फिटनेससाठीचा ‘सायकल’मंत्र

महिलेने ठरवले तर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हव्या त्या गोष्टी करू शकतात. ‘Age is just a Number’ या वाक्यावर माझा विश्वास आहे.
फिटनेससाठीचा ‘सायकल’मंत्र

- निरूपमा भावे, सायकलपटू

महिलेने ठरवले तर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हव्या त्या गोष्टी करू शकतात. ‘Age is just a Number’ या वाक्यावर माझा विश्वास आहे. कोणत्या आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये उपजतच असते. वयाच्या पन्नाशीनंतर मी सायकल चालवण्याचा निर्णय घेतला.

मी खूप आधीपासून स्कूटर चालवायचे, त्यामुळे कोठेही जायचे असेल तर म्हणजे अगदी दोन किलोमीटरच्या अंतरासाठीदेखील स्कूटरचा वापर करणारी मी अचानक एके दिवशी ठरविले, की आतापासून सायकलनेच प्रवास करायचा आणि हा निर्णय आरोग्याच्या दृष्टकोनातून माझ्या हिताचा ठरला.

घरातून वडील आणि भावाचा इंजिनिअरिंग करण्यासाठी विरोध होता. मात्र, इंजिनिअरिंग करण्याची माझी आतोनात इच्छा होती. मी १९६६ मध्ये बीएस्सी झाले. वडिलांनी इंजिनिअरिंग करण्यास नकार दिला आणि बी.एस्सी.नंतर घरात लग्नाची बोलणी सुरू झाली.

मात्र, मी वडिलांजवळ पदव्युत्तर शिक्षण करण्याची इच्छा व्यक्त केली. वडिलांनी परवानगीदेखील दिली. मी एम.एस्सी. मॅथेमॅटिक्समध्ये पहिला क्रमांक मिळविला. नेस वाडियामध्ये नोकरीवर रुजू झाले. कॉमर्स महाविद्यालयामध्ये स्टॅटिस्टिक्स हा विषय शिकवू लागले. त्यामुळे मी स्टॅटिस्टिक्समध्ये एम.एस्सी. करण्याचा निर्णय घेतला.

माझा मुलगा एक वर्षाचा असताना १९७४मध्ये तत्कालीन पुणे विद्यापीठात एमएस्सी स्टॅटिस्टिक्ससाठी प्रवेश घेतला. त्यानंतर कुटुंब आणि करिअर हा प्रवास सुरू झाला. सकाळी साडेसात ते साडेदहा या वेळेत नेस वाडियामध्ये शिकवत होते आणि त्यानंतर ११ वाजता पुणे विद्यापीठात शिकण्यासाठी जात होते.

मी या विषयात विद्यापीठात पहिली आले आणि फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्रोफेसर म्हणून रुजू झाले. त्यानंतर मॅथेमॅटिक्स विषयात मी पीएचडीदेखील केली. कालांतराने पुणे विद्यापीठामध्ये प्रोफेसर म्हणून कामास सुरुवात केली आणि प्रमुखही झाले.

मी वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचली. शिरिन व्यंकट या नावाची स्त्रीरोगतज्ज्ञ गंगा सागर ते गोमुख पदयात्रा काढणार आहे. कारण त्याभागात भारतातील गर्भवती महिलांचा आणि मुलांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. या पदयात्रेदरम्यान गर्भवती महिलांमध्ये प्रबोधन करण्याचे काम केले. त्याच दरम्यान माझा पाय एका सायकललिंग शर्यतीमध्ये फ्रॅक्चर झाला असतानाही मी या प्रबोधन उपक्रमामध्ये सहभागी झाले.

शंभर दिवस गंगेच्या काठाने पदयात्रेतून तेथील गर्भवती मातांची देखभाल करत त्यांना हिमोग्लोबिनचे महत्त्व सांगत त्यांचे प्रबोधन केले. पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, झारखंड अशा पाच राज्यांतून गंगेच्या काठावरून नियमित वीस किलोमीटर पदयात्रा करत होतो. यादरम्यान तब्बल शंभर-दोनशे महिलांचे प्रबोधन केले.

सायकलिंगची सुरुवात

मी कायम स्कूटर चालवणारी बाई आहे. वयाची अठरा वर्षं पूर्ण होताच माझ्या हातात स्कूटर आली होती. एका दिवशी माझ्या पतीचे मित्र घरी आले होते. त्यांचे नाव एस. बी. जोशी. ते औंधवरून वाडिया कॉलेजला सायकलवर जात असत. त्यावेळी ते साठ वर्षांचे होते. त्यांच्यामुळे प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळाली. ते वयाच्या साठाव्या वर्षी सायकलिंग करत असतील आणि त्यांचे आरोग्य चांगले आहे, तर मग आपणही सुरुवात का करू नये, असा विचार मनात आला.

मी त्यावेळी ५२ वर्षांची होते. तेव्हा माझ्या सायकलिंगच्या प्रवासाला सुरुवात झाली. तो अजून सुरूच आहे आणि सुरू राहील. मी महिलांना हे सांगू इच्छिते, की महिलांनी चूल आणि मूल या दोन गोष्टींमध्ये अडकून राहू नये. तुमच्यासाठी वेळ काढून छंद जोपासत राहा. पन्नाशी जरी ओलांडली, तरी आवडीच्या गोष्टी स्वतःसाठी करायला सुरुवात करा.

महिलांना संदेश

व्यायामामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहते. वयाच्या सेकंड इनिंगमध्ये खास करून पाय आणि पाठीचे विकार सुरू होतात. त्यामुळे तुम्ही व्यायामाला प्राधान्य दिले, तर नियमित निरोगी राहाल. मी सायकल किंवा पोहणे या व्यायामप्रकारांना प्राधान्य दिले आहे. या दोन्ही गोष्टींमुळे तुमचे गुडघे दुखत असतील किंवा कोणतेही शारीरिक विकार असतील, तर ते आपोआप कमी व्हायला सुरुवात होते. तुमचे गुडघे दुखत असले, तरी ते सायकल चालवण्यातून सुदृढ होतात. त्यामुळे तुमचे छंद जोपासत तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायला सुरुवात करा.

(शब्दांकन : सुचिता गायकवाड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com