Jalgaon Accident News : नशिराबादजवळ ऑईल टँकरच्या धडकेत 2 तरुण ठार; चटई कारखान्यातील कामगारांवर घाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Accident

Jalgaon Accident News : नशिराबादजवळ ऑईल टँकरच्या धडकेत 2 तरुण ठार; चटई कारखान्यातील कामगारांवर घाला

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर नशिराबाद गावाजवळ सुसाट ऑईल टँकरने रविवारी (ता. २६) दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दोन तरुणाचा मृत्यू झाला असून, दोघेही मृत एमआयडीसीतील चटई कारखान्यात कामाला होते.

अर्ध्या दिवसाची सुटी घेऊन ते भुसावळमार्गे गावाकडे निघाल्याचे सांगण्यात आले. संदीप शिरसाम (वय २४), वसंत वरखेडे (वय २८), असे मृत तरुणांची नावे आहेत.

चटई कारखान्यात कामाला असलेले आदिवासी तरुण संदीप मानसिंग शिरसाम आणि वसंत मुन्ना वरखेडे (दो. रा. धमण्या, जि. बैतूल, मध्यप्रदेश) दुचाकीने (एमपी ४८, एमआर ५३९७) भुसावळकडे जात होते. राष्ट्रीय महामार्गावर दोघे दुचाकीस्वार चुकीच्या दिशेने नशिराबाद पुलाच्या दिशेने निघाले होते.

याच वेळेस भुसावळकडून जळगावच्या दिशने पुलावरून खाली उतरताना सुसाट वेगातील ऑईल टँकर (एमएच ०४, डीएस २२१७) चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारांना वाचविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र, अपघात होऊन दोन्ही तरुण जागीच ठार झाले.

अपघाताची माहिती कळताच नशिराबादचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, सहाय्यक फौजदार अलियार खान, अतुल महाजन, रूपेश साळवे घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावरील मृत तरुणाचे मृतदेह तातडीने खासगी गाडीतून जिल्‍हा सामान्य रुग्णालयात रवाना केले.


चुकीच्या दिशेने जाण्याने केला घात
नव्याने चौपदरीकरण झालेल्या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाजवळ आणि सर्व्हिस रोडला लागून लोखंडी जाळ्या बसवून, तसेच दुभाजक टाकून दोन्ही बाजूची वाहतूक स्वतंत्र केली आहे. वेळ आणि पेट्रोल वाचविण्याच्या प्रयत्नात बहुतांश दुचाकीस्वार चुकीच्या दिशेने (राँग साईड) वाहने दामटून जिवाशी खेळ करतात.

तसाचा प्रकार रविवारी झाला. एमआयडीसीतून निघाल्यानंतर दुचाकीस्वारांनी महामार्गावरील टोयोटा शोरूम आणि पेट्रोलपंपाजवळूनच दुचाकी राँग साईडने टाकली आणि नशिराबाद उड्डाणपुलाजवळच त्यांच्या वाहनाला अपघात झाल्याचे दिसून येते.


महामार्ग ठप्प; नागरिकांचा संताप
घटनास्थळी नशिराबाद ग्रामस्थांसह दोन्ही बाजूने ये-जा करणारे वाहनधारक जागच्या जागी थांबून गेल्याने महामार्ग तासाभरासाठी ठप्प झाला होता. दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रागा लागून अपघाताला कारणीभूत समजून टँकरचालकाला काहींनी शोधण्याचा प्रयत्न केला.

मात्र, प्रसंगावधान राखून टँकरचालकाने वाहन तसेच सोडून पळ काढला. नशिराबाद पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :Jalgaonaccidentdeath