेत्री

आरोग्य म्हणजे शारीरिक आणि मानसिक सुस्थिती, संतुलन आणि सुनियंत्रण. हे साधण्यासाठी सर्वांत आवश्यक आहे तो नियमितपणा. शरीरातल्या क्रिया-प्रक्रिया व्यवस्थित चालाव्यात, स्नायू बळकट व्हावेत आणि सर्व संस्थांचं कार्य सुरळीत चालावं यासाठी व्यायामाची नितांत आवश्यकता आहे.

माझ्या बाबतीत सांगायचं तर व्यायामात तोचतोचपणा येऊ नये व शरीर आणि मनाला सुदृढ ठेवण्यासाठी वेगवेगळी आव्हानं मिळण्यासाठी मी निरनिराळे प्रकार करते. उदाहरणार्थ, पायलेट्स या आधुनिक व्यायाम प्रकारात ब्रीदिंग, कोअर स्ट्रेन्थ आणि फ्लेक्झिबिलिटी यावर फोकस असतो. म्हणून पायलेट्स मला खूप आवडतो. नृत्य करताना आपोआपच कार्डिओ होते आणि लयबद्ध हालचाली होतात. नृत्य करणं मला आवडत असल्यामुळे मनोरंजनही होतं.

माझा एक आवडता एक्सरसाइज म्हणजे वेगानं चालणं. हा व्यायाम कधीही, कुठंही, कोणालाही करता येतो. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे खर्च होत नाहीत. चालताना ताजी हवा मिळते आणि गतिशीलतेमुळे मिळणारे फायदे अनेक असतात.

शरीराला जास्त ताण देऊ नका

व्यायाम करण्याचा नियमितपणा महत्त्वाचा असला, तरी शरीराचं म्हणणं नेहमी ऐकावं. कधीकधी शरीर थकलेलं असतं. वर्कआऊटमुळे स्नायूंना थकवा आलेला असतो. अशा वेळी व्यायामाची वेळ झाल्यानं शरीराला पुढे केलं, तर फायद्यापेक्षा धोका वाढण्याचीच शक्यता जास्त असते. म्हणून अशा वेळी शरीराला ताण देण्यापेक्षा साध्या हालचाली कराव्यात. नोकरी, धंदा किंवा शिक्षणाच्या निमित्तानं प्रत्येक जण दिवसभर थकलेला असतो. शरीराला व्यायामाप्रमाणे शांत झोप व पुरेशा विश्रांतीची आवश्यक असते. त्यामुळे शरीराला आराम देणं तेवढंच महत्त्वाचं आहे.

आहार सात्त्विक असावा

संतुलित व चौरस आहार आरोग्यासाठी आवश्यक आहे. जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. आहार कसा असावा, हा अगदी वैयक्तिक विषय आहे. प्रत्येकाचं शरीर, क्षमता, आरोग्य समस्या, गरज यानुसार आहार ठरलेला असतो. डाएटमध्ये वजन कमी करणं हा एकमेव उद्देश नसावा. शरीराची उपासमार न करता आपल्याला पचेल आणि शरीराला आवश्यक तेवढा आहार घेणं गरजेचं आहे. आहारातून पोट भरल्याची, मन तृप्त झाल्याची भावना असावी.

घरचं ताजं जेवण भारी

मी आजपर्यंत डाएटचे अनेक प्रयोग करून पाहिले. त्यावरून निष्कर्ष काढला की, सकाळी आणि संध्याकाळी; तसंच घरी वेळेवर केलेलं ताजं आणि साधं जेवण घेतलं तर तब्येत उत्तम राहते. मी झोपेतून सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम ड्रायफ्रूट्स आणि काजू खाते. कारण, त्यावेळी आपल्या शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांची आवश्यकता असते.

मी सकाळी नाश्ता करताना अंडी आणि टोस्ट घेते. त्यातून प्रोटिन्स मिळतात. दुपारच्या जेवणात भाकरी, भाजी, डाळ-भात आणि सॅलड असा चौरस आहाराचा समावेश असतो. संध्याकाळी फळं खाते. रात्री आहारात सूप, लोखंडी जाळीवर भाजलेलं चिकन, मुगाचं घावन यांसारख्या पदार्थांचा समावेश असतो. आहारामध्ये त्याच-त्याच पदार्थांचा समावेश असल्यास ते कंटाळवाणं वाटतं. म्हणून त्यात बदल करावेत.

हे सगळं करत असताना सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे मन समाधानी व आनंदी असणं. विविध गोष्टी करत असताना मन प्रसन्न नसेल, तर तुम्ही आरोग्यदायी आणि तंदुरुस्त राहू शकणार नाही. तुमची पूर्ण जीवनशैली आणि सकारात्मक विचार हा आरोग्याचा गुरूमंत्र आहे.

(शब्दांकन - अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com