निसर्ग आणि आपण

संतुलन हा आरोग्याचा मंत्र आहे असे म्हटले, तर असंतुलन म्हणजे रोग हे स्पष्टच आहे.
Nature and you
Nature and yousakal

संतुलन हा आरोग्याचा मंत्र आहे असे म्हटले, तर असंतुलन म्हणजे रोग हे स्पष्टच आहे. राजमार्गाने न जाता वेडीवाकडी वळणे घेत आयुष्य जगणे, तसेच सगळ्यांच्या गतीशी स्वतःची गती मिळवून न चालता पुढे जाणे वा मागे राहणे, हेही असंतुलनच.

सर्व वाहने एका विशिष्ट गतीने रस्त्यावरून जात असताना इतर वाहनांना अधिक गतीने जाण्याची ताकद नाही असे समजून स्वतःकडे असलेले छोटे वाहन किती वेगाने पुढे जाऊ शकते हे दाखवायची हौस असल्याने किंवा मी सगळ्यांच्या पुढे जाणार या इच्छेने वेडीवाकडी, डावी-उजवी करत सुसाट वेगाने मोटरसायकल चालवली तर अपघात ठरलेलाच असतो. अशा अपघातांमध्ये स्वतःबरोबर इतरांनाही त्रास होऊ शकतो.

निसर्गाचे घड्याळ एका विशिष्ट पद्धतीने व एक विशिष्ट अंतर ठेवून चालते. त्यातही बदलाचा आनंद मिळावा म्हणून ऋतुमानाप्रमाणे सूर्य दक्षिणायन-उत्तरायण करतो व मग ऋतुमानाप्रमाणे दिवस-रात्र लहानमोठी होतात. उष्णता, थंडी, आर्द्रता, पाऊस, रुक्षपणा कधी वाढतात, कधी कमी होतात. परंतु, या सर्वांचा एक विशिष्ट क्रम व नियम निसर्ग पाळतो असे दिसते.

आपण मात्र सध्या उशिरा झोपणे, उशिरा उठणे, वेळी-अवेळी खाणे-पिणे अशा प्रकारे निसर्गाबरोबर असंतुलित जीवन जगतो आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीला काही गोष्टी मानवतात तर काही गोष्टी मानवत नाहीत. लहान मुलासाठी बनविलेल्या छोट्या खुर्चीवर मोठ्या मनुष्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला तर खुर्ची हमखास मोडते व तसा प्रयत्न करणाराही खाली पडतो. आपली ताकद किती आहे याचा अंदाज घेऊन त्या प्रमाणातच काम, जबाबदाऱ्या अंगावर घ्याव्यात व पार पाडाव्यात.

तसेच आपल्या प्रकृतीनुसार आहार ठेवल्यास आहाराचे रस-रक्तादी शरीरद्रव्यांमध्ये रूपांतर होते व शरीरात ताकद मिळते, आरोग्य टिकून राहते. पण, प्रकृतीला न मानवणारे, ऋतुमानाला अनुकूल नसलेले अन्न सेवन करण्याने रोगाला निमंत्रण मिळते. संपूर्ण निसर्गाकडे लक्ष ठेवून, त्यातील बदलांकडे लक्ष ठेवून भौगोलिक वातावरण लक्षात घेऊन आहार-विहार ठरवावा लागतो, नाहीतर रोगांना सहज निमंत्रण दिल्यासारखे होते.

निसर्गचक्राचे संतुलन राहावे यासाठी परंपरेने काही फार सुंदर गोष्टी सुचविलेल्या असतात. यासाठी भारतीय परंपरेत ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम असे चार आश्रम सांगितलेले आहेत. ज्या ठिकाणाहून मन व भावना यांचे व्यवस्थापन होते; ज्या ठिकाणाहून बुद्धी, विवेक, निर्णयक्षमता यांचे कार्य होते; हृदय, यकृत, मूत्रपिंड वगैरे शरीराच्या अंतर्गत अवयवांवर तसेच बाह्य इंद्रियांच्या कार्यावर ज्या मेंदूचे नियंत्रण असते, त्या मेंदूची काळजी घेणे हे ब्रह्मचर्यातील मुख्य काम असते.

परंतु ब्रह्मचर्याच्या काळात अभ्यास न करता, ज्ञानसंपादनाचा प्रयत्न न करता, चांगले पौष्टिक अन्न खाण्यावर व व्यायामावर भर न देता, उनाडक्या करण्यात, कुसंगतीमध्ये अनाठायी वेळ घालवला तर संपूर्ण आयुष्य असंतुलित होऊ शकते. साधारणतः सहा वर्षापर्यंत बाल, नंतर बारा वर्षापर्यंत कुमार, नंतर पौगंडावस्था अशा तऱ्हेने पुन्हा ब्रह्मचर्याच्या कालावधीचे उपभाग पाडलेले असतात.

त्यांच्याशी पायमिळवणी वा हातमिळवणी करून जीवनक्रम व्यवस्थित राखला तर जीवनाचे आरोग्य चांगले राहते. गृहस्थाश्रम सुरू झाल्यानंतर शरीराच्या गरजा ओळखून लग्न वगैरे करणे आवश्‍यक असते. या काळात ‘तूर्त लग्न नको’ असा धोशा लावत पस्तिशी-चाळिशीपर्यंत वाट पाहण्यानेही असंतुलन होते.

गृहस्थाश्रमात न लुटलेला आनंद वानप्रस्थाश्रमामध्ये लुटण्याचा प्रयत्न केला तर तेथेही यश मिळत नाही. संन्यासाश्रम ही मुक्त अवस्था असते, एवढे फक्त ऐकिवात राहते, कारण असंतुलनाने शरीरात विविध रोग उत्पन्न झालेले असल्याने संन्यासाश्रमाच्या वयापर्यंत आयुष्य संपुष्टात आलेले असते.

निसर्गचक्रानुसार शरीरात वात-पित्त-कफदोषांचाही एक विशिष्ट क्रम असतो. हे तिन्ही दोष कार्यकारी तत्त्वे असल्याने ते सुरुवातीपासून शरीरात असतातच, मात्र वयानुसार, दिवस-रात्रीनुसार त्यांच्यात निसर्गतः चढउतार होत असतात.

दिनचर्येमध्ये पाहिलेल्या सर्व गोष्टी वात-पित्त-कफाच्या या चढ-उतारानंतर अचूक प्रकारे आखलेल्या आहेत. उदाहरणार्थ, सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी उठायला सांगितले आहे, कारण पहाटे वाताच्या काळात झोपेतून उठणेही सोपे जाते व नंतर मलमूत्रविसर्जनाची क्रियाही वातावर अवलंबून असल्याने वाताच्या काळात सहज पूर्ण होऊ शकते. त्यानंतर डोळ्यात अंजन घालणे, गुळण्या करणे या सर्व कफ कमी करणाऱ्या गोष्टी कफाच्या काळात सूर्योदयानंतर ६ ते १० या काळात करायला सांगितल्या आहेत.

दुपारी ११ ते १ च्या दरम्यान जेवायला सांगितले ते पित्ताच्या काळात, जेणेकरून अन्नपचन जास्तीत जास्त सोपे व्हावे. वात-पित्त-कफ यांचे असे ठरावीक वेळेला वाढण्याचे आणि नंतर आपोआप कमी होण्याचे चक्र आपल्या शरीरात अविरत, रोजच्या रोज चालू असते. रोगाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी व नंतर उपचाराची दिशा ठरविण्यासाठीही याचा अनेकदा प्रत्यक्षात आधार घेतला जातो.

वयानुसारही वात-पित्त-कफाचा क्रम ठरलेला असतो. लहान वयात कफ, तरुण वयात पित्त आणि उतार वयात वातदोष अधिक प्रभावी असतात, अधिक जोमाने काम करणारे असतात. लहान वयात संतुलित कफाची आवश्‍यकता असते. म्हणून लहान वयात कफपोषक आहार, रसायनांचे सेवन करणे आवश्‍यक असते, पण कफदोष आवश्‍यकतेपेक्षा अधिक प्रमाणात वाढणार नाही किंवा त्रासदायक ठरणार नाही याचाही काळजी घेणे भाग असते. म्हणूनच लहान वयात दूध, लोणी, तूप वगैरे गोष्टी रोजच्या आहारात असाव्या लागतात. तसेच केशर, वावडिंग, ओवा वगैरे कफशामक गोष्टीही द्यायच्या असतात.

तरुण वयात पित्ताच्या स्फूर्तीला, धडाडीला वाव मिळावा यासाठी आरोग्य चांगले असावे लागते. शरीरशक्ती टिकविण्यासाठी, वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. व्यायाम, उत्साही वृत्तीची जोड द्यावी लागते. अन्यथा ऐन उमेदीच्या काळात ताकद राहिली नाही तर पित्ताच्या स्फूर्तीला वाव मिळू शकत नाही. त्यातूनच नैराश्‍य, व्यसनाधीनता वगैरे रोगांना आमंत्रण मिळू शकते.

उतारवयात वात वाढू नये यासाठी काळजी घेतली, शक्ती टिकविण्यासाठी आहार-रसायनांचे सेवन केले तर वातरोगांना आमंत्रण मिळण्यास प्रतिबंध होऊ शकतो व निरामय दीर्घायुष्याचा आनंद घेता येतो.

थोडक्यात, आपण सर्व निसर्गाचा एक भाग आहोत हे कायम लक्षात ठेवायला हवे. निसर्गातील प्रत्येक मोठ्या घटनेचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो, याचेही भान ठेवायला हवे. निसर्गाला प्रमाण मानून त्याप्रमाणे जीवनशैली आखली तर आरोग्य राखणे सोपे जाईल, उलट निसर्गाच्या विरुद्ध निसर्गतत्त्वांना समजून न घेता केवळ सोयीचा विचार केला किंवा कायम तडजोड केली, तर त्यातून रोगांना आमंत्रण मिळेल.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com