
Skipping bath in monsoon: पावसाळ्यात अंघोळ न करणे, तुम्हाला पडू शकतं महागात..
पावसाळ्यात बहुतांश लोकांना अंघोळ करण्याचा प्रचंड कंटाळा येतो.त्यामुळे दिवसाआड अंघोळीला दांडी मारली जाते.पावसाळा सुरू झाला की सुरूवातीला पाऊस हा हवाहवासा वाटतो.मात्र जसजसा पाऊस धो धो पडू लागतो,पावसाची झड लागते मग मात्र तसतसा त्या पावसाचा वैताग यायला सुरुवात होते.
पावसाळ्यात वातावरण थंडच असतं ,कारण खुपदा सुर्य हा ढगाआड लपलेलाच असतो. यामुळे अनेकांना तर या काळात तहान सुध्दा लागत नाही. त्यामुळे लोक खूप कमी पाणी पितात. आणि मग कमी पाणी पिल्यामुळे पोटाशी संबंधित समस्या समोर येऊ लागतात. हे तर झाल पाणी पिण्यासाठी पण खूप जण तर या दिवसात अंघोळ करायलाही टाळाटाळ करताना दिसतात.
पावसाळ्यात प्रत्येक घरात एक तरी असा व्यक्ति असतो जो एखादा दिवस तरी अंघोळीला दांडी मारतो. म्हणजेच काय तर अंघोळ करायला टाळाटाळ करणे असे प्रकार सुरु होतात. मात्र पावसाळ्यात अंघोळीला दांडी मारणं महागात पडू शकतं, असं आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
चला तर मग जाणून घेऊया, पावसाळ्यात अंघोळीला दांडी मारण्यामुळे तुमच्या शरीरावर काय दुष्परिणाम होऊ शकतात.
● इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. ऋतु कुठलाही असो आपल्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जीवजंतू बसतात.त्यामुळे नियमितपणे रोजच्या रोज अंघोळ केल्यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि संक्रमण होण्यापूर्वीच हे जीवजंतू गरम पाण्याने धुऊन टाकले जातात. तसेच तुमच्या त्वचेवर असणाऱ्या अनेक मृत पेशींची त्यामुळे सफाई होते. मात्र अंघोळ करणे सतत टाळले तर या मृत पेशी त्वचेवरच साठून राहतात.त्यामुळे मग काही काळाने तुम्हाला इन्फेक्शनचा त्रास सुरू होण्याची शक्यता असते.
● शरीराची दुर्गंधी येणे सुरू होऊ शकते. पावसाळ्यात हवेत मोठ्या प्रमाणात आर्द्रता असते. तुम्ही घरात असा, किंवा घराबाहेर प्रत्येक ठिकाणी बाष्प साठण्याचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे धुवून वाळत घातलेले कपडेदेखील हातात घेतले की थोडेफार ओलसर असल्याचं आपल्याला जाणवतं. याच आद्रतेच्या कारणामुळे आपल्या शरीराला दुर्गंधी येण्याची शक्यता निर्माण होते. जर तुम्ही नियमित अंघोळ केली तर हा प्रकार टाळता येऊ शकतो.
● त्वचेचं इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. नियमित अंघोळ करणाऱ्या व्यक्तींच्या त्वचेचं आरोग्य अंघोळीला दांडी मारणाऱ्यांच्या तुलनेत चांगलं असल्याचं रिसर्चमधून दिसून आलं आहे. अंगाला सूज येणे,त्वचेला खाज येणे या समस्याही नियमित अंघोळ केल्यामुळे कमी होते. अंघोळ केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत आणि नियंत्रित राहायलाही मदत होते असे सांगितलं जातं.
● तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. अंघोळ केली नाही, तर शरीरावर व्हायरस आणि बॅक्टेरिया यांचं प्रमाण वाढत जातं. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्याशी लढण्यात वाया जाते. त्यामुळे गरजेच्या वेळी या शक्तीचा उपयोग होऊ शकत नाही.
● जर तुम्ही पावसाळ्यात अंघोळ करायला टाळाटाळ केली तर तुमच्या शरीराचे काही ठराविक भाग हे काळे पडू शकतात तसेच तुम्हाला त्वचारोग होण्याची शक्यता वाढू शकते.
● पावसाळ्यात दररोज अंघोळ नाही केली तर माणसांचे शरीर घामामुळे चिपचिप होते.आणि त्यामुळे मग चिडचिड होऊ लागते, अस्वस्थपणा वाटू लागतो.