
थोडक्यात:
मधुमेह आणि हृदयाचे आरोग्य यांच्यात घनिष्ठ संबंध असून तो अनेकदा दुर्लक्षित केला जातो.
उच्च रक्तातील साखर हृदयाच्या कार्यावर परिणाम करून हृदयरोगाचा धोका दुप्पट करते.
मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन केल्यास कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांची शक्यता कमी करता येते.
Diabetes Management: मधुमेह आणि हृदयाचे आरोग्य यांच्यामधील निकट संबंधाकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे त्याचा व्यक्तीच्या एकूण आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा त्याचा परिणाम फक्त ग्लुकोजपुरता मर्यादित नसतो, तर हृदयाच्या कार्यावर आणि एकूण कार्डिओव्हॅस्क्युलर जोखमीवर परिणाम होऊ शकतो.
संशोधनानुसार, मधुमेह असलेल्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात कधीतरी हृदयरोग होण्याचा धोका दुप्पट असतो. रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने रक्तवाहिन्या आणि हृदयाचे कार्य नियंत्रित करणाऱ्या नसांचे नुकसान होऊ शकते. पण, चांगली बातमी म्हणजे तुम्ही मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी केलेल्या उपाययोजना कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांचा धोका कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतात.
अंधेरी, मुंबई येथील कोकिलाबेन हॉस्पिटलचे कन्सल्टण्ट केडीएएच डॉ. मनिष हिंदुजा म्हणाले, "भारतात, मधुमेहाने ग्रस्त असलेल्या अनेक व्यक्तींमध्ये हृदयाशी संबंधित गुंतागूंती आढळून येत आहेत. तरुण व्यक्तींमध्ये या गुंतागुंतींत वाढ होत आहे हे देखील अत्यंत चिंताजनक आहे. मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर उच्च रक्तदाब, बॅड कोलेस्ट्रॉल आणि उच्च ट्रायग्लिसराइड्स सारख्या हृदयरोगाच्या जोखीम घटकांमध्ये वाढ होऊ शकते. ग्लुकोजमधील चढउतार टाळण्यासाठी व्यक्तींनी अतिरिक्त काळजी घेणे आणि प्रतिबंधात्मक पावले उचलणे महत्वाचे आहे. हृदयासाठी आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम आणि सीजीएम सारख्या डिवाईसेससह ग्लुकोजचे निरीक्षण करणे हे काही उपाय अवलंबता येऊ शकतात.''
अॅबॉटच्या डायबेटिस डिव्हिजनच्या मेडिकल अफेअर्सचे संचालक डॉ. केनेथ ली म्हणाले, “प्रभावी मधुमेह व्यवस्थापनासाठी ग्लुकोजच्या पातळीचे नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे. हे कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) डिवाईसेससारख्या साधनांचा वापर करून केले जाऊ शकते, ज्यामध्ये ग्लुकोज पातळीची माहिती देण्यासाठी बोटांना टोचण्याची आवश्यकता नसते. अशा डिवाईसेसमध्ये टाइम इन रेंज (टीआयआर) सारखे उपयुक्त मेट्रिक्स असतात, जे दिवसातील किती वेळ व्यक्तीची ग्लुकोजची पातळी विशिष्ट मर्यादेत राहते हे दाखवते. व्यक्ती दीर्घकाळापर्यंत या रेंजमध्ये असल्यास कार्डिओव्हस्क्युलर आजार होण्याचा धोका कमी होतो. खरेतर, टीआयआरमध्ये १० टक्के वाढ व्यक्तीच्या कॅरोटिड धमन्यांच्या असामान्य वाढीचा धोका ६.४ टक्क्यांनी कमी करू शकते. म्हणून,कार्डिओव्हस्क्युलर आजारावर प्रतिबंध ठेवण्यासाठी जास्त टीआयआर मिळवणे महत्वाचे आहे.”
कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकणारे सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स टाळण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, सॅच्युरेटेड फॅट्स सामान्यतः बटर, लाल मीट आणि फुल-फॅट डेअरी उत्पादनांमध्ये आढळतात, तर ट्रान्स फॅट्स बहुतेकदा तळलेल्या आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अंशतः हायड्रोजनेटेड तेलांमध्ये आढळतात.
पालेभाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिनेयुक्त पदार्थांनी युक्त संतुलित आहाराचे सेवन केल्याने हृदयसंबंधित आजारांना प्रतिबंध होऊ शकतो. पण संतुलित आहाराच्या सेवनासह त्यावर नियंत्रण ठेवत तुम्ही तुमच्या ग्लुकोजच्या पातळ्या अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवू शकता, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी व्यायाम करत लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल पातळी यासारख्या घटकांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. नियमित शारीरिक हालचाली देखील मधुमेहाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करण्यास मदत करतात.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार निरोगी जीवनशैलीसाठी बैठेकाम करण्याची वेळ कमीत-कमी करणे आणि दर आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम-तीव्रतेचा शारीरिक व्यायाम करणे, जसे जलद चालणे किंवा सायकल चालवणे यांची शिफारस केली जाते.
सीजीएमसारख्या रिअल-टाइम ट्रॅकिंगमुळे रक्तातील साखरेच्या वाढत्या किंवा कमी पातळीवर लक्ष ठेवण्यास मदत होऊ शकते. दिवसातून किमान १७ तास इष्टतम ग्लुकोजच्या श्रेणीत (७० - १८० mg/dl) असणे महत्वाचे आहे.
याव्यतिरिक्त, सीजीएमसारखी डिवाईसेस कनेक्टेड केअर डिजिटल इकोसिस्टम देखील देतात, जी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी आणि केअरगिव्हर्सशी संपर्कात राहण्यास मदत करेल. असे करत तुम्ही मधुमेह आणि हृदयसंबंधित आजारांच्या जोखमीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवू शकता.
धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांच्या अस्तरांचे नुकसान होऊ शकते आणि मधुमेहामुळे होणारे रक्तवाहिन्यांचे आकुंचन वाढू शकते. याव्यतिरिक्त, मद्यपान कमी केले पाहिजे, कारण ते मधुमेहाच्या औषधांच्या परिणामात व्यत्यय आणू शकते आणि रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करू शकते.
तणावात असताना शरीरात तणाव संप्रेरक तयार होते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि इन्सुलिन प्रतिरोधकता निर्माण करू शकते. कालांतराने, यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयरोग होण्याची शक्यता वाढते. ताणतणाव कमी करण्यासाठी संगीत ऐकणे, योगा किंवा नृत्य करणे आणि प्रियजनांसोबत वेळ घालवणे यांसारख्या उत्साही क्रियाकलापांचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा.
आरोग्यदायी हृदयासाठी उत्तम जीवनशैलीचे पर्याय निवडणे सर्वांसाठी महत्वाचे आहे. मधुमेह व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काय करावे यासंदर्भात डॉक्टरांचा सल्ला घ्या.
१. मधुमेह आणि हृदयरोग यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? (What is the connection between diabetes and heart disease?)
मधुमेहामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते, जी हृदयाच्या कार्यावर वाईट परिणाम करू शकते. त्यामुळे हृदयरोग होण्याचा धोका दुप्पट होतो.
२. मधुमेह असल्यास हृदयरोग टाळण्यासाठी कोणते उपाय करता येतात? (What can people with diabetes do to prevent heart disease?)
संतुलित आहार, नियमित व्यायाम, ग्लुकोज पातळीवर लक्ष ठेवणे, धूम्रपान/मद्यपान टाळणे आणि तणाव नियंत्रण हे महत्त्वाचे उपाय आहेत.
३. सीजीएम (CGM) डिव्हाइस म्हणजे काय आणि ते कसे मदत करते? (What is a CGM device and how does it help?)
सीजीएम म्हणजे कंटीन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग. हे डिव्हाइस रक्तातील साखरेची पातळी सतत तपासतं आणि टीआयआर (Time in Range) वाढवून हृदयरोगाचा धोका कमी करू शकतं.
४. तणावामुळे मधुमेह आणि हृदयरोग यांच्यावर काय परिणाम होतो? (How does stress affect diabetes and heart health?)
तणावामुळे शरीरात तणाव संप्रेरक तयार होतात, जे रक्तातील साखरेची पातळी वाढवतात आणि इन्सुलिन प्रतिरोधकता निर्माण करतात. यामुळे हृदयावर ताण येतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.