व्यायामातून राखा आरोग्याचा समतोल

आरोग्य हे आपल्या मानसिक स्वास्थ्यावर अवलंबून आहे. मन विचलित असेल तर शरीरस्वास्थ्यावर लक्ष केंद्रित करता येत नाही.
health
healthsakal

- मानिनी दुर्गे, अभिनेत्री

आरोग्य हे आपल्या मानसिक स्वास्थ्यावर अवलंबून आहे. मन विचलित असेल तर शरीरस्वास्थ्यावर लक्ष केंद्रित करता येत नाही. मी शारीरीक स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी नियमित जिमला जाते आणि योगासने करते.

मी शाळेत असताना माझे बाबा मला नियमित स्पोर्ट्‌सला नेत असत. येथे मी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असे. त्यामुळे मला लहानपणापासूनच फिटनेसची आवड लागली आहे. रनिंग, योगासने हे माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग असल्याने माझं मेटॅबोलिझम उत्तम आहे.

चित्रीकरणादरम्‍यान सकाळी लवकर कॉलटाईम असणे, बाहेरगावी चित्रीकरण असणे अशा वेळेसही मी सकाळी न चुकता लवकर उठून वॉर्मअप करून चक्रासन, ताडासन आणि वृक्षासन करते. यामुळे माझा चेहरा रोज टवटवीत आणि फ्रेश दिसतो. सकाळी लवकर उठून व्यायाम केल्याने मन प्रसन्न राहते. आपल्या आजूबाजूच्या वातावरणात अल्हाददायकपणा असतो. त्यामुळे व्यायामातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि बाजूची परिस्थिती आपल्याला चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन देत असते.

मी जिममध्ये व्यायाम करत असते, तेव्हा मी माझा फोन सायलेंट मोडवर बॅगमध्ये ठेवते. यामुळे लक्ष विचलित होत नाही. सर्वांत महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक व्यायामाचा अर्थ समजून घेऊन त्याचा शरीराला होत असलेल्या फायद्याचा विचार करावा. मी जिममधल्या ट्रेडमिलवर रनिंग करत असीन, तर मी मनात पॉझिटिव्ह विचार आणते, की आता माझे नको असलेले फॅट बर्न होत आहेत, माझे स्नायू मजबूत होऊन रक्ताभिसरण उत्तम होत आहे. माझा चेहरा नैसर्गिकरित्या ग्लो करतोय. या प्रक्रियेमध्ये नकळतपणे आपण शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समतोल सांभाळतो आणि चमत्कारिकरित्या आपल्याला फायदे दिसू लागतात.

शारीरिक स्वास्थ्यासाठी आहार ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. नुसते व्यायाम करूनच आपले शरीर तंदुरुस्त राहत नाही. त्यासाठी आहारही पूरक, सात्त्विक आणि समतोल राखणारा असणे गरजेचे आहे. मला चॉकलेट, आईस्क्रिम, बर्गर, पिझ्झा याचे अजिबातच आकर्षण नसल्याने फिट राहण्यास मदत होते.

दैनंदिन आहारात मी लिंबू पिळलेले गरम पाणी, चहा, नाश्‍ता, जवस बी, मोड आलेली कडधान्यं, चिकन, पनीर, दूध, फळे, भाकरी, अंडी, मासे यांचा समावेश करते. त्यामुळे शरीराला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी या पदार्थांमधून मला मिळत असतात. हे करत असतानाच मी नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण यांच्या वेळा शक्यतो एकसारख्याच ठेवते. त्यामध्ये फारसा बदल होत नाही.

परिणामी, माझं शारीरिक स्वास्थ्य चांगले राहते. या सर्व गोष्टी फिटनेससाठी अत्यावश्यक असल्या तरी त्यामध्ये झोप ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला दररोज किमान सहा ते आठ तास झोप आवश्यक आहे. त्यामुळे जिम करत असताना मी माझा फोन सायलेंट मोडवर ठेवते, त्याचप्रमाणे रात्री झोप घेण्यापूर्वी मी माझा फोन अगदी बाजूला ठेवून निवांतपणे झोप घेते. त्यामुळे या काळात मी फोन आणि सोशल मीडियापासून फार दूर राहते. त्याचा सकारात्मक परिणाम चांगल्या झोपेसाठी होतो.

सुदृढ आरोग्यासाठी टिप्स

  • आपण प्रत्येक जण काही ना काही काम करत असतो. त्यामुळे आपल्याला वेळेचं गणित जुळवणे अवघड असते. तरीही प्रत्येकानं न चुकता वेळ मिळेल त्यावेळी नियमित व्यायाम करावा.

  • व्यसनाचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. हे सर्व टाळण्यासाठी व्यसनमुक्त शरीर अंगीकारावे.

  • सध्या उन्हाळा सुरू असून घामावाटे शरीरातील पाणी कमी होत असते. त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. जास्त पाणी प्यायल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नसतात.

  • ताज्या फळांचा रस आणि ताक नियमित प्यावे. त्यामुळे शरीराला अल्हाददायकपणा मिळतो.

  • व्यायाम करताना मोबाईलचा वापर टाळावा. त्यामुळे लक्ष विचलित होत नाही.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com