...आणि ‘रस्ता’ सापडे!

लहानपणी मी कधीही कोणताही खेळ खेळले नव्हते किंवा क्रीडा क्षेत्रात विशेष रसही नव्हता. थोडाफार व्यायाम करायचे; पण ते विशेष उल्लेखनीय नव्हतं.
vibhavari deshpande
vibhavari deshpandesakal

लहानपणी मी कधीही कोणताही खेळ खेळले नव्हते किंवा क्रीडा क्षेत्रात विशेष रसही नव्हता. थोडाफार व्यायाम करायचे; पण ते विशेष उल्लेखनीय नव्हतं. रनिंगविषयी कुतूहल वाटायचं; पण मी कधी प्रत्यक्ष पळाले नव्हते. मला २०१८ मध्ये अचानक काहीतरी शारीरिक कृती करण्याची गरज वाटू लागली.

माझी आई त्यावेळी अचानक कर्करोगाने गेली, त्यामुळे मन शांत करण्यासाठी मला कशाची तरी गरज वाटली. पळण्यामध्ये मन शांत ठेवण्याची शक्ती आहे, असं म्हणतात. त्यामुळे त्याची ओढ वाटली आणि मी या क्षेत्राकडे वळले. त्याच वेळी माझ्या भावाचं लग्न ठरलं आणि माझी वहिनी लाँग डिस्टन्स रनर आहे. ती अमेरिकेत असते आणि ती फिजिओथेरपिस्ट आहे.

मी तिला विचारलं, की मला अगदी थोडंसुद्धा पळता येत नाही. तिचं असं म्हणणं होतं की, तू चुकीच्या पद्धतीने पळत आहेस. योग्य पद्धतीने पळणं, पाय योग्य रीतीनं टाकणं हे शिकणं गरजेचं आहे. सुरुवातीला तिनं मला तिच्यासोबत पळायला नेलं. तेव्हापासून मला त्याबद्दल आवड निर्माण झाली. मी ज्या सोसायटीमध्ये राहते, तिथले १५-२० जण पळणारे आहेत. बरेच जण सातत्याने मॅरेथॉनमध्ये पळत असतात.

त्यांनी मला खूप मदत केली, प्रेरणा दिली. मला पाच किलोमीटर पळायलाच तीन-चार महिने लागले. पळायला सुरू केल्यावर मी पहिल्यांदा ‘सकाळ’च्याच मॅरेथॉनमध्ये दहा किलोमीटर पळाले. त्यावेळी मला कळलं, की तुम्ही जास्त अंतर पळता, तेव्हा तुमचं शरीर एका विशिष्ट प्रकारच्या अवस्थेत जातं आणि तेव्हाची तंद्री मनाला अत्यंत प्रसन्नता देणारी असते.

शरीर शांत असतं, तेव्हा मन जास्त जोरात धावतं; पण तुम्ही शारीरिक कृती करत असता, तेव्हा मन शांत होतं, असा माझा आणि अनेकांचा अनुभव आहे. त्यावेळी मला कळलं, की ध्यानधारणा करण्यापेक्षा पळताना माझं मन अधिक शांत राहतं. तिथून माझ्या या प्रवासाची सुरुवात झाली आणि मी नियमितपणे पळू लागले.

मी २०२१ मध्ये १७ किलोमीटर पळाले आणि मला असं वाटलं, आता आपण हाफ मॅरेथॉनही पळू शकतो; पण कोरोना झाल्यानंतर माझ्या शरीरावर त्याचा परिणाम झाला आणि सगळं रुटीन गडबडलं. तरीही मी सातत्यानं जमेल तसं पळत राहिले. प्रसिद्ध धावपटू कौस्तुभ राडकर माझ्या परिचयाचे होते आणि मी या निमित्ताने त्यांच्याशी जोडले गेले. त्यांनी मला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.

त्यांनी मला पळण्याचं नियोजन करून दिलं, विविध व्यायामप्रकारही करण्यास सांगितलं. हा प्लॅन तंतोतंत पाळण्याचा मी प्रयत्न करते; पण आव्हानात्मक गोष्ट यात अशी, की माझं काम असं आहे, की माझं कोणतंही ठरलेलं रुटीन नाही. मी काही दिवस कामानिमित्त मुंबईत असते, तेव्हा पळण्यासाठी वेळ मिळतोच असं नाही. आमच्या कामाच्या वेळाही ठरलेल्या नाहीत.

त्यामुळे मला सातत्य ठेवणं अवघड जातं; पण तरीही मी आटोकाट प्रयत्न करते आणि जमेल तशी मी पळते. माझ्या क्षेत्रात शिस्त ही गोष्ट अभावानेच आढळते. पळण्याच्या माध्यमातून मी माझ्या मनाला शिस्त लावते. मी या विषयाबद्दल वाचनही करते.

हारुकी मुराकामी या जपानी लेखकाचं ‘व्हॉट आय थिंक व्हेन आय थिंक अबाऊट रनिंग’ नावाचं पुस्तकही मी नुकतंच वाचलं. त्यातून मला पळताना आपला मेंदू कशा पद्धतीने काम करतो, याबद्दलही माहिती मिळाली. धावणं आणि लिखाण या दोन्हींसाठी हे पुस्तक मला प्रेरणादायी वाटलं.

तुमची स्वतःशी स्पर्धा असते, तेव्हा ते प्रेरणादायी असतं. यामधून मिळणाऱ्या प्रेरणेचा तुमच्या रोजच्या आयुष्यातही उपयोग होतो. तुम्ही स्वतःलाच नवनवीन गोल्स देता, तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या रोजच्या जगण्यात आणि काम करण्यातही दिसू लागतो, हे मला जाणवलं. आता मला आता या वर्षात हाफ मॅरेथॉन करायची आहे. ही मॅरेथॉन २१ किलोमीटरची असते.

या वर्षांत मी ती नक्की करेन, असा माझा विश्वास आहे. हे माझं माझ्यासाठीच ठरवलेलं एक उद्दिष्ट आहे. आता मला हे प्रकर्षानं जाणवतं की मध्यमवयीन स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे अत्यंत काटेकोरपणे लक्ष द्यायला हवं. बायका नेहमीच आपल्या आरोग्याला दुय्यम महत्त्व देतात, त्याकडे दुर्लक्ष करतात. जगात कोणाही व्यक्तीला आपल्या आरोग्यासाठी एक तास काढता येत नसेल तर ही काहीतरी गडबड आहे. ही गडबड सुधारणं आपलं काम आहे.

शारीरिकच नव्हे, तर मानसिक आरोग्यासाठीही कोणताही व्यायाम करणं फार गरजेचं आहे. मला जसं पळणं सापडलं आहे, तसं तुम्ही इतर कोणताही व्यायाम करू शकता. रोजच्या आयुष्यातही आपल्याला ब्रेक हवा असतो. तो ब्रेक यानिमित्ताने तुम्हाला मिळू शकतो आणि ही तुमची गरज आहे.

(शब्दांकन : वैष्णवी कारंजकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com