Diabetes Disease | तुमच्याही मनात आहेत का मधुमेहाबाबतचे हे गैरसमज ? लगेच दूर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diabetes Disease

Diabetes Disease : तुमच्याही मनात आहेत का मधुमेहाबाबतचे हे गैरसमज ? लगेच दूर करा

मुंबई : मधुमेह आजार अत्‍यंत सामान्‍य आहे. भारतात जवळपास ७७ दशलक्ष व्‍यक्‍ती या आजाराने पीडित असून जवळपास ५७ टक्‍के प्रौढ व्‍यक्‍तींचे मधुमेहाबाबत निदान झालेले नाही.

या आजाराबाबत अनेक गैरसमज देखील आहेत, ज्‍यामुळे मधुमेह व त्‍याचे व्‍यवस्‍थापन अपूर्ण किंवा चुकीचे होऊ शकते.

या कमी ज्ञात तथ्‍यांबाबत सखोल माहिती असणे महत्त्वाचे आहे, ज्‍यामुळे मधुमेहाने पीडित व्‍यक्‍ती आणि त्‍यांच्‍या केअरगिव्‍हर्सना या गंभीर आजाराबाबत, तसेच त्‍यांच्‍या आरोग्‍याची काळजी कशी घ्‍यावी याबाबत कल्पना येऊ शकेल.

११ जानेवारी १९२२ रोजी मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला. यानिमित्ताने मधुमेहाबाबत असणाऱ्या काही गैरसमजांबद्दल जाणून घेऊ. हेही वाचा - योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

हेही वाचा: Bone Cancer : ही साधीसुधी दुखणी असू शकतात हाडांच्या कर्करोगाची लक्षणे

शिल्‍पा मेडिकल रिसर्च सेंटरचे कन्‍सल्‍टण्‍ट फिजिशियन व डायबेटोलॉजिस्‍ट आणि असोसिएशन ऑफ फिजिशियन्‍स इंडियाचे सेक्रेटरी-जनरल डॉ. मंगेश तिवस्‍कर म्‍हणाले, ‘‘भारतातील मधुमेही व्‍यक्‍तींपैकी जवळ-जवळ तीन चतुर्थांश व्‍यक्‍तींमध्ये रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण अनियंत्रित आहे आणि त्यापैकी निम्म्या व्‍यक्‍तीमध्ये रक्तदाब नियंत्रण कमी आहे.

तसेच त्यांच्यापैकी किमान एक तृतीयांश व्‍यक्‍तींमध्‍ये कोलेस्ट्रॉल आणि लिपिड वाढले आहे. या चयापचय विकृतींच्‍या सामान्य कारणांमध्‍ये उपचारांचे पालन न करणे, डॉक्टरांकडे न जाणे आणि मधुमेहाच्या दीर्घकालीन परिणामांबद्दल जागरूकतेचा अभाव यांचा समावेश आहे.’’

मधुमेहाबद्दल काही गैरसमज लोकांच्या मनात असतात. ते दूर झाल्यास मधुमेहाचे व्यवस्थापन शक्य आहे.

हेही वाचा: Private Part : गुप्तांगाजवळ पुरळ आल्यास करा हे उपाय

मधुमेहाबाबतचे गैरसमज

गैरसमज १ : गोड पदार्थांमुळेच मधुमेह होतो

तथ्‍य : मधुमेह हा विविध घटकांशी संबंधित जटिल आजार आहे. यामध्‍ये वजन अधिक असणे किंवा लठ्ठपणा, बैठे काम करण्‍याची जीवनशैली, अनारोग्‍यकारक आहाराचे सेवन असे विविध घटक आहेत.

तसेच मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास हा अनुवांशिक घटक देखील कारणीभूत ठरू शकतो. मधुमेहाने पीडित व्‍यक्‍तींना गोड पदार्थांच्‍या सेवनावर नियंत्रण ठेवण्‍याचा सल्‍ला दिला जातो, पण फक्‍त गोड पदार्थांमुळेच मधुमेह होत नाही.

तरीदेखील गोड पदार्थांच्‍या सेवनावर नियंत्रण ठेवा, संयम महत्त्वाचा आहे. शर्करेचे उच्‍च प्रमाण असलेल्‍या आहारामधून कॅलरींचे प्रमाण वाढते, ज्‍यामुळे वजन वाढू शकते आणि परिणामत: मधुमेह होण्‍याचा धोका वाढू शकतो.

म्‍हणून योग्‍य संतुलनासाठी कमी ग्लायसेमिक इंडेक्स पर्याय आणि जास्त फायबर असलेले पदार्थ निवडण्याचा प्रयत्न करा.

गैरसमज २ : मधुमेह बरा होऊ शकतो

तथ्‍य : दुर्मिळ केसेसमध्‍ये मधुमेह बरा होऊ शकतो. पण बहुतांश केसेसमध्‍ये मधुमेह झाल्‍यास तो आजीवन आजार आहे. पण मधुमेह झाल्‍याने घाबरण्‍याची गरज नाही. या आजाराचे प्रभावी व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी अनेक मार्ग आहेत.

प्रीस्‍क्राइब केलेले औषधोपचाराचे योग्‍य पालन, आहार व जीवनशैलीतील बदल, तसेच रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर देखरेख यासह मधुमेहाने पीडित व्‍यक्‍ती जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकते.

वैयक्तिक केसेसमध्‍ये कोणते मधुमेह व्‍यवस्‍थापन सर्वोत्तम ठरते याबाबत डॉक्‍टरांशी सल्‍लामसलत करत व्‍यक्‍ती त्‍यांच्‍या शर्करेच्‍या पातळीवर नियंत्रण ठेवू शकतात आणि योग्‍य आरोग्‍य राखू शकतात.

गैरसमज ३ : मधुमेहाचा फक्‍त रक्‍तातील शर्करा पातळ्यांवर परिणाम होतो

तथ्‍य : मधुमेह हा गंभीर आजार आहे, ज्‍याचा शरीर रक्‍तातील शर्करेचा कशाप्रकारे वापर करते यावर परिणाम होतो.

संशोधनातून निदर्शनास येते की, विशेषत: हा आजार अनियंत्रित असल्‍यामुळे इतर संबंधित गुंतागुंती निर्माण होऊ शकतात, जसे हृदय, डोळा, मूत्रपिंड, रक्‍तवाहिन्‍या किंवा पायाशी संबंधित समस्‍यांचा धोका वाढू शकतो.

यामुळे मधुमेहाचे वेळेवर व्‍यवस्‍थापन करणे अधिक महत्त्वाचे आहे. तसेच मधुमेहाने पीडित व्‍यक्‍तींना नियमितपणे आरोग्‍य तपासणी करण्‍याचा, त्‍यांच्‍या आरोग्‍यावर देखरेख ठेवण्‍याचा सल्‍ला दिला जातो, ज्‍यामुळे कोणत्‍याही समस्‍यांचे त्‍वरित निदान होऊन त्‍यांचे निराकारण करता येते.

गैरसमज ४ : काही प्रकारचे मधुमेह इतरांपेक्षा सौम्‍य असतात

तथ्‍य : मधुमेह टाइप १, टाइप २ आणि गेस्‍टेशनल (गरोदर असताना) असा विविध प्रकारचा असला तरी त्‍यांना सौम्‍य किंवा गंभीर म्‍हणून परिभाषित करता येऊ शकत नाही.

सर्व प्रकारच्‍या मधुमेहांमध्‍ये नियंत्रण नसल्‍यास त्‍याचे गंभीर, दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. असे असले तरी मधुमेहाने पीडित व्‍यक्‍ती प्रकाराची पर्वा न करता योग्‍य मधुमेह व्‍यवस्‍थापनासह आरोग्‍यदायी, उत्तम जीवन जगू शकते.

गैरसमज ५ : आहार व जीवनशैली बदलांसह मधुमेहाचे पूर्णपणे व्‍यवस्‍थापन करता येऊ शकते

तथ्‍य : रक्‍तातील शर्करेचे प्रमाण वाढवणाऱ्या विशिष्‍ट खाद्यपदार्थांचे कमी प्रमाणात सेवन आणि आरोग्‍यदायी फिटनेस नित्‍यक्रमाचा अवलंब मधुमेहाच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी महत्त्वाचा आहे.

पण याचा अर्थ असा नाही की, फक्‍त इतकेच उपाय मधुमेहाने पीडित व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या आजाराचे संपूर्ण व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी पुरेसे आहे.

या आजाराबाबतची तथ्‍ये जाणून घेतल्‍याने काळजी घेण्‍याचा प्रवास कमी जटिल होऊ शकतो.

वैद्यकीय मार्गदर्शनाचे पालन आणि वैयक्तिक स्थितींसाठी कोणता उपाय चांगला आहे यासाठी डॉक्‍टरांसोबत सल्‍लामसलत अत्‍यंत महत्त्वाची आहे. यामुळे व्‍यक्‍ती त्‍यांच्‍या मधुमेहाचे उत्तमप्रकारे व्‍यवस्‍थापन करण्‍यास सक्षम होऊ शकतात.

सूचना : हा लेख सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणत्याही प्रकारच्या उपचार आणि सल्ल्यासाठी कृपया डॉक्टरांशी संपर्क साधा.

टॅग्स :Diabetes News